‘चालले होते फिडेल कॅस्ट्रोकडे; पण भेटले दलाई लामांना’ ही रॉबर्ट थर्मन यांच्या तरुणपणाची कहाणी! दलाई लामांच्या भेटीने आयुष्य बदलले आणि ‘तिबेटी बौद्ध भिक्षुमार्गात स्थान मिळवणारे सर्वांत पहिले अमेरिकी’ होऊनच मायदेशी परतल्यावर तिबेटी धर्मशास्त्रातच पीएच.डी. मिळवून, कोलंबिया विद्यापीठातील धर्मशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी २० पुस्तके लिहिली. तिबेटी बौद्धविचाराचा प्रसार करण्यासाठी संस्थाही त्यांनी उभारल्या. अमेरिकी जीवनानुभवातला सपकपणा वयाच्या १७ व्या वर्षीच जाणवल्याने फिडेल कॅस्ट्रोकडे जाऊ पाहाणारा हा तरुण, आयुष्यभर अहिंसक शांततेचा प्रसार करून वयाच्या ८४ व्या वर्षी (१८ जून रोजी) लौकिक जग सोडून गेला. भारत सरकारने २०२० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ ने गौरवले होते.
मॅनहॅटन भागातल्या सुखवस्तू कुटुंबात १९४१ साली जन्मलेल्या रॉबर्ट थर्मन यांची माध्यमिक शाळा (फिलिप एक्स्टर अकॅडमी) ही ‘चर्चा-संवादातून, मुलांनाही बोलायला लावून विषयज्ञान वाढवणारी’ शाळा होती. कॅस्ट्रोप्रेमापायी ही शाळा त्यांना सोडावी लागली. हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला, अठराव्या वर्षीच एका श्रीमंत मुलीबरोबर सहजीवनही सुरू झाले; पण मोटारीचा टायर बदलताना लोखंडी तुकडा डोळ्यात घुसून डोळा गमवावा लागला, तेव्हा नश्वरतेची पहिली जाणीव रॉबर्ट यांना झाली.
शिक्षण आणि सहचारिणीची साथही सोडून ते भटकंतीला निघाले. तुर्किये, इराण इथून भारतात आले. हे साल होते १९६१. म्हणजे, ‘हरे रामा हरे कृष्णा’ म्हणत भारतात येणार्या अमेरिकींचा ओघ सुरू होण्याच्या किमान चार वर्षे आणि ‘बीटल्स’ ऋषिकेशमध्ये पोहोचण्याच्या सात वर्षे आधी. कोरी पाटी घेऊन, केवळ ‘मन:शांती’च्या शोधात वयाच्या धरमशाला येथे आलेल्या रॉबर्ट थर्मन यांना दलाई लामा भेटले, तेव्हा रॉबर्ट यांचे वय होते २० आणि दलाई लामांचे २६! रॉबर्ट दलाई लामांचे शिष्य झाले- पण त्यांना तिबेटी परंपरेप्रमाणेच कसून अभ्यास करावा लागला. त्यासाठी दोन वर्षांत ते तिबेटी भाषा/ ब्रह्मी लिपी शिकले.
पूर्ण दीक्षा मिळालेले भिक्षू झाले. मात्र सहकारी लामांचा, ‘अमेरिकेत या धर्ममताचा प्रसार करण्याची गरज आहे- त्यासाठी संन्यासवस्त्रे येथेच सोडावीत’ हा सल्ला मानून- त्यास दलाई लामांचा होकार मिळवून रॉबर्ट मायदेशी आले आणि संस्कृत भाषेत पदव्युत्तर पदवी तसेच ‘शून्यता’ या विषयावर हार्वर्डची डॉक्टरेट मिळवून, कोलंबिया विद्यापीठात शिकवू लागले. तिबेटी बौद्धमतावर अधीरवाणीने भाष्य करू शकणारे विद्यापीठीय विद्वान असा त्यांचा दबदबा होताच.
तिबेटी धर्मग्रंथांचे त्यांनी केलेले अनुवाद प्रमाण मानले जातात. पण शिकवताना किंवा धर्म वा आध्यात्म यांविषयी भाष्य करणारी पुस्तके लिहिताना रॉबर्ट थर्मन यांची भाषा हलकीफुलकी असे. प्राध्यापकी स्वीकारतानाच (१९७२) ‘अमेरिकन इ्स्टिटट्यूट ऑफ बुद्धिस्ट स्टडीज’ ची स्थापना करून त्यांनी, विद्यापीठांबाहेरही बौद्ध धर्माविषयी जागृती करण्याचा चंग बांधला होता. पुढे अभिनेता रिचर्ड गेअर आदीेसह त्यांनी ‘तिबेट हाउस’ची स्थापना केली, ती संस्था अमेरिकेतील तिबेटी दूतावासच मानली जाते. ताज्या विषयांवर तिबेटी बौद्ध दृष्टिकोनातून ते भाष्य करत. युद्धांना तसेच बंदूक परवाने देण्याच्या धोरणाला त्यांनी नेहमीच विरोध केला. ‘ एकविसाव्या शतकात आपलाच दबदबा असल्याचा अमेरिकेचा कसा काय खरा मानावा?’ हा सवाल २००९ मध्येच त्यांनी केला होता!
