‘‘चला चला चला रामलीला मैदानावर चला. आपल्या लाडक्या योगगुरू रामदेवबाबांनी शैक्षणिक सुधारणांसाठी राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी तारीख जाहीर केली नसली तरी आतापासूनच त्यांच्या नावाचा जयघोष करत दिल्लीकडे कूच करा. एकदा का गर्दी जमली की ते न राहवून नक्की येतील. सध्या देशात त्यांच्याच विचाराचे सरकार आहे. त्यात बसलेले ‘ते’ दोघे कधीही डोळे वटारतील व बाबा ‘कूच’ करण्याऐवजी ‘कच’ खातील असा विचार अजिबात मनात आणू नका. थोडे थोडके नाही तर तब्बल १२ वर्षांनंतर देशात सारे काही आलबेल नसल्याचा साक्षात्कार बाबांना झालेला आहे. तो त्यांच्या मन:पटलावरून पुसून जाण्याआधी तुम्ही गर्दीचा एक भाग होऊन जा. या १२ वर्षांत त्यांच्याच साधकांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत होता. ‘सब चंगा है जी’ असे रोज भल्या पहाटे सांगत बाबांनी बोलण्याची काही सोयच शिल्लक ठेवली नव्हती. आता त्यांच्याच घोषणेने या साधकांना घसा मोकळा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा या साधकांना साथ देण्यासाठी तनमनधनाने या आंदोलनात सहभागी व्हा! बाबांच्या त्यावेळच्या आंदोलनानंतर स्थापन झालेल्या आताच्या सरकारने स्विस बँकेतून आणलेला काळा पैसा शिक्षणक्षेत्रात वापरला जातोय अशी बाबांना शंका असणार, त्याचाही सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्वरा करा व दिल्ली गाठा. या वेळी बाबा गेल्यावेळसारखे ्त्रिरयांचे कपडे परिधान करून विशेष विमानाने हरिद्वारला पळून जाणार नाहीत. आताचे सत्ताधारी ‘त्यांचेच’ असल्याने प्रतिकार कसा करावा या संभ्रमात काही काळ राहतील. नेमकी हीच संधी साधून बाबा आंदोलन यशस्वी करून पुरुषी कपड्यात त्यांच्या आश्रमात परततील यावर विश्वास ठेवा. बाबांचे गेल्यावेळचे आंदोलन अण्णा हजारे प्रयोगानंतर झाले होते. आता ते दिपकेनंतर मैदानात उतरतो म्हणतात. याचा अर्थ ते मत्सरी आहेत असा काढू नका. अलीकडे त्यांच्या साधनेला गर्दी कमी होऊ लागली. ती वाढावी, जेन झी त्यात सहभागी व्हावेत यासाठी रचलेला हा डाव अशी कुशंका अजिबात घेऊ नका व नि:शंक मनाने दिल्लीला जाणार्या रेल्वेत बसा. या सरकारचे ‘काऊंट डाऊन’ सुरू झाले हे बाबांनी बरोबर ओळखले, या अर्थाने ते वातकुक्कुट आहेत, हवेची दिशा बघून तोंड वळवणारे आहेत असल्या वाईट विचारांना मनात अजिबात थारा देऊ नका. शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा एकमेव मापदंड म्हणजे योग हे वाक्य मनात घोळवत साधकासाठी आवश्यक असलेले पांढरे कपडे शिवून घ्या आणि मैदानाची वाट धरा. शैक्षणिक सुधाराचा आग्रह धरणारे बाबा किती शिकलेत? असल्या प्रश्नांच्या फंदात पडू नका. केवळ योगामुळे त्यांनी मिळवलेली अर्हता शैक्षणिक पदवीपेक्षा किती तरी मोठी आहे असा विचार करत ‘शिक्षण ठीक करो’ या आंदोलनात सहभागी व्हा!’’ – देशभर फिरणारा हा संदेश बघून हजारो लोक रामलीलावर जमू लागले तसे बाबा आनंदले व चलो दिल्ली असे म्हणत उठले. तेवढ्यात ईडी, सीबीआय, वस्तू व सेवाकर खात्यांचा ताफा आत शिरला. त्यातल्या एकाने बाबांना सांगितले. ‘आश्रम ठीक करो’ असा आदेश आहे!
उलटा चष्मा : ‘ठीक करो’!
चला चला चला रामलीला मैदानावर चला. आपल्या लाडक्या योगगुरू रामदेवबाबांनी शैक्षणिक सुधारणांसाठी राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-08-2026 at 01:19 IST | © The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdev baba ramlila maidan education protest satire loksatta css