तारक काटे (गांधीवाद)

सत्याग्रह, उपवास हे गांधीजींनी स्वत:त घडवलेल्या वैचारिक बदलांचे नैतिक फलित होते..

गांधीजींचा मूळ पिंड हा समाजसेवकाचा होता व तो शेवटपर्यंत राहिला. त्यांच्या राजकारणाचे स्वरूपही, त्यांच्या काळात इतर महत्त्वाचे राजकारणी करीत असलेल्या राजकारणापेक्षा अतिशय भिन्न होते. त्यांच्या या वेगळेपणाची कारणे त्यांच्या तरुणपणात झालेल्या वैचारिक व मानसिक जडणघडणीत शोधता येतात.

BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

दक्षिण आफ्रिकेत गांधीजी गेले ते तेथील एका मूळ भारतीय उद्योजक पक्षकाराचा वकील म्हणून कज्जा लढविण्यासाठी. तिथे जाताना वकिली पेशात नाव कमवावे आणि आर्थिक लाभही व्हावा एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. पहिल्या तीन वर्षांतच ते यशस्वी वकील झाले, आर्थिक संपन्नताही आली. तोवर आपण बॅरिस्टर म्हणजे उच्चशिक्षित उच्चभ्रू आहोत आणि त्यामुळे गोऱ्यांच्या बरोबरीचे आहोत असा त्यांचा समज होता; त्याप्रमाणेच त्यांचा पेहराव व राहणीमानही होते. मात्र तेथील वास्तव्यात शासन पुरस्कृत वंशवादाचे जे स्वरूप त्यांना पाहावयास मिळाले ते अन्याय्य वाटून त्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना झाली व हळूहळू ते त्यात गुंतत गेले. पुढे तेथील शासनकर्त्यांद्वारे आपल्या हिंदी बांधवांवरील अन्यायाची त्यांना जसजशी जाणीव होत गेली तशी त्यांना संघटित करून त्यांच्या सामूहिक ताकदीने ते अन्याय कायद्याविरुद्ध लढे उभारू लागले. या लढय़ांचे सुरुवातीचे स्वरूप सरकारकडे विनंतीअर्ज देण्यासारखे म्हणजे नेमस्तच होते. ‘मन:पूर्वक विनंती’ हा त्यांच्या राजकारणाचा परवलीचा शब्द होता आणि विरोधकांच्या सारासार विवेकबुद्धीला व नीतिमत्तेला आवाहन करणे हा त्यांचा धोरणाचा एक भाग होता. तेथील स्थलांतरित भारतीय ब्रिटिश साम्राज्याचेच नागरिक असल्यामुळे त्यांना गोऱ्यांच्या बरोबरीने समान हक्क मिळायला हवे, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु हे घडत नसल्यामुळे, ते अधिक जोमाने योग्य पर्यायांचा शोध घेऊ लागले. एव्हाना अन्यायाविरुद्ध तीव्र संताप, समाजसेवेची आंतरिक तळमळ, प्रामाणिकपणामुळे येणारा आत्मविश्वास, सामान्य वा मोठय़ांशी सारख्याच पातळीवर संबंध निर्माण करण्याचे कौशल्य आणि अंगी अमर्याद सुप्त ऊर्जा हे गुण त्यांच्यात एकवटू लागले होते.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मूलग्राही बदल होण्यासाठी जे घटक प्रभावशाली ठरले त्यात भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान, बायबलचे शिखरावरील प्रवचन, जॉन रस्किनचे ‘अन्टु धिस लास्ट’ हे पुस्तक, डेव्हिड थोरो या तत्त्वचिंतकाचे आणि लिओ टॉलस्टॉय या जगप्रसिद्ध लेखकाचे विचार यांचा खूप मोठा प्रभाव होता. ‘निरपेक्ष कर्म करावे’ ही गीतेची शिकवण अमलात आणताना खरा कर्मयोगी होण्याची त्यांना आस लागली. अभिलाषामुक्त, शिस्तबद्ध व श्रद्धावान जीवन जगण्याची आणि आत्म्याचे उदात्तीकरण करणाऱ्या कर्मात सदैव व्यस्त राहण्याची प्रेरणा गांधींना गीतेतून मिळाली. ‘अन्टु धिस लास्ट’ पुस्तकातील ‘‘वकिलाच्या व केशकर्तनकाराच्या कामाची किंमत सारखीच आहे, कारण सामान्यत: जगण्याचा दोघांनाही समान हक्क आहे’’, ‘‘भूमीची मशागत करणारा शेतकरी आणि हस्तव्यावसायिक यांचे जीवन हे खरेखुरे जीवन आहे’’ अशा विचारांनी गांधीजींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविला. या पुस्तकातील ध्येयधोरणाशी सुसंगत जीवन जगण्यासाठी त्यांनी आपल्या विचारात व जगण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा आणि आपले कुटुंब व सहकाऱ्यांसोबत शेतावर राहायचा निर्णय घेतला. थोरोच्या ‘सविनय कायदेभंग’ या जगप्रसिद्ध लेखातून गांधीजींना अन्यायांविरुद्धच्या चळवळीसाठी नवा आशय प्राप्त झाला. अमेरिकेतील निग्रोंची गुलामी व अमेरिकेचे मेक्सिकोवरील आक्रमण याविरुद्ध थोरो उभे राहिले. ‘‘शांततामय क्रांती हा प्रत्येकाचा अधिकार आहे. भयंकर हुकूमशाही व असह्य अव्यवस्थेचा सरकार जोवर त्याग करीत नाही, त्या वेळी त्याला प्रतिकार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे’’ असे थोरोंचे मत होते व त्याप्रमाणे त्यांनी कृती केली.

