‘राजहंस माझा निजला…’ हा अग्रलेख (२९ जानेवारी) वाचला. स्मृतींना उजाळा देताना उपस्थित केलेले प्रश्न केवळ व्यक्तिकेंद्रित न राहता संपूर्ण राजकीय संस्कृतीकडे बोट दाखवणारे आहेत. ‘कॉम्पिटिव्ह पॉलिटिक्स’ ही संकल्पनाच मुळात माणूसपण गिळून टाकणारी आहे. आजचे राजकारण विचार, मूल्य, सेवा यांपेक्षा सत्ता, वर्चस्व, दृश्यता, टिकून राहण्याची धडपड आणि पराभवाची भीती या भावनांभोवती अधिक फिरताना दिसते. अनेक नेत्यांचे जगणे म्हणजे अखंड धावपळ. दौरे, डावपेच, सतत संशय, मन:शांती शून्य आणि संवेदनशीलता संपलेली. या जीवनपद्धतीत कला, साहित्य, संगीत, शांतता नाही, आहे ते फक्त धावणे; पण कुठे, कशासाठी आणि कशामुळे, याचे उत्तर नाही.
भारतीय राजकारणात यश म्हणजे सर्व काही, अपयश म्हणजे अस्तित्वाचा अंत, सत्तेबाहेर असणे म्हणजे शून्यता. यात आयुष्य जगले गेले की वापरले गेले हा खरा प्रश्न आहे. ही शोकांतिका व्यक्तीची नसून संस्कृतीची आहे. इथे माणूस महत्त्वाचा राहत नाही, भूमिका महत्त्वाची ठरते. ही सांस्कृतिक दिवाळखोरी आहे. राजकारणात स्पर्धा असणारच; पण जेव्हा ती सेवेवर, मूल्यांवर आणि मानवी आयुष्यावर बेतते, तेव्हा ते राजकारण राहत नाही, ती यंत्रणा बनते आणि त्या यंत्रणेत माणसे सुट्या भागांसारखी वापरली जातात. एवढे होऊनही बहुधा यावर विचार होणार नाही, कारण ही व्यवस्था विचारांतून नव्हे, तर भीतीतून, स्पर्धेतून आणि अहंकारातून चालते. जोपर्यंत समाज ‘यश म्हणजे सत्ता’ ही व्याख्या बदलत नाही, तोपर्यंत राजकारणीही ती बदलणार नाहीत. तरीही असे प्रश्न विचारले जाणे महत्त्वाचे आहे, कारण ते समाजात जगण्याची सांस्कृतिक जाण, आत्मिक जाण आणि मानवी मूल्यांची स्मृती संपलेली नाही, हे दर्शवतात. आपण केवळ माणसेच नव्हे जगण्याची भाषाही गमावत चाललो आहोत.
● तुषार रहाटगावकर, डोंबिवली
७० हजार कोटी ही रक्कम कशी आली?
‘राजहंस माझा निजला…’ हा अग्रलेख वाचला. ७० हजार कोटींबाबतची माहिती वस्तुनिष्ठ नाही. ७० हजार कोटी खर्च आणि सिंचनात एक टक्का वाढ (कथित सिंचन घोटाळा) हा आरोप तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केला होता. अजित पवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच त्यांना क्लीन चिट दिली आणि परत जलसंपदा मंत्रीपद दिले.
चौकशीसाठी चितळे समिती स्थापन करण्यात आली होती. १८२ प्रकल्प तपासणीसाठी देण्यात आले, त्यापैकी १५२ प्रकल्पांत समितीला काहीही अंदाजपत्रकात आढळले नाही. काही बाबींवर खर्च वाढला असला तरी त्याच्या सखोल चौकशीची गरज असल्याचे नमूद केले होते. मुळात ७० हजार कोटी ही रक्कम कशी आली याबाबत आरोप करणारे, त्या आरोपांचे भांडवल करणारे आणि त्याला प्रसिद्धी देणारे यांनी कधीही खुलासा केला नाही. तो झाला असता तर अजित पवार यांना जनतेनेच क्लीन चिट दिली असती आणि तिघांचेही हसे झाले असते. खर्चवाढीचे एकच उदाहरण देतो. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाला १९६७ मध्ये १२ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली. तेव्हा सिमेंट गोणीचा (५० किलो) दर सात रुपये होता, तर स्टील १८०० रुपये टन होते. १९७६ मध्ये कामाला सुरुवात झाली. भाववाढीमुळे १९८२-८३ मध्ये प्रकल्पाची किंमत ७८ कोटी झाली. अजित पवार हे धडाडीने काम करणारे नेते होते. आरोपातला फोलपणा त्यांना, आरोप करणाऱ्यांना आणि त्याचे भांडवल करणाऱ्यांनाही माहीत होता. त्यामुळे ७० हजार कोटी ही रक्कम कशी आली याबाबत कोणीच तोंड उघडले नाही आणि कोणी खुलासाही मागितला नाही.
