readers reaction on loksatta article editorial and news zws 70 | Loksatta

लोकमानस : ‘आप’साठी आता गुजरात अवघडच!

गुजरातवरील सत्ताप्राप्ती आपसाठी अवघड असून, निसटता जरी विजय मिळवला तर तो एक चमत्कारच ठरेल एवढे मात्र खरे!

लोकमानस : ‘आप’साठी आता गुजरात अवघडच!
(संग्रहित छायाचित्र)

‘भाजपची गुजरातसाठी चाणाक्ष खेळी?’ हा ‘लालकिल्ला’ सदरातील लेख (२८ नोव्हेंबर) वाचला. गुजरात हे भाजपच्या दोन सर्वोच्च नेत्यांचे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे गृहराज्य असल्याने, तेथील सत्ता टिकवणे भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे झाले आहे. त्यासाठी मुख्य प्रतिस्पर्धी ‘आप’ला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप दवडत नाही. गुजरातवरील लक्ष वळवण्यासाठी दिल्ली महापालिकेची निवडणूक नेमकी त्याच वेळी हाही त्या खेळीचाच एक भाग असावा, अशी दाट शक्यता आहे. अर्थात याकामी काही घटनात्मक संस्थांचा हातभार लागणे हा एक निव्वळ ‘योगायोग’ होय.

दिल्ली महापालिका प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात केजरीवाल- सिसोदिया- मान आदींसह आपचे बडे नेते प्रत्येक प्रभाग पिंजून काढत आहेत, तद्वतच मोदी- शहा-  शर्मा- योगी- नड्डांसह भाजपच्या आक्रमक फळीने गुजरातमधील प्रत्येक मतदारसंघ धडाकेबाज प्रचाराने पिंजून काढला आहे. साहजिकच दिल्ली पालिका निवडणुकीमुळे आपची गुजरातवरील पकड ढिली झाल्याने, एक वेळ दिल्ली पालिका भाजपकडून आप हिसकावून घेईलसुद्धा, परंतु गुजरातवरील सत्ताप्राप्ती आपसाठी अवघड असून, निसटता जरी विजय मिळवला तर तो एक चमत्कारच ठरेल एवढे मात्र खरे!

बेंजामिन केदारकर, नंदाखाल, विरार

आदिवासींचे वर्तमान, भविष्यही वाऱ्यावर

‘आदिवासी महिलांचा इतिहास वाऱ्यावरच?’ हा ‘वन- जन- मन’ सदरातील लेख (२६ नोव्हेंबर) वाचला. आदिवासी महिलांचा इतिहासच नव्हे तर त्यांचे वर्तमान आणि भविष्यही वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. आज आदिवासी बांधवांचा कोणी वाली नाही. वास्तव जाणून घ्यायचे असल्यास देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, शहापूर, भिवंडी या तालुक्यांतील आदिवासी भागांत फिरून यावे.

देश स्वतंत्र झाला तेव्हापासून राज्यकारभार चालवणाऱ्यांनी त्यांना आपल्या समाजाचा भाग मानलेच नाही. त्यांच्याकडे केवळ व्होट बँक म्हणून पाहिले गेले. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी ज्या योजना अमलात आणल्या, त्यांचा फायदा दलालांनी व तथाकथित आदिवासींनी घेतला. भारतीय समाजाचा एक मोठा वर्ग विकासापासून वंचित आहे. देशाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर जल, जंगल, जमीन यांच्याशी अतूट नाते असणाऱ्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील.

प्रवीण आर. सूर्यराव, भिवंडी (ठाणे)

बालविवाहांकडे दुर्लक्ष घातक

‘वन- जन- मन’ सदरातील ‘आदिवासी महिलांचा इतिहास वाऱ्यावरच?’ हा लेख (२६ नोव्हेंबर) वाचला. आदिवासी महिला लढवय्या आहेत. आदिवासींतील अनेक जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धत आढळते. या लेखात अशक्तपणामुळे कमी वजनाची बाळे जन्माला येत असल्याचा उल्लेख आहे. मात्र, बालविवाह प्रथा आदिवासींच्या कित्येक पिढय़ांच्या मुळावर उठली आहे. अवघ्या १२व्या वर्षी होणाऱ्या विवाहाकडे आजच्या समाजसुधारकांचेही दुर्लक्ष होत आहे. 

