दिवंगत महनीय व्यक्ती, एखाद्या महत्त्वाच्या पदावर निवड झालेले किंवा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारे गुणवंत, दुर्लक्षित राहिलेली पण अखेर कर्तृत्वाची झळाळी दाखवून देणारी व्यक्तिमत्त्वे… अशांची ‘विकिपीडिया’ आदींवरील माहितीपेक्षा निराळी ओळख ‘व्यक्तिवेध’मधून करून देण्याचा परिपाठ रिनी संपत यांच्याबाबत मोडला जातो आहे. त्या आजघडीला कोणत्याही पदावर नाहीत.

अमेरिकी राजधानीच्या शहराचे- वॉशिंग्टन डीसीचे- महापौरपद मिळवू इच्छितात; पण अद्याप डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारीसुद्धा त्यांना मिळणे दूरच आहे… या पदासाठी निवडणूक होणार आहे ती अन्य लोकप्रतिनिधीगृहांसाठी ‘मध्यावधी निवडणुका’ होतील तेव्हाच- येत्या नोव्हेंबरात! वॉशिंग्टन महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कोणी लढावे, याचा फैसला होणार आहे तो येत्या जूनमध्ये पक्षीय प्राथमिक (प्रायमरी) फेरीत.

तरीही आताच त्यांची दखल घेण्याची कारणे दोन. पहिले म्हणजे, वॉशिंग्टन महापौरपदासाठी जरी डेमोक्रॅटिक पक्षातर्फेच सात-आठजण इच्छुक असले तरी रिनी संपत यांच्या प्रचाराची दिशा सर्वांपेक्षा निराळी आहे. दुसरे कारण असे की, त्या जर (आधी जून, मग नोव्हेंबरमध्ये) यशस्वी ठरल्या, तर वॉशिंग्टन डीसीच्या पहिल्या दक्षिण आशियाई (मूळ भारतीय) महापौर होण्याचा मान त्यांना मिळेल. त्या ३१ वर्षांच्या असल्याने, जर महापौर झाल्या तर ३४ व्या वर्षी न्यूयॉर्कचे महापौरपद मिळवणार्‍या झोहरान ममदानी यांच्यापेक्षाही तरुण शहरप्रमुख म्हणून त्यांचे नाव घेतले जाईल. पण या झाल्या जर- तरच्या गोष्टी. त्यातून तरून जाण्यासाठी आत्ता रिनी संपत यांच्या हाती काय आहे?

‘मी राजकारणी नाही, पण शहरांमधल्या प्राथमिक सोयीसुविधा पुरवणार्‍या कंपन्यांत मी सल्लागार म्हणून काम केलेले आहे आणि वॉशिंग्टनचे आजचे हाल मला पाहावत नाहीत. निवडून आले तर मी खड्डे बुजवेन, शहरातल्या पोटोमॅक नदीत चुकूनही सांडपाणी सोडले जाणार नाही याची काळजी घेईन आणि शहराची पाणीपुरवठा आणि मलनि:सारण व्यवस्था सुधारेन’ – असे रिनी संपत यांचे म्हणणे आहे. या प्रचारमोहिमेचे नाव ‘फिक्स द बेसिक्स’ असे ठेवून त्यांनी ‘वॉशिंग्टनचे नूतनीकरण’ करण्याची घोषणा दिली आहे. या प्रचारात सच्चेपणा असल्याने संपत यांच्याकडे लक्ष वेधले जाते आहे.

लोकांचा पाठिंबाही मिळतो आहे. जानेवारीत त्यांनी उमेदवारीत रस असल्याचे जाहीर केले आणि निव्वळ लोकवर्गणीतून, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत १५ हजार डॉलरचा प्रचार निधी उभारला. ‘यातून आणखी लोकांपर्यंत पोहोचून, मी एक लोकचळवळ उभारते आहे’ असे रिनी संपत यांनी अलीकडेच पत्रकारांना सांगितले. ही प्रचारपद्धत नवी ठरते आहे. रिनी संपत यांचे शिक्षण संज्ञापन आणि संगणक सुरक्षा या विषयांचे असून प्रचार सुरू करण्यापूर्वी ‘थारोस’ ही सायबर सुरक्षा कंपनी तसेच ॲक्सेन्चर व डेलॉइट या कंपन्यांत धोरणआखणी व मनुष्यबळ विकास खात्यांमध्ये काम केले. त्या राजकारणी नाहीत हे खरे; पण २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारमोहिमेत काम करून, तसेच ओबामा यांच्या कारकीर्दीत बहुविधतावादी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांनी दशकभर डेमॉक्रॅटिक पक्षनिष्ठा दाखवली होती.