‘रॅण्डम हाऊस’ या प्रकाशन संस्थेच्या सहसंस्थापक बेनेट सर्फ यांच्याबद्दल गेल्या महिन्याभरापासून अमेरिकी आणि ब्रिटिश साहित्य मासिकांमध्ये भरपूर वाचायला मिळतेय. गेल फेल्डमन यांनी त्यांच्यावर लिहिलेले चरित्र ‘नथिंग रॅण्डम : बेनेट सर्फ अॅण्ड द पब्लिशिंग हाऊस ही बिल्ट’ हे नुकतेच प्रकाशित झालेय. साठोत्तरीत रॅण्डम हाऊस या प्रकाशन संस्थेने किती लेखकांना हुडकून प्रकाशझोतात आणले यांची यादी देखील वाचण्यात थकवणारी वाटू शकेल. ‘प्रकाशकांमधील प्लेबॉय व्यक्तिमत्त्व’ अशी ख्याती सर्फ यांनी मिळविलेली होती. तूर्त याच पुस्तकातील ट्रूमन कपोट या लेखकाच्या ऐतिहासिक आणि वादग्रस्त पुस्तकाच्या निर्मितबाबतची कथा तसेच आणखी एक वाचनीय लेख इथे मोफत वाचायला मिळेल.

https://tinyurl.com/bdcu6dww, https://tinyurl.com/2wrz2xwj

जॉर्ज सॉण्डर्सची भूतकथा…

‘लिंकन इन द बार्डो’ या कादंबरीला २०१७ साली बुकर पारितोषिक मिळाले, त्यानंतर जॉर्ज सॉण्डर्स यांचे कथात्म साहित्याचे लेखन तुरळक स्वरूपात दिसू लागले. न्यू यॉर्करमध्ये काही कथाच फक्त झळकल्या. तर आता भूतकहाणी घेऊन सॉण्डर्स लवकरच वाचकांना कादंबरी सादर करणार आहेत. दीर्घलेखांच्या स्वरूपातील पत्रकारिता आणि कथा लिहिणाऱ्या सॉण्डर्स यांचे दोन्ही स्वरूपातील लेखन कुणाही वाचकावर भुरळ पाडणारे. २००८ च्या अमेरिकी मंदीनंतर न्यू यॉर्क जवळ आडभागात कफल्लक नवगरिबांच्या तयार होणाऱ्या झोपड्यांत फाटका माणूस असल्याचे महिनाभर भासवून त्याने लिहिलेला ‘टेण्ट सिटी’ हा लेख ‘जीक्यू’ मासिकाच्या संकेतस्थळावर अजूनही वाचला जातो. तूर्त दुर्घनटनाप्रवण विमानातील प्रवास, भूतअस्तित्व आणि ट्रम्प यांच्या राजवटीबद्दल मतं व्यक्त करणारी, गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेली मुलाखत येथे वाचता येईल.

https://tinyurl.com/359xcadn