राजलक्ष्मी प्रसाद, मुलुंड

साम्यवाद अस्तंगत होत आहे का?

‘चीनमध्ये जनउद्रेक’ हे वृत्त (२८ नोव्हेंबर) वाचले. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने आपली मूळ प्रेरणा असलेल्या साम्यवादाशी उघडपणे पूर्णत: फारकत घेतली आहे. चीनमध्ये उद्भवलेले कामगारांचे बंड ही त्याचीच परिणती आहे. चीन आणि रशिया या दोन प्रमुख साम्यवादी म्हटल्या जाणाऱ्या राष्ट्रांनी साम्यवादाशी द्रोह केला आहे. त्यामुळे कष्टकरी वर्गाचा तारणहार असलेला ‘साम्यवाद’ जगातून अस्तंगत होत आहे की काय, अशी भीती वाटते.

प्रमोद तावडे, डोंबिवली 

अमोल पालेकरांचा अनुल्लेख खटकणारा

‘अभिनयमार्गी..’  या अग्रलेखात मराठीतून हिंदी चित्रपट सृष्टीत नावाजलेल्या महत्त्वाच्या कलावंतांची नावे दिसत नाहीत. हा त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे असे वाटते. अमोल पालेकरांसारख्या अभिनेत्याने रंगमंचावर उत्तम काम केल्यानंतर हिंदी चित्रपटांत नायक म्हणून केलेली कामगिरी अनुल्लेखाने टाळण्यासारखी मुळीच नाही. त्याबरोबरच सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, लक्ष्मीकांत बेर्डे, उर्मिला मातोंडकर अशी कितीतरी नावे महत्त्वाची आहेत. लोकसत्ताने त्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे वाटले.

अजय पेठे, पुणे

मोबाइलला आवर घालणारे विक्रम गोखले!

मराठी रंगभूमीवर आपल्या भारदस्त आवाजाने व उत्तम अभिनयाने विक्रम गोखले यांनी मराठी प्रेक्षकांची मने जिंकली होती. ते मराठी चित्रपटांतही गाजले आणि हिंदी चित्रपट व मालिकांमध्येही त्यांना पसंती मिळाली. ‘अभिनयमार्गी..’ या अग्रलेखात हिंदीत नावाजलेले मराठी रंगमंचावरील अभिनेते म्हणून लागू, पाटेकर व गोखले यांची नावे आहेत. पण रमेश देव, विनोदी कलाकार धुमाळ, गजानन जहागीरदार अशी आणखीही कलाकार मंडळी हिंदी चित्रपटसृष्टीत होती. तसेच शुभा खोटे, नलिनी जयवंत, लीला चिटणीस, ललिता पवार, सुलोचना आदीही गाजल्या. विक्रम गोखलेंचे वैशिष्टय़ व रसिकांवर एवढी हुकमत होती की, मोबाइल आले आणि नाटक चालू असताना मोबाइलची रिंग वाजली तर ती बंद होईपर्यंत स्टेजवर काही हालचाल न करता, संवादफेक थांबवून प्रेक्षकांकडे पाहात उभे राहण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली (हा तपशील माझ्या आठवणीप्रमाणे लिहिला आहे), आणि नंतर सर्व नाटकांच्या सुरुवातीला सूचना दिली जाऊ लागली की प्रेक्षकांनी नाटक सुरू असताना आपले भ्रमणध्वनी म्यूट मोडवर ठेवावेत. 

माधव ल. बिवलकर, गिरगाव (मुंबई)

भलेभले बोटचेपी भूमिका घेत असताना..

