‘मॅडम, खाली खूप गर्दी जमली आहे. नेहमीपेक्षा जरा जास्तच लोक दिसत आहेत. आज बैठकाही भरपूर, तेव्हा जनता दरबार लवकर आटपायला हवा’ स्वीय साहाय्यकाचा हा निरोप ऐकून रितूताई धावत पळतच खाली निघाल्या. अल्पावधीत आपली लोकप्रियता वाढते हे चांगलेच लक्षण. आता लक्ष्य आमदारकी असा विचार करत त्या पहिल्या शिष्टमंडळाला सामोर्‍या गेल्या. ‘ताईसाहेब आम्ही नाशिक जिल्ह्यातले नगरसेवक. खूप वर्षांनंतर पालिकेत दाखल झाल्यामुळे तिथे छाप पाडायची असेल तर आवाज हेच शस्त्र याची जाणीव आम्हाला नव्याने झाली. तुमची बातमी वाचनात आली. आम्हालाही आमचा घसा दुरुस्त करून घेण्यासाठी त्या जैनमुनींचे आशीर्वाद हवे आहेत. तेव्हा प्लीज त्यांचा पत्ता सांगा किंवा तुम्हाला त्यांनी जो आशीर्वाद दिला तो तरी आम्हाला द्या.’ हे ऐकून ताई कमालीच्या आनंदल्या.

‘त्यांचा आशीर्वाद असा परस्पर स्थानांतरित करता येत नाही. तुम्हाला पत्ता देते. तिथे जाऊन या. वाहन नसेल तर तीही व्यवस्था करून देते.’ शिष्टमंडळ जाताच त्या इतरांकडे वळल्या. अभ्यागतांच्या नागरी समस्या ऐकणे व अधिकार्‍यांना फोनवर निर्देश देणे सुरू असतानाच महिलांचा एक गट समोर आला. ‘गेल्या महिन्यापासून तक्रारी करून थकलो. गटारेच साफ होत नाहीत. तुम्हाला फोन केले, पण तुम्ही उचलत नाही. सांगा काय करायचे?’ मी लक्ष देईन, असे ताईंनी सांगताच त्यातील एक महिला भडकली. ‘अहो, ते घशाच्या साफसफाईचे तत्त्वज्ञान नंतर लोकांना सांगा, आधी नालेसफाईचे बघा.’ हे ऐकताच त्यांचा पारा चढला. हे नक्कीच सेनेचे लोक असे म्हणत त्या दुसरीकडे वळल्या.

नंतर जे जे लोक भेटत गेले ते सारे घशाच्या तक्रारी घेऊन आलेले. त्या सार्‍यांना मुनींचा पत्ता सांगता सांगता ताईंच्या घशाला कोरड पडू लागली. मग लगेच त्यांनी साहाय्यकांना बोलावले व घशाची तक्रार असणार्‍यांनी मुनींशी या पत्त्यावर संपर्क साधावा असा मोठा फलक तातडीने लावण्याचे निर्देश दिले. तरीही तीच समस्या घेऊन येणारे बरेच लोक उभे होतेच. किमान यानिमित्ताने तरी लोक नागरी समस्या विसरून जातील असा विचार मनात येताच त्यांना हायसे वाटले. भेटणार्‍यांचे काही ऐकून घेण्याआधीच त्या फलकाकडे बोट दाखवू लागल्या. ‘अहो, आमची घशाची तक्रार नाही, अतिक्रमणाची आहे’ असे सांगणारे काही बिलंदर निघालेच. दरबार आटोपून त्या घरात गेल्या तेव्हा घशाला कोरड पडल्याची जाणीव त्यांना झाली. पाणी पिऊनही ती जाईना.

शेवटी डॉक्टरांना फोन केला. त्यांनी तो घेतला नाही. पुन्हा फोन लावायच्या आधीच त्यांचा संदेश आला. ‘जैन मुनीकडे जा.’ शेवटी थोडी खडीसाखर खाऊन त्या कार्यालयात गेल्या तर तिथे कान, नाक, घसा तज्ज्ञांचे मोठे शिष्टमंडळ बसलेले. ‘मॅडम, तुम्ही शहराच्या प्रथम नागरिक आहात. तुम्हीच अशी वक्तव्ये केलीत, तर आमच्या प्रॅक्टिसचे काय?’ यावर ताई भडकल्याच. ‘तसेही आम्हाला ॲलोपॅथीचा रागच आहे. आयुर्वेद, चमत्कार हेच महत्त्वाचे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. तुम्ही जाऊ शकता.’ हे ऐकून संतापलेले डॉक्टर्स थेट देवाभाऊंकडे निघाले.

तितक्यात शिपायाने वर्दी दिली. खाली ‘अंनिस’चे कार्यकर्ते आंदोलन करताहेत म्हणून. जशी कारवाई खरातवर केली तशी ताईंवर करा अशी त्यांची मागणी. हे ऐकून ताईंनी डोके गच्च धरले. तेवढ्यात देवाभाऊंच्या कार्यालयातून निरोप आला. ‘आधी दिवा, आता घसा. तिसर्‍या प्रकरणात वाचवणार नाही हे लक्षात असू द्या.’ हे ऐकून त्यांचे अवसानच गळाले. मोबाइलवर येत असलेला चाकणकरांचा फोन घेण्याची ताईंची हिंमतच झाली नाही.