ऑस्ट्रेलियाचा इतिहास हा इथल्या मूळनिवासींना (ॲबोरिजिनल) विस्थापित करूनच घडला आहे आणि माणसांच्याच नव्हे तर प्राण्यांच्याही विस्थापनासाठी सैन्याचा वाटेल तसा वापर सत्ताधार्‍यांनी वेळोवेळी केलेला होता, हे वास्तव उघडपणे मांडण्यासाठी ‘जावी’ या ऑस्ट्रेलियन मूळनिवासी जमातीतले रॉन ब्रॅडफील्ड यांनी एक कलाकृती केली. शिकार केलेल्या वाघांचे कातडे आपल्याकडे भिंतीवर टांगत, तसे टांगलेले कांगारूचे कातडे आणि त्यावर मधोमध ऑस्ट्रेलियन सेनादलांमध्ये सर्वोच्च मानल्या जाणार्‍या पदकांच्या प्रतिकृती… पण ही पदके शिंपल्यांतून, मूळनिवासींनी निगुतीने वाढवलेल्या आणि युरोपियनांनी कत्तल केलेल्या झाडाच्या लाकडातून कोरून काढलेली असे या कलाकृतीचे स्वरूप. या कलाकृतीला १५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलरचे (सुमारे दहा लाख साडेसात हजार रुपये) ‘नेपियर वॉलर कला पारितोषिक’ नुकतेच जाहीर झाले. या पारितोषिकाचे पहिले मूळनिवासी विजेते ठरण्याचा मान त्यांना मिळाला हे विशेषच, पण जिथेजिथे मूळनिवासी आहेत अशा (भारतासह) सर्वच देशांच्या दृष्टीने आणखी विशेष म्हणजे, हे पारितोषिक ऑस्ट्रेलियन सैन्यदलांतर्फे, तीन्ही सेनादलांतील आजी-माजी सैनिकांच्या कलाकृतींची स्पर्धा घेऊन दिले जाते आणि त्यासाठीच्या परीक्षक मंडळावर सेनादलांतील अधिकारीसुद्धा असतात. ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते, त्यापैकी निवडक कलाकृतींचे प्रदर्शन देशभर फिरते. याच सेनादलांनी इतिहासात केलेल्या दुष्कृत्यांना चव्हाट्यावर टांगणारी कलाकृती हे बक्षीस मिळवते, याचा अर्थ ऑस्ट्रेलियन सेनादले आपल्या काळ्या इतिहासाची कबुली देतात आणि ‘आता सगळे मिळून पुढे जाऊ’ अशी भूमिका घेतात!

ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांनी त्या अन्यायाची आता वाच्यताच करायची नाही, अशी अघोषित सक्तीच ‘आता झाले गेले विसरू’ म्हणणार्‍यांकडून केली जात असते, हीच जगरहाटी… पण इथे अन्यायाला कलात्मकपणे वाचा फोडणार्‍याचा गौरव केला जातो, यातून जगानेही बरेच शिकण्यासारखे आहे. हे पारितोषिक मिळवणारे रॉन ब्रॅडफील्ड (ज्यु.) हे ऑस्ट्रेलियाच्या वायव्येकडल्या नॉर्दम्प्टन (मूळ नाव मूनीमिआ) इथे, मूळनिवासी परंपरा त्यागून ‘ऑस्ट्रेलियन’ होण्याची सक्ती झालेल्या कुटुंबात जन्मले. त्यामुळे त्यांचे शिक्षण, संवर्धन ‘ऑस्ट्रेलियन’पद्धतीनेच झाले आणि वयाच्या विशीत- १९९१ मध्ये ते ऑस्ट्रेलियन नौदलात, युद्धनौकांवरल्या इलेक्ट्रिकल वेपन्स विभागात सहायक म्हणून काम करू लागले. या चाकरीत ते १९९७ पर्यंत होते. मूळनिवासी तरुणांसाठी काम करण्याची सुरुवात त्यांनी १९९९ पासून केली. पण केवळ कौशल्य/नोकरी आदींचे मार्गदर्शन पुरेसे नसून या पिढीने व्यक्त झाले पाहिजे, हे रॉन यांनी ओळखले आणि तरुणांना, त्यांच्या पालकांनाही ते बोलते करू लागले. ऑस्ट्रेलियाच्या मौखिक इतिहास विभागानेही यासाठी साह्य केले. अनुभवकथनाची व्याप्ती वाढवण्यासाठी रॉन कथाकथनाकडे वळले आणि हेही पुरेसे नाही म्हणून अभिनय, चित्रकला अशा प्रांतांतही उमेदवारी करू लागले. ब्रिटिश कौन्सिलने, सांस्कृतिक नेतृत्व आणि व्यवस्थापन यांतील गुणांसाठी त्यांना हेरले आणि याविषयीचे प्रशिक्षणही दिले. त्यानंतर पर्थमधील ‘सेंटर फॉर स्टोरीज’ आणि ‘जॉन कर्टिन गॅलरी’ या दोन संस्थांसाठी ते काम करतात आणि चित्रकलेचा छंदही जपतात. त्यांना मिळालेले पारितोषिक हे त्यांच्या उत्कर्षाइतकेच, ऑस्ट्रेलियाच्या सामाजिक न्यायाचेही प्रतीक ठरले आहे.