राजेश बोबडे

विश्वशांतीसाठी ग्रामजयंती असल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. ‘‘विश्वाकडे जाण्याची सर्वाचीच गती भरधाव आहे; पण ती आपल्या पंथाद्वारे, संताद्वारे, पक्षाद्वारे एवढेच त्यात महत्त्वाचे आहे. मला सध्या तरी असे अनुभवास येत आहे की जो तो म्हणतो आम्हीच विश्वव्यापी होण्यास लायक आहोत. तुम्ही विश्वापर्यंत भरधाव पोहोचाल तेव्हा चित्त घराच्या, ग्रामाच्या संप्रदायाच्या सुधारणेतच असेल का? म्हणे आमचीच जात श्रेष्ठ, पण हे श्रेष्ठत्व गुणांमुळे की नुसत्या उपाधीमुळे? कर्तृत्वामुळे की पूर्वपुण्याईमुळे?  सर्व धर्मात, पंथांत, जातींत पाहतो तिकडे उत्तम तत्त्वेच आढळतात व मी नम्र होतो. पण या सर्वाच्या अनुयायांच्या आचरणाकडे आज पाहून त्या तत्त्वांशी तुलना करतो, तेव्हा मात्र मन खिन्न होते व वाटते की हे सर्व पंथ, धर्म, जाती, संप्रदाय नाहीसे व्हावेत. तरच ते विश्व सजविण्यास लायक होतील. नाही तर विश्वसुद्धा त्यांच्या बजबजपुरीमुळे प्रत्येकाचे वेगळे ठरेल आणि ते मूक विश्व दुसऱ्या विश्वाला त्रास देईल. हा मोठा धोका आहे. प्रत्येक देश म्हणतो, की आम्ही विश्वशांतीसाठी लढाई करतो व प्रत्येक धर्म म्हणतो आम्ही विश्वाला सुखशांती देण्याचा ठेका घेतला आहे व प्रत्येक गुरू म्हणतो आम्हीच मोक्षाचे स्थान दाखवू शकतो. आता या सर्वाचे मोक्षही भिन्न, धर्मही भिन्न व शांतीही भिन्न मग हे एकाकार, ब्रह्माकार व सत्याकार, तत्त्वाकार कसे व कधी होणार?

तेव्हा माझे म्हणणे असे की, आता प्रत्येकाने आपले ग्राम, आपले घर, आपला समाज, आपला धर्म, आपला देश आपल्याच पूर्वजांच्या शुद्ध तत्त्वाप्रमाणे उत्तम व आदर्श करण्याची चढाओढ करावी व हे सर्वाना बघू द्यावे. दुसऱ्यावर मात्र लादू नये. समजून उमजून जे ज्याला पटेल ते त्याने आचरण करून दाखवून सिद्ध करावे. खरी शांती, खरी विश्वव्यापकता, आचरणात आणावी म्हणजे सर्वानाच त्याचा लाभ मिळेल. पण शहाण्याशी शहाणे मिळतच नाही. मिळणार असेल तरी मिळू न देणारे आडवे पडतात. ठगाशी ठगाचाच धंदा सध्या जोरात सुरू आहे. त्यांचीच चढाओढ सुरू आहे. प्रत्येक जण पाप करून नेता, साधू, पुढारी, श्रीमंत सत्ताधीश होतो. ते सर्वानी बघावे व कुणालाही मोठे व्हायचे असेल तर याच पापाच्या, भ्रष्टाचाराच्या दुर्जनतेच्या, गुंडगिरीच्या मार्गानी व्हावे असाच आदर्श घालून देणाऱ्यांची भाऊगर्दी झाली आहे. यातून कोणताही लाभ होणार नाही, केवळ सर्वनाश होईल, असे मला वाटते. बळी तो कान पिळी अथवा ये रे माझ्या मागल्या ही स्थिती दुरुस्त करायची असेल तर त्यासाठी सर्व धर्म, पंथ, जाती, गुरू यांनी आपले क्षेत्र आदर्श करून घर, ग्राम, प्रदेश, देश महापुरुषांच्या शुद्ध तत्त्वाप्रमाणे घडविण्याची शिकस्त करावी, म्हणजे सहजच आपली ग्रामजयंती विश्वजयंतीकडे जाईल. महाराज ग्रामगीतेत लिहितात..

विश्व ओळखावे आपणावरून।

आपणचि विश्वघटक जाण।

व्यक्तिपासूनि कुटुंब निर्माण।

कुटुंबापुढे समाज आपुला।।

rajesh772@gmail.com