‘मला आज मंत्रालयात भरपूर काम आहे. शिवाय विश्वगुरूंना भेटून सत्कारसुद्धा करायचाय तेव्हा ज्या काही चर्चा, ठराव करायचे असतील, ते लवकर करून मला मोकळे करा.’ घाईघाईत बैठकीच्या खोलीत शिरलेल्या आठवलेंनी असे म्हणताच उपस्थितांच्या चेहर्‍यावर नाराजी उमटली.

डोळे बंद करण्याआधी रामदासभाईंनी सभोवार नजर टाकली. फारच कमी जण विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला हजर होते. ‘बाकीचे कुठे गेले’ असे त्यांनी विचारताच बाजूचा त्यांच्या कानात कुजबुजला. ‘आता पक्षात एवढेच शिल्लक उरलेत. हेच पदाधिकारी व हेच कार्यकर्ते!’ ते ऐकून न ऐकल्यासारखे करत आठवले म्हणाले ‘हं, बोला कुणाला काय बोलायचे ते’ ऐकून शांतता पसरली. तिचा भंग करत एक धिटाईने बोलू लागला.

‘साहेब, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून बोलण्याचे धाडस करतोय. तुम्ही परवा जे विधान केले ते ऐकून आम्ही सारेच अस्वस्थ आहोत. शरद पवार आम्हाला विधान परिषदेच्या जागा द्यायचे पण महायुतीने गेल्या १२ वर्षांत एकही दिली नाही, असे तुम्ही म्हणालात. हे योग्यच पण पुढे काय? हे सांगितल्यावर साधा इशारासुद्धा तुम्ही महायुतीला देऊ शकत नसाल तर या युतीला अर्थ काय? एकीकडे तुम्ही पवार चांगले होते असे म्हणता व दुसरीकडे महायुतीतच राहू असेही सांगता ही लाचारी नव्हे काय?

या भागीदारीतून तुमची सोय झाली पण आमचे काय? महायुतीतले पक्ष आम्हाला दारातही उभे करत नाहीत. आमची कामे होणे तर खूप दूर. केवळ तुमच्या खुर्चीसाठी हे आम्ही किती काळ सहन करायचे? तुम्ही पवारांची तारीफ केली तरी ते आता आपल्याकडे बघण्याची सुतराम शक्यता नाही. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा हा खेळ किती काळ खेळणार?’

ऐकताच आठवलेंनी खाडकन डोळे उघडले. बोलावेसे वाटत असूनही ते शांत राहिले. हे बघून दुसर्‍याला हुरूप आला. ‘गेली १२ वर्षे ते आपल्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत असताना तुमची भाषा इतकी सौम्य कशी साहेब? तुम्ही विसरले असाल पँथरचे दिवस पण आम्ही नाही.

अन्याय सहन करायचा नाही, कुणी करत असेल तर डरकाळी फोडायची हेच आपले तत्त्व. तुम्ही डरकाळी कधी फोडणार? सध्याच्या सत्ताधार्‍यांना विरोधक घाबरतील, आपण कशाला? तुमची गरज आहे त्यांना. याचा फायदा घ्यायचे सोडून तुम्ही ‘आमच्यावर अन्याय होत नसेल तरी युतीतील मोठ्या पक्षाने वाटा द्यावा’ असे कसे म्हणून शकता? अन्याय होतोय हे धडधडीत दिसत असताना तो सांगण्याची हिंमत का दाखवत नाही? इतके मवाळ बोलणे आपल्या पक्षाला शोभत नाही साहेब.’ विरोधाचा हा सूर वाढतोय हे लक्षात येताच आठवले उभे राहिले.

‘तुमच्या तीव्र भावना मी समजू शकतो पण जरा काळ कळ काढा. आपण ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासाठी आगामी काळ प्रतिकूल होत जाणार हे निश्चित. मला तरी तसे संकेत मिळू लागलेत. हळूहळू माझेही बोलणे आक्रमक होत जाईल. तुमच्या मनातल्या असंतोषाला सध्या वाट मोकळी करून द्यायची असेल तर कविता करा. त्याची सुरुवात मी करतो. हेच आजच्या बैठकीचे फलित.’ असे म्हणत ते वाचू लागले. आमच्या पक्षातही उमटत असतात लहानमोठ्या लाटा, मोठ्या पक्षांनी द्यायला हवा आम्हालाही वाटा.