‘विश्वविजयातून विश्वभानाकडे…’ हा अग्रलेख आणि ‘दिग्विजयामागचा खडूस नायक’ हा वृत्तलेख (४ नोव्हेंबर) वाचला. हे ‘महिला सबलीकरणाचे केवळ एक दालन ठरते. इतर अनेक दालने बंदच आहेत…’ आणि ‘हरमनप्रीतच्या संघाची तुलना कपिलदेव यांच्या १९८३ मधल्या संघाशी करणे टाळायला हवे,’ हे खरेच. संघाचा प्रशिक्षक अमोल मुजुमदारच्या योगदानाचा गौरव होणेही रास्तच. मात्र संघाचे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यांचा उल्लेख फार कुठे होताना दिसत नाही. कारण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या बाजू कमकुवत असल्यास संघाची कामगिरी प्रभावी होऊ शकत नाही. या विश्व विजेत्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते माजी भारतीय क्रिकेटपटू आविष्कार साळवी तर मुनीश बाली यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली.
आविष्कार हादेखील मुंबईचा. त्याची गोलंदाजी शैली महान ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅकग्रा याच्याशी मिळतीजुळती होती. मात्र सततच्या दुखापतीमुळे आविष्कारची कारकीर्द उल्लेखनीय झाली नाही. अमोल आणि आविष्कार यांनी मैदानाबाहेर विलक्षण योगदान देऊन मैदानावर संधीअभावी हुकलेले यश विसरायला लावले. नव्या भूमिकेत मिळालेल्या संधीचे सोने केले. याखेरीज अशोक अय्यंगार (स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच), भारतीय संघाच्या वैद्याकीय अधिकारी डॉ. हरिनी मुरली, राखी दरणे (चिफ फिजिओ), आकांक्षा सत्यवंशी (फिजिओ) आणि अनिरुद्ध देशपांडे (परफॉर्मन्स अॅनालिस्ट) यांचेही योगदान विसरता कामा नये!
आपले महिला क्रिकेट आता बऱ्यापैकी प्रगत होत चालले आहे. अनेक ज्येष्ठ आणि निवृत्त महिला क्रिकेटपटू (डायना एडलजी, झुलन गोस्वामी, शांता रामास्वामी, मिताली राज, अंजुम चोप्रा वैगरे) आपल्याकडे उपलब्ध आहेत. भारतीय क्रिकेट परिषदेने यांना आता महिला क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनात सहभागी करून घेतले पाहिजे. शिवाय समालोचनासाठीदेखील या महिलांना संबंधित माध्यम संस्थांनी करारबद्ध केले पाहिजे. महिला क्रिकेटमध्ये पुरुषांचा सहभाग थांबण्याची वेळ आली आहे.
● प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार, नाशिक
वाढत्या समृद्धीतील शाप
‘विश्वविजयातून विश्वभानाकडे…’ हा अग्रलेख वाचला. त्यात भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या १९८३ मधील विश्वचषक विजयासंदर्भात, ‘भारतीय क्रिकेट सुधारले की बदलले,’ असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. याचे उत्तर ‘दोन्ही’ असे आहे. १९८३ च्या वेळची भारतीय क्रिकेटची स्थिती आजच्या बांगलादेश क्रिकेटसारखी होती. एक बऱ्यापैकी दर्जाची पातळी गाठून क्रिकेट तिथेच रेंगाळत होते. सामना अनिर्णित राखणे किंवा हरलेल्या सामन्यात आपल्या एखाद्या खेळाडूने शतक करणे वा पाच बळी घेणे यातच समाधान मानले जात असे. पण १९८३ च्या विजयानंतर जिंकण्याची वृत्ती वाढली. खेळाडूंचे कौशल्य व तंदुरुस्ती यावर लक्ष केंद्रित केले जाऊ लागले. आता तर जवळपास गेली २० वर्षे भारतीय संघ सर्व क्रिकेट प्रकारांत पहिल्या तीन संघांदरम्यान स्थान टिकवून आहे. या सुधारणेचे श्रेय काही प्रमाणात १९८३ च्या विश्वविजयालाही आहेच. त्या विश्वविजयामुळे पैशाचा ओघ वाढला, पण त्यातूनच पुढे मॅच फिक्सिंगसारखे गैरप्रकारही घडले. सतत वाढत्या समृद्धीला असा शाप असतोच. फुटबॉलमध्येही हाच प्रकार दिसतो.
● राजेंद्र करंबेळकर, निगडी (पुणे)
महिला क्रिकेटचा सन्मान वाढेल
‘विश्वविजयातून विश्वभानाकडे…’ हा अग्रलेख वाचला. भारतीय महिला क्रिकेटच्या या सुवर्णक्षणामुळे देशातील क्रीडा क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर भारताने महिला क्रिकेट विश्वचषक जिंकून जागतिक क्रिकेटच्या पटलावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हा विजय भारतीय महिला क्रिकेट संघाच्या दीर्घ संघर्षाचा आणि आत्मविश्वासाचा परिपाक आहे. भारतातील प्रत्येक मुलीला स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देणारा हा क्षण आहे. महिलादेखील जागतिक स्तरावर यश संपादन करू शकतात, हे भारतीय संघाने सिद्ध केले. या विजयामुळे आता महिला क्रिकेटला अधिक सन्मान मिळेल, संधी मिळतील आणि भारत क्रीडाजगतात नव्या तेजाने उजळून निघेल.
● प्रा. डॉ. योगेश खेडेकर, बल्लारपूर (चंद्रपूर)
कबड्डीकडे दुर्लक्ष का?
