‘हातभट्टीवर प्रेम करणार्या सर्वांचे स्वागत असो!’ असा फलक लावलेल्या शामियान्यासमोर रामदास आठवलेंचा ताफा थांबला. जमलेल्यांकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. गर्दीतील काहींनी हातातल्या बाटल्या फोडत आठवलेंचे स्वागत केले. झोकांड्या खाणार्यांच्या घोळक्यातून रामदासजी कसेबसे व्यासपीठावर पोहोचले.
तिथे बसलेल्यांच्या तोंडातून येणार्या तीव्र घमघमाटामुळे नाकाला रुमाल लावावा अशी त्यांची इच्छा झाली, पण बरे दिसणार नाही म्हणून त्यांनी ते टाळले. मग डुलत डुलत एक जण ध्वनिक्षेपकासमोर आला. तो कलंडू नये यासाठी एकाने त्याला धरून ठेवले होते. ‘हातभट्टीवाले मेरे यारो, या संकटात आपल्या बाजूने उभे राहण्याची हिंमत दाखवणारे आठवले साहेब हातभट्टीवाल्यांच्या संमेलनाला हजर झाले आहेत. त्यांचे दिलसे स्वागत’.
तेवढ्यात खालून एक जण वर आला व त्याने दारूच्या शिशीच्या झाकणांचा हार आठवलेंच्या गळ्यात घातला. त्याला खाली ढकलून संयोजकाने बोलायला सुरुवात केली. ‘पिंपरी चिंचवडमध्ये हातभट्टीची पिऊन २१ लोक ठार झाल्यापासून सारेच आमच्याकडे वाईट नजरेने बघू लागले आहेत. आम्ही हातभट्टीची का पितो याचा कोणी विचार करत नाही. (एक उठतो व ‘अड्डा उद्ध्वस्त करणार्या रोहित पवारांचा निषेध असो’ अशी घोषणा देतो). आम्ही दिवसभर कष्ट करून रात्री पितो व एकमेकांना सांभाळत घरी जातो.
कुणालाही त्रास देत नाही. काही लोक मेले असतील, पण भट्टीवाल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. चोरून, लपून मिश्रण करताना होते कधी चूक. सरकारने हातभट्टीला अधिकृत केले तर चुका होणारच नाही. (टाळ्या) आमची कमाईच एवढी कमी की आम्ही साधी देशी दारूसुद्धा पिऊ शकत नाही. स्वस्तात मिळणार्या हातभट्टीकडे सरकारने करुणेने बघावे, अशी विनंती मी याप्रसंगी करतो. पोलीस कारवाई सुरू असूनसुद्धा हातभट्टीवाल्यांनी या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो व आठवले साहेबांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करतो.’
डोळे बंद करून ऐकत बसलेले साहेब उठले. घोषणांच्या निनादात त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘तुमचे हातभट्टीवरचे प्रेम बघून मी गहिवरून गेलो. हे मला ठाऊक होते म्हणूनच मी या दारूला अधिकृत दर्जा द्या अशी मागणी केली. आजकाल आपल्या विचारांशी, कृतीशी प्रामाणिक राहणार्यांची संख्या कमी होत आहे. तुम्ही गरीब असूनही प्रामाणिकपणा पाळता याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे. (प्रचंड टाळ्या). आज देशी-विदेशी दारूचे चलन खूप वाढले आहे.
तुलनेने तुम्ही मागास. अशांच्या बाजूने उभे राहण्यातच माझे आयुष्य गेले. मी ही मागणी करून तुमच्या दु:खाला वाचा फोडली. ती मान्य झाली तर हातभट्टीला स्कॉचपेक्षा चांगले दिवस येतील. (प्रेक्षकांमधून सामूहिक आवाज येतो.‘येऽऽ बात’) माझ्या पक्षाला कार्यकर्त्यांची गरज आहे. तेव्हा तुम्ही सर्व जण त्यात प्रवेश करा व सरकारविरोधात लढा उभारा. रोज सायंकाळी एक तास आंदोलन केले तरी चालेल. तुमच्या पाठीशी माझ्या कविता असतील.’ असे म्हणून त्यांनी कविता सादर केली.
काळ बदलला आहे, नव्या विचारांची कास धरा मजुरांचा जीव वाचवायचा असेल तर हातभट्टी अधिकृत करा.
