‘उपयोगशून्यांची उपेक्षा!’ हा अग्रलेख (लोकसत्ता ११ जून) वाचला. केंद्रीय मंत्रिमंडळातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची झालेली उपेक्षा हे त्यांच्या कर्माचे फळ आहे असे म्हणावे लागेल, कारण मूळ राष्ट्रवादीतील जे फुटून अजित पवार यांच्याबरोबर आले ते भाजपमध्ये आपल्याला काही तरी मिळेल या उद्देशाने आणि विशिष्ट अपेक्षेने! मोदींच्या करिष्म्याची त्यांनाही भुरळ पडली होती आणि आपण काहीही न करता त्यांच्या चेहऱ्याआडून सहज निवडून येऊ असेच या फुटिरांना वाटल्याने त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही. मतदारांनी आणि भाजप व शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांनीही त्यांना पाठिंबा दिला नाही आणि व्हायचे तेच झाले. अजित पवार यांच्या गटाचा म्हणावा तितका प्रभाव या निवडणुकीत दिसला नाही. स्वत:च्या बळावर आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे तंत्र अजित पवार यांना काही साध्य झाले नाही, त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर ते अगदी निस्तेज ठरले! ‘सुप्रिया सुळे संसदेत भाषण करतात तेव्हा आपण खाली राबत असतो म्हणून त्या निवडून येतात, नुसती भाषणे देऊन कोणी निवडून येत नाही’ असे अजित पवार या निवडणुकीदरम्यान म्हणाले होते. पण सुप्रिया सुळे यांच्या विजयाने हे उद्गार फोल ठरले आहेत! अजित पवार यांच्या गटाने या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपसाठी काही केले नाही, काही कष्ट घेतले नाहीत त्यामुळे त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत! काहीच केले नाही तर काय मिळणार?

● अनिरुद्ध गणेश बर्वेकल्याण

दोन्ही पक्षांबरोबर महाराष्ट्रही उपेक्षित

उपयोगशून्यांची उपेक्षा!’ हे संपादकीय (११ जून) वाचले. सत्ता मिळवून ती टिकवण्यासाठी भाजपचे केंद्रातील सर्वोच्च नेतेद्वय सातत्याने बेरजेचे गणित करत आले आहे. मात्र यावेळी गणित चुकले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या रालोआतील प्रवेशाने बेरीज तर झाली नाहीच, होत्या त्या जागांतही वजाबाकी झाली. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेस सत्तेत नाममात्र तरी वाटा मिळाला, पण अजित पवारांना तोही नाकारला जाऊन उपेक्षा करण्यात आली. या दोन्ही पक्षांना उपेक्षित ठेवताना भाजपने महाराष्ट्राचीही उपेक्षा केली आहे. मूळ पक्षांत शिंदे- अजित पवार यांना पुरेसा वाव आणि योग्य तो मान मिळत असतानाही ते रालोआत गेले आणि हाती होते, तेही गमावून बसले. तेलही गेले, तूपही गेले हाती मात्र धुपाटणे तेवढे उरले, अशी दारुण अवस्था शिंदे आणि दादांची झाली आहे.

● बेंजामिन केदारकर, नंदाखाल (विरार)

हेही वाचा >>> लोकमानस : ‘सेबी’ने दखल घेणे अपेक्षित होते

हा बाणेदारपणा नव्हे अपरिहार्यता!

उपयोगशून्यांची उपेक्षा’ हा अग्रलेख वाचला. अजित पवार यांचे माघारी परतण्याचे मार्गही बंद झाले आहेत. त्यांचे काका मित्र पक्षांसह मिळालेल्या यशावर अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेऊन निश्चितच पाणी पडू देणार नाहीत. पहाटेच्या शपथविधीची गोष्ट वेगळीच होती. यावेळी नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही हिसकावून घेतले. विरोधात बसून जनतेचा पक्षी: राज्याचा विकास करता येत नाही म्हणून महायुतीत आलो, हे अजित पवार यांनी दिलेले स्पष्टीकरण खोटे होते, हे ओळखल्याचे जनतेने या लोकसभा निवडणुकीत त्यांना दाखवून दिले. अजित पवार यांची अवस्था बघून भाजपने या पक्षाला मंत्रिमंडळात त्यांचे स्थान दाखवून दिले. या पक्षाने राज्यमंत्रीपद नाकारून बाणेदारपणा दाखवला असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण त्या बाणेदारपणाला कुणी हिंग लावून विचारले नाही. त्यामानाने एकनाथ शिंदे जास्त यशस्वी झाले म्हणायचे. पक्ष फोडून आले आणि मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ते निश्चितच समाधानी असतील. अजित पवार यांना तेही समाधान मिळवता आले नाही. आता विधानसभेत अजित पवार यांची वापसी नाही झाली तर त्यांची अवस्था मनसेसारखी होईल.