आणखी वाचा – लोकरंग विशेष : गांधी एक अपरिहार्य रहस्य

त्यांच्याप्रमाणेच गांधीजीही ‘बोलणे व त्याप्रमाणे वागणे’ याबाबतीत सजग होते. तत्त्वे मानायची पण तशी कृती होणार नाही हे आधुनिक संस्कृतीतील असंख्य अन्यायांचे मूळ आहे आणि धर्मपीठे, सरकार व माणसांच्या दुटप्पीपणाचे ते द्योतक आहे असे गांधीजींचे मत होते. ‘ईश्वराचे सिंहासन तुमच्या हृदयात वसलेले असते’ या टॉलस्टॉय यांच्या पुस्तकातून गांधीजींना त्यांच्या विचारांची ओळख झाली. त्याप्रमाणे गांधींनी स्वत:लाच मुक्त करून घेण्यास सुरुवात केली. या तीन तत्त्वचिंतकांच्या विचारप्रकाशात आपल्या आयुष्याची वाटचाल करताना गांधीजींनी स्वत:च्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात जे अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणले, त्यामुळे द. आफ्रिकेतून भारतात परतण्याआधीच ते महात्मापदाकडे पोहोचले होते.

दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांसाठी तेथील सरकारने एक अन्याय्य वटहुकूम लादण्याचा प्रस्ताव आणला तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी गांधीजींनी प्रथमच ‘सत्याग्रह’ या शब्दाचा प्रयोग केला. सत्याग्रह म्हणजे प्रतिस्पर्ध्याला क्लेश न देता स्वत:ला क्लेश करून सत्याचे समर्थन करणे; त्यासाठी स्वनियमनाची आवश्यकता असते; सत्याग्रह नेहमी शांततामय असतो; केवळ बोलण्यातून विरोधकाला आपलेसे करून घेता येत नसले तरी पावित्र्य, नम्रता व प्रामाणिकपणा यांनी त्याला आपलेसे करता येते असे गांधींचे प्रतिपादन होते. यात शासनाच्या जुलमी सत्तेला विरोध करताना शासनाच्या प्रतिनिधींशी आपले वर्तन शत्रुत्वाचे न राहता सौहार्दाचे राहिले पाहिजे याची हमी होती; त्याप्रमाणेच गांधीजींचे वर्तन राहिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत भारतीयांविरुद्ध अगदी तिरस्करणीय कायदा आणू पाहणाऱ्या जनरल स्मट यांना गांधीजींनी आपल्या हाताने तयार केलेली जी चप्पल भेट दिली, ती स्मट यांच्या सदैव स्मरणात राहिली.

१९१५ साली कायमचे भारतात परतल्यावर गांधींच्या ‘सविनय कायदेभंग’ तंत्राचा पहिला प्रयोग झाला तो बिहारच्या चंपारणमधील निळीच्या कायद्याविरोधात १९१७ मध्ये. या अन्याय्य कायद्याची झळ ज्या सामान्य पीक-वाटेकरी शेतकऱ्यांना बसत होती त्यांना संघटित करून व जवळपास दहा हजार शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून त्यांचे गाऱ्हाणे सनदशीरपणे सरकार दरबारी मांडण्यात आले. सरकार दाद देण्याच्या मन:स्थितीत नव्हते, तेव्हा हजारो शेतकऱ्यांच्या सहकार्याने सविनय कायदेभंगाचे हत्यार उगारून गांधींनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. दुसऱ्या आंदोलनाचा प्रसंग अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या संपातला. तुटपुंजे पगार- अधिक वेळ काम हे कामगारांच्या प्रक्षोभाचे कारण होते. पगारवाढ व अन्य सुविधा ही त्यांची मागणी गांधींना योग्य वाटली. या संपातून मार्ग काढण्यासाठी बसविण्यात आलेल्या लवादानेही, कामगारांच्या मागण्या न्याय्य असल्यामुळे त्या स्वीकाराव्यात असे सुचविले, तरी गिरणीमालक मान्य करायला तयार नव्हते. त्यावर गांधींनी ‘उपवासाचा’ मार्ग अवलंबिला. हा सार्वजनिक हितासाठीचा त्यांचा पहिला उपवास. त्यापुढे गिरणीमालकांना नमते घ्यावे लागले. एव्हाना या दोन आंदोलनांमुळे भारतातील जनमानसात गांधीजींचे स्थान पक्के होत गेले. 

