राजा रणधीर सिंग हे भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे पहिले नेमबाज असले, तरी त्यांची खरी ओळख भारतीय क्रीडा क्षेत्राला जागतिक पातळीवर धोरणात्मक नेतृत्व देणारे ज्येष्ठ क्रीडा प्रशासक अशीच करून देता येईल. रणधीर सिंग यांनी निवृत्तीनंतर क्रीडा प्रशासनात प्रवेश केला आणि भारतीय ऑलिम्पिक चळवळीचे ते मुख्य शिल्पकार ठरले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात आणण्यापासून भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस ते आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे नेतृत्व करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अफाट प्रशासकीय कौशल्याची साक्ष देतो.
राजेशाही थाट असूनही खेळाडूंच्या हितासाठी सदैव तत्पर राहणारे राजा रणधीर सिंग यांच्या प्रशासकीय कौशल्याने भारतीय क्रीडा क्षेत्राला दिशा दिली. पंजाबमधील एका क्रीडाप्रेमी राजघराण्यात रणधीर सिंग यांचा जन्म झाला. वडील राजा भालिंद्र सिंग हे स्वत: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष होते. क्रिकेटपटू म्हणूनही त्यांनी नाव मिळविले होते. काका महाराजा यादविंद्र सिंग यांनी १९५१ च्या पहिल्या आशियाई खेळाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रणधीर सिंग यांचे भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न होते; परंतु एका राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान त्यांनी नेमबाजीचा सराव केला आणि पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातल्यावर मात्र शेवटपर्यंत बॅट किंवा चेंडूऐवजी रायफलला पसंती दिली. थायलंडमध्ये झालेल्या १९७८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी ट्रॅप प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. आशियाई खेळांमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले भारतीय नेमबाज ठरले. चार वर्षांनी १९८२ मध्ये भारतात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रणधीर सिंग यांनी याच स्पर्धा प्रकारात सांघिक रौप्य आणि वैयक्तिक कांस्यपदक मिळविले. ऑलिम्पिक खेळाडू म्हणून १९६४ मध्ये राखीव खेळाडू म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. पण, त्यानंतर १९६८, १९७२, १९७६, १९८०, १९८४ अशा सलग पाच ऑलिम्पिक स्पर्धांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. नम्र आणि खेळाडूंशी थेट संवाद साधणारे असे हे व्यक्तिमत्त्व. क्रीडाविश्वातील अनेक वाद आणि समस्या त्यांनी शांतपणे आणि मुत्सद्देगिरीने सोडवल्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळाचा अधिकृत समावेश करण्यामध्ये रणधीर सिंग यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. मूळचा भारतीय असलेला हा खेळ देशांतर्गत न राहता त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळवून देण्यात त्यांनी प्रशासकीय मुत्सद्देगिरीचा वापर केला.
प्रशासक म्हणून काम करताना खेळाडूंच्या समस्या दूर करण्यावर त्यांचा भर असे. भारतीय गुणवत्तेला जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा, तसेच परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी त्यांनी भारतीय क्रीडा धोरणात आवश्यक बदल केले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०१२ काही प्रशासकीय कारणांमुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर तात्पुरती बंदी घातली होती, तेव्हा खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून रणधीर सिंग यांनी वैयक्तिक स्तरावर आयओसीशी चर्चा करून भारतीय खेळाडूंना स्वतंत्र ध्वजाखाली खेळण्याची परवानगी मिळवून दिली. त्यांनी प्रशासक या शब्दाला एक नवी व्याख्या दिली. प्रशासक म्हणजे केवळ फाइल्सवर सह्या करणारा अधिकारी नव्हे, तर खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, देशाच्या मातीतील खेळाला जागतिक आकाशात मानाचे स्थान मिळवून देणारा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची पत वाढवणारा एक मुत्सद्दी नेता असतो, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले. त्यांच्या निधनाने भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक बहुपैलू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