‘अभिनयमार्गी..’ ही विक्रम गोखले यांना वाहिलेली आदरांजली (२८ नोव्हेंबर) वाचली. मराठी अभिनयजगातील एक देखणा व अभिनयसंपन्न नट ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला. हिंदी चित्रपटात ‘हम दिल दे चुके सनम’मधील त्यांचा शास्त्रीय गायक आणि कठोर पित्याची भूमिका सर्वाच्याच लक्षात असेल, पण हिंदीतील ‘यही है जिंदगी’मध्ये केलेली कृष्णाची भूमिका आणि ‘द स्टोनमॅन मर्डर्स’मधील पोलीस आयुक्ताची भूमिका जी शेवटी आपल्याला धक्का देते – अशा अनेक भूमिकांतून अप्रतिम अभिनय बघायला मिळतो. त्यांच्या समाजकार्याबरोबरच त्यांनी घेतलेली हिंदूत्वाची भूमिकाही खूप महत्त्वाची होती कारण भलेभले स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेण्यासाठी बोटचेपी भूमिका घेत असताना स्पष्ट शब्दांत हिंदूत्वाच्या बाजूने बोलून त्यांनी कणखरपणा दाखवून दिला होता.

माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

संकेत पाळला जातो, पण..

‘अभिनयमार्गी..’ हा दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या अभिनय कारकीर्दीचा आढावा घेणारा संपादकीय लेख वाचला. विक्रम गोखले हे अतिशय प्रतिभावान कलाकार होते यात वादच नाही. परंतु अलीकडच्या काळात त्यांनी केलेल्या विविध वादग्रस्त वक्तव्यांची दखल या लेखात का घेतली नाही, हा प्रश्न पडला. कंगना राणावत या अभिनेत्रीने मागच्या वर्षी भारत हा खऱ्या अर्थाने २०१४ ला स्वतंत्र झाला, असे वक्तव्य केले होते. याच कंगनाच्या वक्तव्याला दुजोरा देताना विक्रम गोखले यांनीही काही वादग्रस्त वक्तव्ये करून वाद ओढवून घेतला होता. ‘लोकसत्ता’ने त्या वेळी (१७ नोव्हेंबर २०२१) अग्रलेख लिहून विक्रम गोखले यांना त्यांची चूक दाखवून दिली होती. गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन अहंकारी भावनेने टीकाकारांना बजावले होते. आपल्या चुकीच्या वक्तव्यावर माफी मागणे तर दूरच उलट त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांनाच दूषणे दिली होती.

विशेष म्हणजे विक्रम गोखले यांच्या वडिलांनी आयुष्यभर देशाच्या माजी सैनिकांसाठी भरीव कार्य केलेले होते. स्वत: विक्रम गोखले यांनीही वडिलांच्या कार्याला पुढे नेले होते. तरीही त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते केवळ त्यांनी सत्ताधाऱ्यांना खूश करण्यासाठी तर केले नव्हते ना? हा प्रश्न पडतो. विक्रम गोखले अभिनेते म्हणून ग्रेट होतेच आणि कायम ग्रेट राहतील, परंतु माणूस म्हणून अलीकडच्या काळातील त्यांची भूमिका पटणारी होती का? विक्रम गोखले या व्यक्तिमत्त्वाची फक्त अभिनेते म्हणून नाही तर माणूस म्हणून चिकित्सा व्हायला नको का? एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या व्यक्तीच्या वाईट गुणांबद्दल बोलू नये हा संकेत आपल्याकडे पाळला जातो, परंतु वाईट गुणांना किंवा कृत्यांना झाकून केवळ एखाद्याची स्तुती करणारे लेख पुढच्या पिढीला सत्य सांगणारे असतील का? त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्युलेख लिहिताना त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची चिकित्सा करून लेख लिहावा, ही अपेक्षा.

सज्जन शामल बिभीषण यादव, उस्मानाबाद

चूकभूल

‘तरच महिलांची वाटचाल सुरक्षित’ या पत्रात (लोकमानस, २८ नोव्हेंबर) पत्रलेखिकेने ‘संभाजी ब्रिगेडचे भिडे गुरुजी’ असा केलेला उल्लेख ‘लोकसत्ता’च्या संपादकीय विभागाच्या अनवधानामुळे तसाच राहिलेला आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेचा मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्याशी काहीही संबंध नसल्याने तो उल्लेख चुकीचा आहे. या चुकीबद्दल दिलगीर आहोत.

संपादकीय विभाग, लोकसत्ता

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 03:56 IST
Next Story
अन्वयार्थ : सदोष कोविड धोरणाचा भडका