आणखी वाचा – पडद्यावरचा न नायक!

१९०५ साली वंगभंगाच्या चळवळीत स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतु:सूत्रीच्या आधारे लोकमान्य टिळकांनी देशव्यापी आंदोलन उभे केले व पुढे १९१४ साली मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर ते जास्त व्यापक केले. म्हणूनच आचार्य जावडेकरांनी टिळकांना ‘भारतातील जनआंदोलनाचे आद्य प्रवर्तक’ असे सार्थपणे संबोधिले आहे. एव्हाना भारतीय काँग्रेस पक्षाची सूत्रे मवाळांकडून जहालवाद्यांकडे आली होती आणि त्याचे नेतृत्व टिळकांकडे आले होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सुरुवातीला गांधीजींची भूमिका समन्वयाची होती आणि त्यांचे राजकीय मार्गदर्शक होते नामदार गोपाळ कृष्ण गोखले. परंतु १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग मृत्युकांडाने गांधीजींचे मवाळपण घालविले आणि त्यांची राजकीय वाटचाल वेगळय़ा दिशेने झाली, जी टिळकांच्या जनआंदोलनांच्या जवळ जाणारी होती. ‘टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक होते, तर गांधीजी या असंतोषाला आंदोलनाचे स्वरूप देऊन ते रस्त्यावर आणणारे नेते होते, १९२० चे असहकार आंदोलन हा टिळकांनी जागविलेल्या राष्ट्रीय असंतोषाचा पुढचा अध्याय आहे’, असे प्रा. सुरेश द्वादशीवारांनी नमूद केले आहे. ते असेही म्हणतात की, ‘यानंतरचा गांधींचा प्रवास हा टिळकांनी जागविलेला लोकक्षोभ सत्याग्रहात रूपांतरित करण्याचा व त्याच वेळी गोखल्यांचे नि:शस्त्र राहण्याचे वाचन पाळण्याचा आहे. १९२० नंतरचे गांधी हे गोखल्यांचे सनदीपण आणि टिळकांचे जहालपण एकत्र आणून पुढे जाणारे नेते आहेत.’ खरे तर गांधी व टिळकांची विचारसरणी परस्परविरोधी होती. गांधी साधनशुचिता मानत; तर अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टिळक प्रयत्नशील होते. तरी टिळकांच्या निधनानंतर स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व गांधीजींकडे आले. त्यांनी उभारलेल्या असहकार, खेडा सत्याग्रह, खिलाफत चळवळ, दांडीयात्रा, ‘चले जाव’ चळवळ या सर्व आंदोलनांवर त्यांच्याच विचारांचा ठसा उमटलेला दिसतो. टिळक व गांधींच्या आधी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व देशातील सुशिक्षित अशा अभिजन वर्गाकडे होते. मात्र टिळकांच्या नेतृत्वाखाली मध्यमवर्ग त्यात सहभागी होऊ लागला आणि गांधींच्या काळात स्वातंत्र्याचा विचार देशातील सर्व वर्गजातीधर्मातील अगदी तळागाळांतील जनसामन्यांपर्यंत पोहोचून त्यांनी उभारलेली जनआंदोलने अधिक व्यापक झाली.

गांधीजींनी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जुलमी सत्तेविरुद्ध अहिंसात्मक असहकाराचे जे प्रारूप सत्याग्रहाच्या स्वरूपात जगाला दिले त्याने अमेरिकेतील  मार्टिन ल्यूथर किंग, दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला, म्यानमारमधील आँग सान स्यू क्यी यासारख्या मानवी हक्कासाठी लढणाऱ्या नेत्यांना प्रेरणा दिली. अलीकडे दीर्घकाळ चाललेले नर्मदा बचाव आंदोलन, एक वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू राहिलेले शेतकरी आंदोलन, भांडवलशाही विरोधातील वॉलस्ट्रीट आंदोलन, ग्रेटा थुन्बर्गची हवामान बदलाच्या संदर्भातील ‘फ्रायडेज फॉर फ्यूचर’ ही जागतिक चळवळ किंवा  श्रीलंकेत झालेली तेथील आर्थिक गैरव्यवहाराविरोधातील चळवळ ही गांधींच्या अहिंसात्मक प्रतिकाराचीच प्रतििबबे आहेत असे वाटते.  

लेखक जैवशास्त्रज्ञ असून शाश्वत विकास व शाश्वत शेती या विषयांचे अभ्यासक आहेत.

vernal.tarak@gmail.com