‘विश्वविजयातून विश्वभानाकडे’ हे संपादकीय वाचले. क्रीडा क्षेत्रात एक महत्त्वाची उणीव जाणवते, ती म्हणजे आशियाई मुलींच्या आणि पुरुषांच्या ‘प्रो कबड्डी लीग २०२५’ला चांगला प्रतिसाद मिळाला. यूट्यूबवर तिचे प्रक्षेपण होते. परंतु कबड्डी सामन्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नाही. कबड्डी आणि त्या आधी हुतुतू हा महाराष्ट्रात प्रत्येक वाडी वस्तीवर, गल्लीत खेळला जाणारा खेळ. आज कबड्डी बऱ्याच देशांत खेळली जाते. प्रो कबड्डी लीगमध्ये इराण, मलेशियातील खेळाडू येतात. मुलींच्या आशियाई स्पर्धेत श्रीलंका, बांगलादेश आणि इराणचे संघ आहेत. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती पूजा नरवालच्या गावात प्रत्येक घरात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असल्याने तिचे गावात कोणाला फारसे कौतुकही वाटत नाही, असे ती अभिमानाने सांगते. तमिळनाडूने नवीन तंत्र शिकवले आहे. मुलींच्या संघाची उपकप्तान कार्तिकी सध्या स्टार खेळाडू आहे. कबड्डीचा प्रसार आणि विकास यासाठी दिवंगत बुवा साळवी यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे या खेळालाही माध्यमांतून प्रसिद्धी मिळणे गरजेचे आहे.
● जयप्रकाश नारकर, वसई
टीका करण्यापेक्षा विषय तडीस न्या
‘कर्तृत्वहीनांचा कांगावा!’ हा केशव उपाध्ये यांचा ‘पहिली बाजू’ सदरातील लेख (४ नोव्हेंबर) वाचला. परिवारातील बौद्धिकांप्रमाणे मूळ विषय सोडून गावभरच्या गप्पा त्यात नेहमीप्रमाणेच आल्या आहेत. मूळ विषय निवडणूक आयोगावर मोर्चा नेलेल्या पक्षांचे कर्तृत्व हा नसून मतदार यादीतील गोंधळ हा आहे. लोकशाहीचा कणा असलेल्या सामान्य माणसाच्या मतावर जर टाच येणार असेल तर लोकशाही राहील का, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. एकीकडे लोकांची मते मिळाली नाहीत म्हणून इतर पक्षांना हिणवणारे उपाध्ये त्याच लोकांच्या मतदानासारख्या मूलभूत हक्कावर जी गदा आली आहे, त्याविषयी काहीच बोलत नाहीत. हे नेहमीसारखे दुतोंडी आणि आपल्याला पाहिजे तोच निष्कर्ष न्यायाधीशांच्या तोऱ्यात जाहीर करण्यासारखेच झाले. भाजप नेतृत्वाने इतरांवर राजकीय टीका करण्याऐवजी, हा विषय तडीस नेणे गरजेचे आहे.
● विक्रम अवसारीकर
भाजपची झोप उडाल्याचे स्पष्ट!
‘कर्तृत्वहीनांचा कांगावा!’ हा केशवरावांनी ‘पहिली बाजू’ सदरात लिहिलेला लेख (४ नोव्हेंबर) वाचला. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने यांच्या राष्ट्रीय पक्षाची झोपच उडाल्याचे त्यावरून स्पष्ट झाले. हा पक्ष कावराबावरा झाला असून अगतिकतेने आदळआपट करत असल्याचे दिसते. जनता या सर्कशीला थारा देणार नाही असे उपाध्ये म्हणतात, मात्र त्यांच्या पक्षाच्या डोंबाऱ्याच्या खेळालाही मतदार कंटाळले आहेत. भाजपने शिवसेनेच्या कडेवर बसून, गोड गोड बोलून अखेर विश्वासघात केला. असे करूनच हा पक्ष महाराष्ट्रात मोठा झाला. आता भाजपला सारे काही गिळंकृत करायचे आहे.
● अनिल जाधव, वाशी (नवी मुंबई)
सातत्यपूर्ण ज्ञानार्जन ही काळाची गरज
‘टीईटीचा घोळ कसा संपणार?’ हा गिरीश सामंत यांचा लेख (४ नोव्हेंबर) वाचला. शिक्षण क्षेत्रात काम करायचे असेल तर सतत शिकणे अन् शिकवणे अनिवार्य असते. यूजीसीचा वेतन आयोग येतो तेव्हा प्राध्यापकांच्या शैक्षणिक अर्हतेत वाढ केली जाते. पाचव्या वेतन आयोगात अभियांत्रिकी महाविद्यालयात फक्त पदवी शिक्षणाच्या आधारे अगदी प्राध्यापक पदावर पोहोचता येत असे. सहाव्यात पदव्युत्तर तर सातव्यात पीएच.डी. अनिवार्य करण्यात आली. मी स्वत: वयाच्या ४५ व्या वर्षी आयआयटीतून एमटेक केले. उशीर झाला म्हणून माझी वेतनवाढ सलग दहा वर्षे, रोखली होती. तो निर्णय मी स्वीकारला. प्रशासनातील कुलसचिव पदावरील माझ्या काही मित्रांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता. तो मी नाकारला. ब्रिटनमध्ये दर काही काळानंतर वैद्याकीय प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनाही परीक्षा द्यावी लागते. उत्तीर्ण झालेल्यांनाच परवान्याची मुदत वाढवून मिळते. शिक्षकांनीही सतत ज्ञानार्जनाचा ध्यास बाळगणे गरजेचे आहे. आयटी क्षेत्रात ज्यांना नोकरी गमावावी लागते, त्यापैकी बहुतेकांनी नवे काही शिकण्याचा प्रयत्न केलेला नसतो. प्रगती बदलांतूनच शक्य आहे.
● सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)
