पदभार घेतल्यापासून वारंवार होणार्या टीकेमुळे रितूताई कमालीच्या अस्वस्थ होत्या. आधी बांगलादेशींना हाकलून लावते म्हटले म्हणून टीका, मग महागड्या घड्याळावरून नाहक बदनामी, आता लाल दिव्यावरून शरसंधान. राजकारणात नव्याने कारकीर्द सुरू करणार्या एखाद्याला किती त्रास द्यावा? त्याला काही मर्यादा आहेत की नाही, असा प्रश्न स्वत:च्याच मनाला विचारत त्या कागद व पेन घेऊन बसल्या. एक कडक निवेदन समाजमाध्यमावर जारी करून टीकाकारांची तोंडे कायमची बंद करायचीच या निर्धाराने त्या झरझर लिहू लागल्या.
‘समस्त मुंबईकरांनो, माझ्या वाहनाला लागलेल्या लाल व निळ्या दिव्यावरून सध्या नाहक गदारोळ उठवला जात आहे. अतिमहत्त्वाच्या (पदावर असल्याने मी याच श्रेणीत येते) व्यक्तींच्या वाहनांवरील अंबर दिवे सरकारने २०१७ साली हटवले याची मला पूर्ण कल्पना आहे. या निर्णयात वाहनांवर अंबर (लाल) दिवा लावू नये असे म्हटले आहे. मी लावलेले दोन्ही दिवे बोनेटच्या खाली होते. वाहनाच्या वर नव्हते ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आमचे लाडके नेते देवाभाऊंनीसुद्धा हेच निदर्शनास आणून दिले. तसेही मला असे दिवेबिवे लावण्याची हौस नाही. मात्र शहरातील लोकांची सेवा करताना वारंवार वाहतूक कोंडीत अडकल्याने मला वेळ कमी पडू लागला. त्याचा परिणाम माझ्या कामावर होऊ लागला. शहराची प्रथम नागरिक म्हणून या कोंडीतून तातडीने बाहेर पडता यावे अशी अपेक्षा ठेवणे चूक कसे ठरू शकते? बांगलादेशीमुक्त शहर करण्यासाठी मला अनेक गल्ली, बोळ, झोपडपट्टीत फिरावे लागते. तिथे हा दिवा असला तर हे परकीय लवकर ‘तावडीत’ सापडतील असाही माझा हेतू होता. संपूर्ण जगात लाल रंग भीतीचा म्हणून ओळखला जातो. ती शत्रूंमध्ये निर्माण व्हावी व निळ्या दिव्यामुळे माझ्या नागरिकांनी आश्वस्त व्हावे अशाच उद्देशाने मी हे ‘दिवे’ लावले. नुसता निळा दिवा लावला असता तर बांगलादेशींची भीड चेपली नसती. मी ज्या पदावर आहे त्याचा मान राखला जावा असेच समस्त नागरिकांना वाटते. त्यांच्या भावनेचा आदर करण्यात काहीही गैर नाही. मी कुठलाही नियमभंग केलेला नाही. सरकारने हा दिवा लावण्यावर बंदी आणली असली तरी सत्तेच्या दालनात वावरणार्या प्रत्येकाला त्याचे आकर्षण असतेच. हा दिवा सोबतीला असला तर अनेकांचा अहंकार सुखावतो.
मी आधीपासूनच सामान्य व रस्त्यावर उतरून लढणारी कार्यकर्ती असल्याने आकर्षण व अहंकारापासून कायम दूर राहिले आहे. त्यामुळे या दोन गोष्टींमुळे मी दिव्याचा वापर केला असा तर्क काढणे चूक आहे. कुठेही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर शहराची प्रमुख म्हणून तातडीने तिथे हजर राहता यावे यासाठी अशा उपाययोजना कराव्या लागतात. त्यात नियम मोडण्याचा हेतू नसतो. तरीही माध्यमांनी पराचा कावळा केला. असे कितीही दिवे लावले व काढले तरी माझ्या मनात असलेली सामान्यांविषयीची वेदना कुणीही काढू शकत नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. गरजूंना तातडीने न्याय देता यावा यासाठी वाहनाऐवजी साध्या लोकलनेसुद्धा प्रवास करण्याची माझी तयारी आहे. सर्व लवाजमा घेऊन मी लोकलने फिरायला लागले तर प्रवाशांना त्रास होईल. तो या टीकाकारांना चालणार आहे का? त्यामुळे एका महिलेच्या राजकीय उत्कर्षामुळे व्यथित न होता सर्वांनी मला सहकार्य करावे ही अपेक्षा.’ निवेदन लिहून झाल्यावर ताईंना समाधान वाटले. तेवढ्यात त्यांनी टीव्हीकडे बघितले तर एक गाणे सुरू होते. ‘ये लाल रंग कब मुझे छोडेगा.’ हसून त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवला.
