‘पश्चिम अशियात युद्धाग्नी’ ही लोकसत्ता (०१/०३)मधील बातमी वाचली. इराणमधील राजवट उलथवून लावायचीच आणि आपल्या विचारांचे सरकार आणायचे असा अमेरिकेचा अट्टहास आहे. मी भारत-पाकसह आठ युद्ध थांबवली असा दावा करणारे ट्रम्प हे एकीकडे ते शांतिदूत असल्याचा आव आणतात तर दुसरीकडे जगाला युद्धाच्या खाईत ढकलतात. तिकडे गेल्या अडीच-तीन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे, अधून मधून पाकिस्तान – अफगाणिस्ताना यांच्यात चकमकी होत आहेत. इराणने प्रत्युत्तर देताना शेजारी आठ देशांतील अमेरिकेच्या तळांना लक्ष केले असल्याने आजच्या घडीला जवळपास ११ देश युद्धात ओढले गेले आहेत आणि जगावर तिसर्या महायुद्धाचे सावट पसरले आहे. हा सर्व ‘तेल का खेल’ चालला आहे, हे खरे पण जाणारे जीव- होणारे नुकसान रोखणार कोण? संयुक्त राष्ट्र संघटना ही तर केव्हाच निष्प्रभ ठरली आहे. या सगळ्यात भारताचीदेखील मोठी कसोटी लागणार आहे, गेल्या काही वर्षांपासून भारताचे परराष्ट्र धोरण कुठेतरी चुकते आहे का याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. युद्ध लांबल्यास त्याचा विपरीत परिणाम भारतावरदेखील होऊ शकतो. जगात शांततेची गरज असताना युद्धामुळे मात्र जगात अशांतता निर्माण झाली आहे आणि यामुळे केवळ आणि केवळ नुकसानच होत आहे. – अनंत बोरसे, शहापूर (जि. ठाणे)
युद्ध लोकशाहीविरोधीच
‘पश्चिम आशियात युद्धाग्नी’ ही बातमी (लोकसत्ता १ मार्च) वाचली. एका स्वतंत्र देशावर अमेरिकेने जो हल्ला केलेला आहे. त्याचा निषेध प्रत्येक लोकशाहीवादी नागरिकांनी करणे आवश्यक आहे. अमेरिकेने अण्वस्त्र विकास कार्यक्रमाबाबतचे सर्व प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवणे आवश्यक होते. त्याबाबत चर्चा करणे आवश्यक होते .परंतु चर्चा अपुरी असतानाच हल्ला करणे. एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर हल्ला करण्यासारखे आहे. हा हक्क अमेरिकेला नाही. जगात शांतता आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. दुसर्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या संघटनेला सर्वांनी मदत करणे आवश्यक होते. तरच लोकशाही आणि लोकांचे स्वातंत्र्य जपले गेले असते. इराणमध्ये जरी लोकशाही नसली तरी तेथील सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. युद्ध हे लोकशाहीच्या संकल्पनेलाच आव्हान आहे. – युगानंद गुलाबराव साळवे, पुणे</strong>
पालकांची संमती की समाजाचा दबाव?
‘संमतीने प्रेम?’ हे संपादकीय (२८ फेब्रुवारी) वाचले. कोणतीही नवीन गोष्ट एकाएकी स्वीकारली जात नाही. त्याला विरोध हा होतोच ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या पुस्तकालासुद्धा विरोध झालाच. प्रेमविवाह होऊ द्यायचे नाहीत कारण ‘मुलींना फसवले जाते’ असा एक दृष्टिकोन आहे. परंतु जातीयवाद नष्ट करण्यासाठी ही योजना सर्वोत्तम आहे असे अनेक महापुरुषांनी सांगितले होते. हे प्रेमविवाह होऊ न देण्यामागे जातीयवादी दृष्टिकोन आजही असू शकतो. आजही ग्रामीण भागात विशेषत: आंतरजातीय प्रेमविवाह करणार्या तरुण-तरुणीच्या आई-वडिलांना ‘वाळीत टाकले जाते’ हेही विसरून चालणार नाही. जे प्रेमविवाह करतात त्यांना उदाहरणासाठी मंजुळे यांचा ‘सैराट’ आहेच. – ओ. म. चिंचोलकर (पुणे )
‘एआय’ नव्या संधी निर्माण करेल…
‘एआय’मुळे खरेच नोकर्या जाणार, की…?’ हा लेख (रविवार विशेष- १ मार्च) वाचला. याचे उत्तर पूर्णपणे ‘हो’ किंवा ‘नाही’ असे सरळ नाही. ‘एआय’ ही मानवनिर्मित तंत्रज्ञान प्रणाली आहे. त्यामुळे तिची निर्मिती, देखभाल, नियंत्रण आणि सुधारणा करण्यासाठी माणूस आवश्यकच राहणार. मात्र, हेही तितकेच खरे आहे की ‘एआय’ काही पारंपरिक आणि पुनरावृत्तीच्या (रिपीटिटिव्ह) कामांमध्ये मानवी श्रमांची जागा घेऊ शकते. संगणकांचा उदय झाला, तेव्हादेखील अशीच भीती व्यक्त झाली होती की नोकर्या संपतील. काही कामे कमी झाली, पण त्याचबरोबर नवीन क्षेत्रे आणि नवी कौशल्ये निर्माण झाली. लोकांनी स्वत:ला अद्ययावत केले आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले. ‘एआय’च्याही बाबतीत असेच होणार आहे. नोकर्या पूर्णपणे नाहीशा होणार नाहीत; त्या बदलणार आहेत. आता गरज आहे ती नवीन कौशल्ये आत्मसात करणे, तांत्रिक ज्ञान वाढवणे, सर्जनशीलता/ विश्लेषण क्षमता जोपासणे याला महत्त्व देण्याची. ‘एआय’ एक साधन आहे. योग्य वापर केल्यास ते रोजगार हिरावून घेणार नाही, उलट नवीन संधी निर्माण करेल. – अमोल आप्पा हारदे, नाशिक
डेटा सेंटर्स अवकाशातच बरी…
‘‘डिजिटल’ भारताला आता आकाशाचे वेध’ हा ऑर्बिटर एआय डेटा सेंटर्सविषयीचा चिन्मय गवाणकर यांचा माहितीपूर्ण लेख (रविवार विशेष- १ मार्च) वाचला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्सची आवश्यकता आणि ती चालवण्यासाठी पृथ्वीवरील वीज, पाणी अशा नैसर्गिक स्रोतांचा होणारा प्रचंड वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. सद्य परिस्थितीत मात्र सत्ताधारी आणि ‘एआय’समर्थक फक्त चांगली आणि व्यावहारिक बाजूच दाखवत आहेत. अशा परिस्थितीत अवकाशातील डेटा सेंटर्स हा माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी उत्तम पर्याय आहे. भारताच्या नवीन पिढीतील स्टार्टअप उद्योजक आणि अभियंते यांनी अशा नवीन क्षेत्रात अधिकाधिक लक्ष देण्याची गरज आहे. – एम. एस. नकुल, विरार
न्यायालयीन व्यवस्थापनात नियम निराळे?
