केवळ संपत्तीवर्धन हा हेतू न ठेवता ज्ञानवर्धन, आपल्या संपूर्ण क्षेत्राची वृद्धी आणि जोडीला सामाजिक भान ठेवून ते कार्यशैलीचा भाग बनविणारे विरळा. डॉ. एस. बी. तथा रवी पंडित हे अशा अपवादात्मक उद्योजकांतील एक. स्वत:चे उद्योग उभारून इतरांना त्यातून प्रेरणा देणारी जी मराठी नावे अभिमानाने घेतली जातात, त्यातील महत्त्वाचे.

पुण्यात मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेले, उत्तम शैक्षणिक कारकीर्द असलेले पंडित सुवर्णपदकप्राप्त सनदी लेखापाल. त्यांनी वडिलांची कीर्तने पंडित सनदी लेखापाल सेवा ही कंपनी पुढे फक्त चालविली नाही, तर विस्तारलीही. नंतर किशोर पाटील यांच्या साथीने ‘केपीआयटी’ सुरू केली. ‘केपीआयटी कमिन्स’ असलेल्या या कंपनीचे नंतर ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज’ या माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनीत रूपांतर झाले. जागतिकीकरणानंतर अनेक मध्यमवर्गीय मराठी मुले अमेरिकेत जाऊन नोकरी-करिअर सुरक्षित करत होते, त्याच काळात पंडित यांनी पुण्यात ‘केपीआयटी’ सुरू करून रोजगारसंधी तर निर्माण केल्याच, पण तरुणांमध्ये उद्योजकतेची प्रेरणाही जागविली.

पंडित यांची ही इतर माहिती तंत्रज्ञान सेवा कंपन्यांप्रमाणे केवळ सेवा पुरवठादार राहिली नाही. एखाद्या उत्पादन कंपनीच्या कार्यचलनासाठीच्या दैनंदिन प्रक्रिया पार पाडण्यासाठीची माहिती तंत्रज्ञान साधने पुरविणे एवढाच दृष्टिकोन त्यांनी ठेवला नाही. उत्पादन तयार करताना त्याची रचना, विकसन, चाचणी, कार्यान्वयन आणि देखरेख अशा सर्व प्रक्रियांसाठी अभियांत्रिकी तत्त्वांचे उपयोजन पुरविणे हा बदल त्यांनी केला. त्यामुळे वाहन उद्योगाचे इलेक्ट्रीकरण, स्वयंचलन होत असताना त्याच्या प्रणालींत केपीआयटीच्या सेवांचा भाग कळीचा झाला. म्हणूनच वाहन उद्योगातील अनेक बड्या नाममुद्रांसाठी केपीआयटी अपरिहार्य भागीदार बनली. नाममुद्राही कोणत्या, तर बीएमडब्ल्यू, रेनॉ, होंडा, टोयोटा, देन्सो अशा. सर्वार्थाने जागतिक ठसा. अलीकडच्या काळात ‘केपीआयटी’ने अनेक आमूलाग्र बदल करून कृत्रिम प्रज्ञा, आयओटी, डिजिटल ट्विन्स, क्लाउड कम्प्युटिंग असे नवे प्रवाह आत्मसात करून आपला सर्व भर वाहन अभियांत्रिकीवर ठेवला. २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीतील त्यांच्या समभाग किमतीत झालेली ७०० टक्के वाढ हे या बदलांचे फळ.

एकीकडे उद्योग वाढवताना शाश्वत विकास हा ध्यास पंडित यांनी सोडला नाही. हरित हायड्रोजनवरील वाहन निर्मितीतील पुढाकार हे त्याचे उदाहरण. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेबरोबर (एनसीएल) हरित हायड्रोजनवर आधारित इंधनघट निर्मितीत त्यांनी रस घेतला. सुरुवातीला चारचाकी, नंतर बस आणि नंतर छोट्या नौकेवर याचा प्रयोग झाला. एक नौका वाराणसीत कार्यान्वितही झाली. कृषी कचर्‍यापासून हायड्रोजन निर्मिती हाही त्यांच्या ध्यासाचा विषय. त्याची शाश्वत प्रक्रिया विकसित करताना हृदय – हायड्रोजन रिव्होल्युशन फॉर इंडियाज डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड एनर्जी ही संस्था स्थापन झाली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष असताना पुणे जागतिक व्यवसाय केंद्र म्हणून नावारूपात येण्याकरिता त्यांनी दोन दशकांपूर्वी रचलेला पाया आता प्रत्यक्षात येताना दिसतो. पुण्यातील ‘शून्य कचरा प्रकल्प’ मोहिमेतील सहभाग, ‘जनवाणी’ या कचरा आणि पर्यावरण प्रश्नावर काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेच्या स्थापनेत त्यांचा असलेला सहभाग ही त्यांच्या शाश्वत विकासाच्या दिशेने प्रवास करण्याच्या ध्येयातीलच पावले.

उद्योग क्षेत्रातील मराठी मुद्रा अलीकडे कमी होत असताना हे सांगायला हवे, की जागतिक पातळीवर काम करणारे रवी पंडित हे मनाने कायमच मराठी होते. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये मराठी माध्यमातून त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी इंग्रजीवर मेहनत घेण्यासाठी भरपूर इंग्रजी पुस्तके वाचली. गुणवत्तेच्या जोरावर अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठाच्या स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश मिळविला. पण, मराठीत शिकल्याचा आणि मराठी असल्याचा कायम अभिमान बाळगला. ‘मराठीने घडवलेले’ या ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केलेल्या विशेषांकातील लेखात त्यांनी म्हटले आहे, ‘मराठी शाळेत शिकल्याने आमच्यात रग होती. त्यामुळे भविष्यात कुठेही कमी पडणार नाही, हा आत्मविश्वास होता.’ पंडित यांची उद्यमशीलता आणि हा आत्मविश्वास आजच्या मराठी तरुणांतही उद्योजकतेची प्रेरणा जागवेल, ही आशा. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे या द्रष्ट्या उद्योजकास आदरांजली.