स्लोअर शहाणेला उमज येत गेली, तो काळ २००० ते २०२५ असा होता, तरी त्याआधीच्या २५ वर्षांत जे जे घडले, ते त्याच्या या उमजेची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी महत्त्वाचे होते. ही आधीची २५ वर्षेही स्लोअर शहाणे जगला असला, तरी तो काय जगला, हे त्याला नंतरच्या २५ वर्षांत उमगू लागले. त्याला संस्कार म्हणायचे, प्रभाव म्हणायचे, की पगडा म्हणायचे, अशा पेचात न सापडता, स्लोअरने त्याला ‘आधी जगलेल्या आयुष्याचा संधिप्रकाश’ असे म्हणणे जास्त रास्त समजले.

आता खरे तर या उमजपूर्व जगण्यात कोणतेच हेतू नसल्याने त्याला उजेडही म्हणता आले असते किंवा थेट काळीकुट्ट सावलीही म्हणता आले असते. पण मध्यमवर्गीय असल्याची खूणही पुसली जाऊ नये आणि ‘आहे रे’ वर्गात आहे का नाही, हा संभ्रम स्वत:च्या मनाशी कायम ठेवून, थोडीफार का होईना, ‘नाही रे’ची बोचही मिरवता यावी, म्हणून त्याने या उमजपूर्व जगण्याला ‘संधिप्रकाश’ म्हणून टाकले. दिवस आणि रात्रीमधला संधिप्रकाश, की रात्र आणि दिवसामधला संधिप्रकाश याचे थेट उत्तर मात्र त्यालाही कधी देता आले नाही. मग त्याने ‘शहाण्या’ मध्यमवर्गीयासारखी संधिप्रकाशाच्या दोन छटांची एक सोय अनेकदा सोयीने वापरली. त्या अर्थाने ‘दीवार’मधला अमिताभ बच्चन स्लोअर शहाणेला कायमच जवळचा वाटला.

‘दीवार’ आला १९७५ मध्ये, म्हणजे स्लोअर शहाणेच्या उमजपूर्व संधिप्रकाश काळाच्या प्रारंभबिंदूवेळी. आणि स्लोअर शहाणे उमजेचा टप्पा पार करेपर्यंत सिनेमाला ५० वर्षे पूर्णही झाली. सिनेमा आणि स्लोअरचे वय एकच. याला वर्तुळ पूर्ण होणे म्हणावे, की परिघातील अडकलेपण? स्लोअर असा विचार करता झालाच असता, पण त्यात त्याच्या स्वभावाला अनुकूल असे ‘सिनेमीय दिलखेचक’ म्हणावे असे काहीच ‘अपील’ नसल्याने त्याच वेळी त्याच्या मनात दुसरा एक प्रश्न उगवून हा मागे पडता झाला. ‘मूलभूत संशोधनासाठी लागणारा संयम आपल्याकडे कधीच नव्हता, त्यामुळे आपण प्रश्नाला भिडण्याची खुमखुमी असूनही उत्तरवेल्हाळ झालो,’ असे उगीचच पटकन त्याच्या मनात चमकून गेले. ते चमकून गेलेले लगेच विझलेही आणि त्याच नेमक्या क्षणी, ‘दीवार’ या सिनेमाची कथा आजच्या काळात संदर्भहीन झाली आहे का, असा अगदी सोपा, लोकरोचक, पॉडकास्टी प्रश्न स्लोअरने चघळायला घेतला. त्याचे त्याला जे कवडसे दिसले, ते त्याने ‘रोजदिनी’त उतरवून काढले. ते असे होते.

‘दीवार’ची कथा सुरू होताना मार्क्सवाद शिकल्याची आठवण येतेच. शोषित कामगारांचा शोषणकर्त्या उद्याोगव्यवस्थेविरुद्धचा संघर्ष किती ठळक दिसतो! पण काही दृश्येच. पुढे जाऊन जो ‘विजय’ होणार आहे, त्या अमिताभ बच्चनचा बाप कुटुंब गुंडांच्या ताब्यात असल्याचे छायाचित्र पाहून ‘प्रोलिटेरिएट’चा ‘मध्यमवर्गीय’ होतो, उद्याोगपतीला शरण जाऊन ज्या कामगारांसाठी लढला, त्यांचेच हक्क समर्पित करतो. लढणारा हरतो आणि हरल्याचे अपराधीपण सहन न होऊन ज्या कुटुंबासाठी तो मध्यमवर्गीय झाला, ते कुटुंब वाऱ्यावर सोडून परागंदा होतो. हा पूर्ण पराभव, पळपुटेपणा, की नैतिक-व्यावहारिक तोडगा? स्वातंत्र्याच्या पाव शतकानंतर आलेले हे गोंधळलेपण मध्यमवर्गाच्या पुढच्या पाव शतकाच्या ऱ्हासपर्वाची नांदी असेल का? कशाला प्रश्न पडतोय सिनेमातल्या पहिल्याच काही रिळांत आणि का उत्तरं शोधायची तद्दन व्यावसायिक चित्रपटातल्या दृश्यांची? मध्यमवर्गीयाने व्यावसायिक चित्रपट मनोरंजनासाठी पाहायचे असतात.

बच्चनचा बाप झालेल्या सत्येन कप्पूचे निघून जाणे नुसतेच मध्यमवर्गमार्ग असू शकते ना खुळ्या स्लोअरा! वेडा रे तू वेडा!

