राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बुवांच्या धर्मकार्याबद्दल सांगतात, ‘‘प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून राहणे व ‘मी जेवढा माझ्याकरिता तेवढाच समाजाकरिताही आहे’ हे अंत:करणात पटवून घेणे, या योगाने समाजाचाच नव्हे तर जगाचा प्रश्न सुटणार आहे. हाच विचार डोळय़ांसमोर ठेवल्यास बुवालोकांनीही फक्त एवढेच म्हणायचे काय की ‘आमचा देव करील काय ते! आमच्याने काय होते? आमचे काम आहे आपल्या संप्रदायाची परंपरा चालविणे व जो कोणी हरिकथा ऐकेल त्याला चार उपदेशाच्या गोष्टी सांगणे!’ मी म्हणेन, ठीक आहे. पण तेवढे तरी नित्यनियमाने व तारतम्यज्ञानाने हे लोक करतात का? की सांगतात केवळ रामराज्याच्या वेळच्या कथा आणि म्हणतात त्यांचा पाठ करा, मनन करा, ध्यान करा! आजच्या या जगात आम्हाला कशाची उणीव आहे,
आमच्यात काय यावयास पाहिजे आहे, याचे तारतम्यज्ञानही ते सांगत असतात काय? छे! कशाचे ज्ञान! मामुली माणसापेक्षाही ज्यांच्यात भेकडपणा भरलेला, मामुली गृहस्थापेक्षाही ज्यांचा लोभ वाढलेला, मामुली माणसाच्या लाखोपट ज्यांची आरामवृत्ती वाढलेली, ते निर्भयतेने सत्यमार्ग कसे सांगू शकतील? कदाचित ‘लोक नाराज होतील की काय? पुढारी रागावेल काय? राजा पकडून नेईल काय? गुंड लोक छळतील काय?’ या विवंचनांत ज्यांचा काळ जातो, त्यांना धर्माचे नि समाजाचे उद्धारकर्ते कोणत्या तोंडाने म्हणावे?’’ असा प्रश्न करून महाराज अधिक स्पष्टपणे सांगतात,‘‘कर्तव्याच्या बाबतीतही आम्हा लोकांत एवढा आळस की, जरा ज्ञानेश्वरीतल्या किंवा भागवतातल्या ओव्या पाठ झाल्या तर आम्ही कामधंद्यापासून कायमचे दूर गेलोच म्हणून समजा. थोडे दिवस एखाद्या संस्थेत ग्रंथवाचन केले की बुवाची पदवी मिळालीच! मग बुवापणाला काय लागते याचे ज्ञानही नसले तरी तो बुवाच! आणि असे बुवापण मिळाले की पहिले महत्त्वाचे कार्य म्हणजे दुसऱ्या बुवावर गुरकावणे व आपला मानमरातब फंदफितुरीने वाढवून घेणे. फारच झाले तर चमत्काराचे बंड उभारून शिष्यशाखा फैलावणे. बस आटोपले कार्य! वाहवारे कार्य आणि अशा कार्याला बळी पडणारे बुवा! असे सांगून महाराज ग्रामगीतेत लिहितात..
ज्यासी करणे नको काही।
त्याने द्यावी देवाची ग्वाही।
आपुली पापे लपवावी सर्वही। पाठीमागे।।
लोकात वाढवावा भ्रम।
आपुले चुकवावेत श्रम।
देवाचिया नामे चालवावे कुकर्म।
त्यांनीच समाज बुडविला।।