● जयप्रकाश संचेती, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
कामे करवून घेण्याची हातोटी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे नेतृत्व गमावले. ग्रामीण महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अजितदादांना ग्रामीण जनतेच्या समस्या आणि मानसिकता याची अचूक जाण होती. लोकांच्या भाषेत बोलणारे, उत्तम विनोदबुद्धी असलेले अजित पवार अनेक आरोप-प्रत्यारोपांनंतरही खचले नाहीत वा विचलित झाले नाहीत. नेहमीच ठामपणे उभे राहिले. मंत्रालयाचे कामकाज सकाळी दहा वाजता सुरू होते, परंतु दादांचे मंत्रालय सकाळी सात वाजताच सुरू होत असे. मंत्रालयीन ‘बाबूं’वर असलेला त्यांचा वचक आणि त्यांच्याकडून जनतेची कामे करवून घेण्याची त्यांची शैली अनोखी होती. ग्रामीण भागातून आलेले असल्याने त्यांची नाळ कायम ग्रामीण जनतेशी जोडलेली होती. जनमनाची अशी खोल जाण असलेला नेता दुर्मीळच.
● दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई
हे परिपक्वतेचे द्याोतक!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू अकाली, दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. मोठ्यांच्या मृत्यूची चर्चा अधिक होणे स्वाभाविक असले तरी अशा दु:खद प्रसंगातही काही जण राजकारणाची संधी शोधतात. ममता बॅनर्जी, ओमर अब्दुल्ला यांची विधाने या वर्गातील आहेत. विमान अपघात होऊन मृत्यू होणे ही बाब नवीन नाही. संजय गांधी, आंध्रचे मुख्यमंत्री असलेले वाय. एस. राजशेखर रेड्डी, अरुणाचलचे मुख्यमंत्री असलेले दोरजी खंडू, तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचाही मृत्यू विमान अपघातात झाला होता. प्रत्येक विमान अपघातानंतर त्याची चौकशी केली जाते आणि भविष्यात चुकीची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेतली जाते. वावड्या वाढल्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून हा अपघातच होता आणि त्यामागे दुसरी कोणतीही शक्यता नाही असे स्पष्ट केले. दु:ख भावनांना आवर घालून शरद पवार यांनी वेळीच खुलासा केल्याने त्यांची परिपक्वता दिसून आली.
● हेमंत कद्रे, वडगाव बुद्रुक (पुणे)
माउलीची दखल उल्लेखनीय
‘राजहंस माझा निजला…’ हा अग्रलेख (२९ जानेवारी) वाचला. लेखाचे शीर्षक आणि अंतिम परिच्छेद विशेष दखल घ्यावा असा आहे. एक वक्तशीर, प्रशासनावर पकड असलेला, सडेतोड राजकारणी वगैरे बिरुदावलीत ते एका माउलीचा मुलगाही होते, याचा विसर पडल्यासारखे दिसले. त्यांची आई हयात आहेत आणि त्यांची दखल या अग्रलेखात घेतली गेली, हे ‘लोकसत्ता’तील अग्रलेखाचे वेगळेपण.
● पांडुरंग पानगांवकर
दिलेला शब्द पाळणारा नेता
अजितदादा हे दूरदृष्टी लाभलेले नेते होते. कोणतेही काम असो, ते पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत. त्यांचे बोलणे सडेतोड आणि गावरान होते. दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळत. वक्तशीरपणा वाखाणण्याजोगा होता. गावातील जमिनीवरून होणारी भांडणे असोत वा पायाभूत सुविधांचे प्रश्न ते स्वत: लक्ष घालत. त्यांची काम करण्याची पद्धत नेहमी आठवणीत राहील. पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये त्यांनी अनेक कामे केली. अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही.
● रामचंद्र तांबडे, बारामती (पुणे)
दरारा होता, पण दहशत नव्हती
‘राजहंस माझा निजला’ हे संपादकीय वाचले. हजारोंच्या संख्येने भरलेल्या सभेत कोणी मागून जोरजोरात ओरडून कसला तरी कागद फडकवत असेल तर अजितदादा ‘त्याला आणा रे इकडे’ असे मिश्कीलपणे बोलून बोलावून घेत. त्याची समस्या ऐकून त्यावर तोडगा काढत.
रस्त्याने भरघाव वेगाने ताफा जात असताना कोणी पोटतिडकीने ताफा थांबवलाच तर त्याचे म्हणणे ऐकून जागेवर प्रश्न मिटवत. कधी टपरीवर थांबून कार्यकर्त्यांसह चहा घेत. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथजी मुंडे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील होते तोवर राजकारणाचा दर्जा टिकून आहे असे वाटे. आज या यादीत नाव घ्यावे असे अजितदादा होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील विशेषत: ग्रामीण भागांतील जनतेचा आवाज शांत झाला. त्यांचा दरारा होता, पण दहशत नव्हती. लोकांना त्यांची दादागिरीही आवडे. कारण त्याच्या मुळाशी एक प्रेमळ माणूस होता. व्यूहरचना वगैरे त्यांचा प्रांत नव्हता. दादांचा मिश्कील स्वभाव, हजरजबाबीपणा, काम करण्यातील तळमळ वाखाणण्याजोगी होती. ● आकाश सानप, नाशिक