बच्चन, शशी कपूरची आई निरुपा रॉय, अर्थात वर्मा काकू दोन लहानग्यांना घेऊन मुंबई महानगरात येतात. परवड सुरूच. पदपथावर झोपणे वगैरे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना मुनीमजी आईबरोबर गैरवर्तन करत असल्याचे पाहून छोटा विजय चिडतो आणि थेट मुनीमजीवर दगड भिरकावतो. त्याचे हे दगड भिरकावणे व्यवस्थेविरुद्धची चीड, की कायदा हातात घ्यायची सुरुवात? ज्याच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असे बळजबरीने गोंदवले आहे, त्याच्या दिल, दिमाग आणि आत्म्यावर या वाक्याचे कायमचे कोरीवकाम झाले आहे. असे हात मग म्हणून कायदा मोडायलाच उगारले जाणार का?

मध्यमवर्गीय गरीब झाल्यावर असे करतो, असा त्याचा सोपा अर्थ घेऊन पाहा ना पुढचा सिनेमा खुळ्या स्लोअरा! वेडा रे तू वेडा!

काम केल्यानंतर मानधन म्हणून मिळणारे पैसे नीट हातात दिले तर घेणार; फेकले, तर चालणार नाहीत; उचलणारही नाही, हा विजयचा बाणा. पण मोठा झाल्यावर ‘डावर’ने दिलेले पैसे हे ज्या कामासाठी आहेत, ते काम करण्यासाठी दिलेले पैसे हातात उचलून दिलेले असले, तरी भावना कामासाठी पैसे फेकल्याची आहे, हे विजयला का कळत नाहीये? का लहानपणी दगड उचलला आणि नंतर मोठं झाल्यावर गोदीत पीटरला कुटला, तेव्हाच कायदा मोडायच्या पायऱ्यांवर चढलेली मध्यमवर्गीय असली, तरी अशी व्यक्ती असेच करणे अपेक्षित आहे, हे गृहीत धरायचे? सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काही असते की नाही खुळ्या स्लोअरा! वेडा रे तू वेडा!

‘विजय’च्या स्खलनाच्या याच बिंदूपाशी ‘रवी’ची मूल्यनिष्ठा झळाळून निघायला सुरुवात होते. पण तरी त्याला त्याच्यापेक्षा चांगल्या आर्थिक स्थितीतील प्रेमिका मिळते कशी? आणि त्यांच्या प्रेमाला कुणाच्याच घरचे कसे आडकाठी करत नाहीत? आता लग्न झाल्यावर तिच्या गरजा आणि याचा तुटपुंजा पगार यांची सांगड ‘रवी’ कशी घालेल? का आता मूल्यभाषा करणाऱ्या ‘रवी’चा नंतर अस्त होऊन तोही ‘डावर’ वा ‘सामंत’सारख्या प्रवृत्तींशी हातमिळवणी करणार आहे, त्याच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ लिहिलेले नसूनही? सिनेमा बच्चनसाठी पाहतो आहेस, तर शशी कपूरच्या पात्राचे काय होते, याचा कशाला विचार करतोस खुळ्या स्लोअरा? वेडा रे तू वेडा!

…यानंतरही दीवारमधले काही प्रसंग स्लोअरच्या मनात तरळत राहिले. ‘मैं समझता नहीं, मैं जानता हूँ की यह काम मैं अकेला कर सकता हूँ’मधल्या बच्चनच्या आत्मविश्वासापासून परवीन बाबीचे सिनेमात उत्तरोत्तर उजळत गेलेले समंजसपण असे अनेक छोटे-छोटे कंगोरे त्याला आठवत राहिले. बाकी शशी कपूर आणि ए. के. हनगलमधल्या संवादाचे दृश्य, बच्चनचे मंदिरातले स्वगत, शेवटचा पाठलाग असेही अनेक प्रसंग ओघाने मनात रांग करते झाले. दीवारची बंदिस्त पटकथा, संवाद आदी मुद्द्यांच्या अॅकॅडेमिक चर्चाही त्याने मनात रेंगाळावल्या; पण इतके करूनही ‘दीवार’वर पुढे काही लिहिण्याचा स्लोअरला त्या दिवशी कंटाळाच आला. त्याला वाटले, आपण लिहिता लिहिता फार तुच्छतावादी होऊ आणि आणखी तसे झालो, तर कपाळावर आठ्या कायमच्या कोरल्या जातील आणि ‘मेरा बाप चोर है,’ हे जसे ‘विजय’च्या हातावरून मिटणे अशक्य झाले, तसे व्हायचे. याचा अर्थ, त्याला ‘दीवार’ आवडणे बंद झाले असे नाही किंबहुना अजूनही स्लोअरला ‘दीवार’ खूप आवडतो आणि अनेकविध कारणांसाठी तो हा सिनेमा पुन:पुन्हा बघत राहतो. पण अशा मनात घुसलेल्या सिनेमावर स्लोअरने विचार करायला घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला सिनेमापेक्षा स्वत:च्या जगण्यातील विसंगती अधिक दिसत राहिली. असे आत्मपरीक्षण मध्यमवर्गाला जड जाते. त्यापेक्षा सिनेमा, नाटक, संस्था वगैरेंची पन्नाशी, पंचाहत्तरी वा शतक स्मरणरंजनातून साजरे करणे अधिक सोपे आणि सोयीचेही. स्लोअरच्या मनात हा विचार आला आणि लगेच एक ओळ सुचून, त्याने ती ‘रोजदिनी’त उतरवली…

‘दीवार’ला पन्नास आणि आपल्या उमजेला पंचवीस वर्षे झाली म्हणून आत्मपरीक्षण करणे, ही रद्दी आयडिया आहे रे स्लोअरा! वेडा रे तू वेडा!