● अशोक साळवेमालाड, मुंबई

निष्ठावंतांची नाराजी दूर करावी लागेल

उपयोगशून्यांची उपेक्षा!’ हे संपादकीय वाचले. देवेंद्र फडणवीस यांची गेली अडीच वर्षे होणारी घुसमट बाहेर पडणे स्वाभाविक होते. इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळात राज्यांच्या कारभारात जी ढवळाढवळ केली, त्यापेक्षा आधिक उचापत्या भाजपने आपल्या कार्यकाळात केल्या. एकनाथ शिंदे यांच्या ध्यानीमनीही नसताना त्यांना मुख्यमंत्री केले. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांचे खच्चीकरण केले. तिथेच केंद्रीय नेतृत्वाचा पाय घसरला. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप असलेले अनेक नेते ज्या पक्षात आहेत, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपने फोडला. राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याची काहीच गरज नव्हती, हे सामान्य कार्यकर्त्यांनाही कळत होते. ही भाजपची दुसरी चूक ठरली आणि महाराष्ट्रात भाजप उताणा पडला. आता निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करायची असेल तर स्वतंत्रपणे लढावे. गेल्या वेळचे अनुभव बघता युती निवडणुकीनंतरही करता येते. निदान मतदारांना फसवल्याचे पाप तरी पदरी पडणार नाही.

● श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)

हेही वाचा >>> लोकमानस: ‘काजव्यां’ना यापुढेही जागे राहावे लागेल..

भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण भाजपला भोवली

पहिली बाजू’ या सदरातील ‘बाधाये आती है आएँ…’ हा केशव उपाध्ये यांचा लेख (११ जून) वाचला. ‘सत्ता हे आमचे उद्दिष्ट नाही’, ‘अपप्रचारामुळे मतदारांच्या मनात भयगंड निर्माण झाला’, ‘आम्हाला स्पष्ट जनादेश मिळाला’ वगैरे भ्रम अजूनही ते मांडत आहेत हे गमतीशीर आहे. वास्तविक गेल्या दोन निवडणुकांवेळी इतर पक्षांच्या भ्रष्ट कारभाराला वैतागून जनता भाजपकडे गेली होती. पण भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण करण्यात भाजपचे वॉशिंग मशीन अग्रस्थानी असल्याचे भाजपने सातत्याने सिद्ध केले. पवार आणि चव्हाण, ज्यांच्यावर कालपरवापर्यंत आरोप केले त्यांनाच बरोबर निवडणुकीआधी कडेवर घेण्यात आले. जोडीला, शेवटचा महिनाभर मोदींनी अत्यंत विखारी अपप्रचार केला. त्यामुळे भाजप हाही दुसरा काँग्रेसच आहे हेही आता तटस्थ मतदारांच्या लक्षात आले आहे आणि ते निकालात प्रतिबिंबित झाले आहे. विशेष म्हणजे ईडी, सीबीआय, आयटी, ईसीआय, अनेक माध्यमे दिमतीला असतानाही भाजपची ही अवस्था झाली, हे विशेष. यावर उपाय एकच आहे, पक्षाची जुनी प्रतिमा पुन्हा मतदारांच्या मनात ठसवावी लागेल. तीदेखील कृतीतून, भाषणातून नाही.

● सुधीर किर्लोस्करठाणे

यशाचे मोजमाप टक्क्यांत नव्हे जागांतच!

पहिली बाजू’ सदरातील ‘बाधाये आती है आएँ…’ हा लेख (११ जून) वाचला. या लेखात, जनतेने काँग्रेसला नाकारल्याचा तर्क मांडला आहे तर या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीचा सोयीस्कर निकष वापरून जागा कमी झाल्या तरी भाजपला जनतेने कसे नाकारले नाही, हे बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे.

मुळात, मतांच्या टक्केवारीचा निकष ही सोयीस्कर व स्वांत:सुखाय कल्पना आहे. आपल्या संसदीय लोकशाही प्रणालीत जिंकलेल्या जागांच्या आधारेच यशाचे मूल्यमापन केले जाते. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा दुप्पट झाल्या, हे जसे त्यांचे यश आहे तसेच ‘अबकी बार चारसो पार’च्या घोषणेच्या तुलनेत मिळालेल्या २४० जागा हा निश्चितच भाजपचा पराभव आहे. महाराष्ट्रात मोदींच्या झालेल्या सभांपैकी किती ठिकाणी भाजप जिंकला यावर ‘ब्रँड मोदी’चे आणि या निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या आधारावर राज्यातील निवडणूक निकालाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. विरोधी पक्षांची आघाडी व संविधान बदलाच्या हाकाटीला दोष देताना, या मुद्द्यांना समर्पकपणे सामोरे जाण्यात भाजप अयशस्वी ठरला हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. धार्मिक आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा विरोधकांवर आरोप करण्यापूर्वी मंगळसूत्रापासून जास्त मुले असणाऱ्या समाजापर्यंतच्या मुद्द्यांवर लेखकाने चिंतन करावे.

● हेमंत सदानंद पाटीलनाळे (नालासोपारा)

बरे झाले; सोनारानेच कान टोचले!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘मिलीजुली’ सरकारचे अभिनंदन करताना ‘देशाची परिस्थिती सुधारली असली तरी अजून बरेच प्रश्न बाकी असल्याने केंद्र सरकारने सर्व सहकारी आणि विरोधी पक्षांचा आदर राखून देशाचा कारभार केला पाहिजे’ अशी समज सरकारला दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘भाजप आता सक्षम असून संघाची आम्हाला गरज नाही’ अशी फुशारकी मारली होती. परंतु जागरूक व समज असणाऱ्या मतदारांनी हवेत उडणाऱ्या या पक्षाच्या फुग्यातील हवा काढून घेतली. आता केंद्र सरकार ‘मोदी’ किंवा ‘भाजप सरकार’ राहिले नसून एनडीए सरकार झाले आहे. याचे भान ठेवण्याचा इशारा भागवत यांनी दिल्याचे दिसते. ● अनंत आंगचेकर, भाईंदर