राजेश बोबडे

१९४२च्या स्वातंत्र्यलढय़ात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चिमुर व आष्टी  क्रांतीलढय़ात सक्रिय सहभाग घेतल्याने, इंग्रजांनी महाराजांना नागपूर व रायपूरच्या तुरुंगांत चार महिने डांबले. पुढे १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर महाराजांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, गृहमंत्री सरदार वल्ल्भभाई पटेल यांच्याकडे समाधान व्यक्त करतानाच देशाचा रामराज्याच्या संदर्भात आपले विचार व अपेक्षाही त्यांच्याकडे व्यक्त केल्या. महाराज म्हणतात, स्वातंत्र्याबरोबर आपणावर मोठीच जबाबदारी येऊन पडली आहे आणि आम्हा सर्वानी ती जबाबदारी ओळखून कर्तव्यतत्पर राहावयास हवे.

Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

रामराज्याचा दृष्टिकोन स्पष्ट करताना महाराज म्हणतात : ज्या राष्ट्रधुरिणांच्या, क्रांतिकारकांच्या आत्यंतिक त्याग, बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळाले त्यातून रामराज्य निर्माण व्हायला हवे. रामराज्य ज्याला म्हणतात ते माझ्या दृष्टीने तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा शासन पद्धती, व्यक्ती किंवा पक्षाच्या तंत्रावर अथवा केवळ मताधिक्यावरच अधिष्ठित होऊ नये. तिचे अधिष्ठान वास्तविक अशा प्रकारचे असावे की, ज्यामध्ये  मानवतेला अनुसरून तात्त्विक धारणा राहील. ग्रामोद्धार आणि ग्रामाच्या स्वयंपूर्णतेला महत्त्वाचे स्थान दिले जाईल. खेडय़ातील भांडणे न्यायालयापर्यंत न जाता, त्यांचा निकाल ग्रामपंचायती देतील; क्वचित एखादा खटला न्यायालयात जाईल. राष्ट्रातील प्रत्येक नवयुवकास सैनिकी शिक्षण मिळेल, अंतर्बाह्य आपत्तीपासून जनतेच्या रक्षणार्थ मोठी फौज नेहमी उपलब्ध राहील व युवकांना शिस्तीचे वळण लागेल. हाच माझ्या मते अहिंसेचा राजमार्ग आहे! प्रत्येकास अन्न, वस्त्र, निवारा, औषधी, शिक्षण, संरक्षण, हाताला काम आणि विश्रांती व प्रत्येकाला उन्नती करण्याची संधी मिळावी. व्यसनाधीनता कमी करण्याकरिता नियंत्रण ठेवावे. अस्पृश्यता कायद्याने ताबडतोब नष्ट करावी. नैतिकतेच्या दृष्टीने विधवा विवाहाला उत्तेजन द्यावे. उपयुक्त शिक्षणक्रम आखण्यात येऊन बुद्धिमान आणि कुशल विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने शिकवावे. धर्माच्या बाबतीत समदर्शित्व असावे. अध्यात्म व धर्माच्या नावावर होणारी भोंदूगिरी टाळण्यासाठी धर्मप्रचारकांकरिता परीक्षा असावी आणि प्रचारार्थ परवाने असावेत. सामुदायिक प्रार्थनेकरिता खुली मैदाने असावीत. महाराज सरतेशेवटी म्हणाले, जिथे अशी किंवा यासारखी जनहितसंवर्धक व्यवस्था नसेल, ते स्वराज्यही पारतंत्र्यच ठरेल. अन्यायाने वागणाऱ्या राजांच्या कायद्याप्रमाणे नाचणारा माझा धर्म नाही; सत्याला अनुसरून रामराज्य स्थापन करणाराच माझा धर्म आहे! या सद्धर्माप्रमाणे जे लोक आपल्याला धार्मिक समजून तसे वागत नाहीत, त्यांना मी अधर्मी किंवा इंद्रियांचे गुलाम समजतो. महाराज रामराज्याबाबत आपल्या भजनात म्हणतात :

सच्चे सेवक बनेंगे हम,

जब आजादी को पायेंगे।

घरघरमें आबादी देकर,

रामराज्य कहलायेंगे ।।

तुकडयादास कहे शांतीसे,

क्रांती कर दिखलायेंगे।

rajesh772@gmail.com