‘न्यायव्यवस्थेची शोकांतिका’ हा हरीश एस वानखेडे यांच्या ‘सिनेकारण’ या सदरातील लेख (२६ फेब्रुवारी) वाचला. पूर्वापार ऐकत आलेले ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ हेच खरे वाटावे अशी परिस्थिती चित्रपटांतूनही दिसणारच. माझी स्वत:ची एक वैयक्तिक केस मी साधारणपणे जुलै २०२५ रोजी माननीय मुख्य न्यायालय, मुंबई येथे दाखल केली. पहिल्या तारखेला समोरच्या वकिलाने ऑब्जेक्शन घेतले की, ही केस ज्या माननीय न्यायाधीशांसमोर होती, त्यांच्याकडे कोर्टाच्या ठरलेल्या व्यवस्थेप्रमाणे नसायला हवी. माननीय न्यायाधीशांनी सांगितले की रजिस्ट्रारकडे चेक करा. रजिस्ट्रारसाहेबांनी नीट तपासून पुन्हा त्याच न्यायाधीशांकडे पाठवले. पुन्हा दुसर्या तारखेला तेच ऑब्जेक्शन. यथावकाश रजिस्ट्रारसाहेबांनी सांगितले, ही केस दुसर्या न्यायाधीशांकडे जायला हवी! दुसरा मुद्दा, जर एखाद्या कोर्टात सरासरी रोज ३० केसेस ऐकल्या जात असतील, तर बोर्डावर ६० केसेससाठी तारीख दिली जाते . म्हणजे ज्यांच्या केसेसचा नंबर शेवटी आहे, त्यांनी दिवसभर बसून पुन्हा पुढची तारीख घ्यायची. कदाचित माननीय कोर्टाच्या व्यवस्थापनाचे काही वेगळे नियम असू शकतील, असे म्हणत समाधान करून घ्यायचे. – चंद्रशेखर सावंत, मुलुंड
अंतर्मुख करणारा बौद्धिक आनंद!
बुकर विजेते लेखक ज्युलिआन बार्न्स यांची शैली प्रगल्भ आणि बौद्धिक आहे. मानवी स्मृती किती फसव्या असू शकतात आणि आपण आपल्या भूतकाळाची पुनर्रचना सोयीनुसार कशी करतो, हे त्यांच्या लेखनाचे मुख्य सूत्र आहे. त्यांच्या साहित्यात उपरोध व मानवी दु:खाचे सूक्ष्म, नेमके चित्रण आढळते.
या लेखकाची ओळख मला एका रंजक योगायोगाने झाली. ‘शेवटचं प्रस्थान कसं असतं?’ हा सई केसकर यांचा लेख (बुकमार्क- २८ फेब्रु.) वाचताना मला जयपूरप्रवासाची आठवण झाली. एका हॉटेलमध्ये पंधरा दिवस वास्तव्यास असताना एका पुस्तकप्रेमीच्या हातात त्यांचे पुस्तक दिसले. मी त्यांच्याशी गप्पा मारल्या; आणि त्या पुस्तकप्रेमींनीही वाचून झालेले ते पुस्तक मला वाचायला दिले. त्यानंतर मी ‘नथिंग टु बी फ्रायटन्ड ऑफ’ हे मृत्यूच्या भीतीवर आणि ईश्वराच्या अस्तित्वावर भाष्य करणारे चिंतनशील पुस्तक, तसेच ‘द लेमन टेबल’ हा वृद्धापकाळ आणि मृत्यू या विषयांवरील कथासंग्रह वाचला. याशिवाय ‘फ्लोबेर्स पॅरट’ आणि ‘लेव्हल्स ऑफ लाइफ’ या पुस्तकांतून त्यांनी जीवन आणि मृत्यूचे सूक्ष्म तत्त्वज्ञान उलगडले आहे. बार्न्स यांचे साहित्य आजही वाचकाला मानवी अस्तित्वाचा आणि आठवणींचा शोध घ्यायला भाग पाडते. हा लेखक वाचताना एक वेगळाच, बौद्धिक आणि अंतर्मुख करणारा आनंद मिळतो—हे मी स्वत: अनुभवले आहे. – राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली
