‘कृश रुपया; लठ्ठ भारतीय!’ हे संपादकीय (३० जानेवारी) वाचले. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या अवमूल्यनामागे जागतिक अनिश्चितता, अमेरिकेतील उच्च व्याजदर, वाढती व्यापारतूट आणि परकीय गुंतवणुकीतील घट ही प्रमुख कारणे आहेत. वस्तू व सेवाकरातील सुधारणांमुळे करप्रणाली सुलभ झाली असली तरी उत्पादन खर्च आणि कमी जागतिक मागणीमुळे निर्यात वाढलेली नाही.

या वर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार संरचनात्मक सुधारणा, कौशल्यविकास व निर्याताभिमुख धोरणे आवश्यक आहेत. रुपया कमजोर होण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील उच्च व्याजदर आणि डॉलरची ताकद, ज्यामुळे परकीय गुंतवणूकदार सुरक्षित डॉलरमध्ये पैसा ठेवतात आणि भारतीय बाजारातून बाहेर पडतात. निर्यात सुधारण्यात वैश्विक मागणीचा कमकुवतपणा, उच्च आयात खर्च, आणि टॅरिफ हे अडथळे आहेत, त्यामुळे निर्यात वाढत नाही.

शिक्षण, कौशल्यविकास आणि संशोधनावर पुरेसा खर्च न होणे ही दीर्घकालीन कमकुवत बाजू ठरते. सरकारी खर्च आणि कर्जाचे वाढते ओझेही आर्थिक स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. उत्पादनक्षमता, तंत्रज्ञानाधारित उद्योग, हरित ऊर्जा आणि डिजिटल निर्यात यावर लक्ष केंद्रित केले, तर भारताची अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत मार्गावर येऊ शकते. संरचनात्मक सुधारणा, रोजगारनिर्मिती आणि निर्याताभिमुख धोरणे हीच दीर्घकालीन उपाययोजना ठरू शकेल.

कोमल डफळ, नायगाव (वसई)

आहाराबाबत लोकशिक्षण हवे

‘कृश रुपया; लठ्ठ भारतीय!’ हा अग्रलेख वाचला. जंकफूडच्या जाहिरातींवर सकाळी ६ ते रात्री ११ बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे योग्यच, पण त्यापेक्षाही या पदार्थांवर संपूर्ण बंदी घालणेच योग्य ठरेल. अशा पदार्थांवर दारू, सिगारेट वा अन्य तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणे नेहमीपेक्षा जास्त टॅक्स लावावा. किमती वाढल्यामुळे आपोआपच विक्री कमी होईल. आपल्याकडील लहान मुलांना या पदार्थांची चांगलीच चटक लागली आहे. त्यामुळे हे पदार्थ मुलांच्या शाळेतील डब्यात सर्रास दिले जातात. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत.  लोकशिक्षण होऊन पोहे, उपमा, सांजा अशा पारंपरिक पदार्थांचे सेवन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांमध्ये शिशुवर्गापासून मैदानी खेळांची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. मुलांचा स्क्रीनटाइमही कमी केला पाहिजे. कृश रुपयाबाबत केंद्र सरकार चकार शब्ददेखील काढत नाही याचे आश्चर्य वाटते. रुपयाचे अवमूल्यन फारसे महत्त्वाचे नाही असाच समज सरकारने करून घेतलेला आहे का? वस्तू आणि सेवा करातील सुधारणांमुळे सर्वसामान्य जनतेला खरेच किती फायदा झाला याचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.

शुभदा गोवर्धन, ठाणे</strong>

लोकशाहीला घातकच!

‘राज्य पातळीवरील योजनांचा परिणाम, लोकप्रियतेसाठी घेतलेल्या धोरणांमुळे चिंता’ हे वृत्त (लोकसत्ता- ३० जानेवारी) वाचले. सत्ताप्राप्तीसाठी रोख रक्कम किंवा वस्तुरूपात काही देणे अयोग्यच म्हणावे लागेल. महाराष्ट्र सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना ही अशाच स्वरूपाची रेवडी होती. राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना या योजनेमुळे इतर आवश्यक विकास प्रकल्पांच्या निधीत कपात करावी लागत असेल तर ती योजना सुरू ठेवणे अयोग्यच. ्त्रिरयांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विनातारण कर्ज, कर्जावरील व्याजदरात सवलत अशा योजना ठीक आहेत, पण फुकट वस्तू, रोख रक्कम देणे लोकशाहीला मारकच म्हणावे लागेल.

रमेश वेदक, चेंबूर (मुंबई)

जनमानसाच्या भावनांशी खेळ

गतवर्षी जूनमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातापाठोपाठ जवळपास सहा महिन्यांच्या अवधीत महाराष्ट्र राज्याच्या उप-मुख्यमंत्र्यांसह सहा जणांचा बळी घेणारा विमान अपघात बारामती येथे झाला. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ती घटना होती. दुसरीकडे या दुर्दैवी घटनेवर समाजमाध्यमांवर ज्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत त्या  विषण्ण करणार्‍या आणि गोंधळात भर टाकणार्‍या वाटतात. प्रत्येक जण स्वत:ला विमान वाहतुकीतील तज्ज्ञ मानू लागला आहे. अपघाताची उलटसुलट माहिती काल्पनिक ग्राफिक, ए.आय. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दिली जात आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’मधील माहिती मिळण्यास लागणार्‍या प्रदीर्घ कालावधीचा गैरफायदा घेतला जात आहे. हा जनमानसाच्या भावनांशी खेळ आहे.डॉ. श्रीकांत परळकर, दादर (मुंबई)