एखादी विचारधारा पटलेली असते, मग त्याच विचारधारेच्या पक्षाची सत्ता हवी ही खूणगाठही पक्की होते, पण प्रत्यक्षात तो पक्ष सत्तेवर असताना मात्र ‘खुर्चीसाठी सत्ता आणि सत्तेसाठी खुर्ची’ हाच नेत्यांचा खेळ पाहावत नाही, तो खेळ थांबावा असेच वाटते… ही अवस्था कोणत्याही देशात, कोणत्याही काळात, कोणाही विचारी माणसाची होऊ शकते. तशा अवस्थेत माणसे एकतर कुढतात/ खासगीत संताप व्यक्त करतात, पण सत्ताधार्‍यांना घाबरून गप्प बसतात किंवा सरळ सत्ताधार्‍यांची मानसिक गुलामगिरी पत्करतात. ही कोंडीच आणि तीही कोणत्याही काळात होऊ शकणारी. रॉय मेदवेदेव यांचे मोठेपण असे की, त्यांनी ती कोंडी फोडली. सोव्हिएत रशियासाठी १९४३ पासून दुसर्‍या महायुद्धात आघाडीवर गेलेल्या तरुण रॉय मेदवेदेव यांनी स्टालिनशाहीबद्दलच नव्हे तर पुढल्या काळात ख्रुश्चेव, ब्रेझनेव्ह यांच्याही काळाबद्दल टीकास्पद लिखाण केले. ‘स्टालिनपासून पुतिनपर्यंतचा काळ पाहाणारे महत्त्वाचे समकालीन इतिहासकार’ अशी ख्याती मिळवून १३ फेब्रुवारी रोजी, वयाच्या १०० व्या वर्षी ते निवर्तले. त्यांची ३५ हून अधिक पुस्तके यापुढेही वाचली जातीलच; पण ‘निष्ठा वैचारिकच असावी- सत्तेशी निष्ठा जोडू नये’ हा त्यांनी स्वत:च्या जगण्यातून दिलेला संदेश त्या पुस्तकांतल्या ऐवजापेक्षाही अधिक महत्त्वाचा.

अशा वैचारिक निष्ठा बाळगणार्‍यांना प्रसंगी ‘देशविरोधी’ ठरवण्यापर्यंत सत्ताधीशांची मजल जाते. टीकाकारांना कैदेत टाकणे जमले नाही तर त्यांची सार्वजनिक बदनामी करणे, त्यांच्या कामात अडथळे आणणे, आर्थिक नाकेबंदी करणे हे सारे मार्ग सत्ताधीश व त्यांच्या यंत्रणा वापरतात. हे सारे रॉय मेदवेदेव यांनाही सहन करावे लागले. पण वैचारिक निष्ठा म्हणजे पोथीनिष्ठा नव्हे, मानवी मूल्येच या निष्ठेच्या केंद्रस्थानी हवी, हे उमगण्याचा वारसाच त्यांना लाभला होता, तो त्यांनी जपला. त्यांचे वडील अलेक्सांद्र हे लेनिनकाळातल्या क्रांतिसेनेचे कमिसार! पुढे ते लेनिनग्राडच्या विद्यापीठात साम्यवादी समाज-सिद्धान्त या विषयाचे प्राध्यापक झाले. त्यांना १९२५ मध्ये झालेल्या जुळ्या मुलांपैकी एक रॉय, दुसरे जीवशास्त्रज्ञ झोरेस. अलेक्सांद्र यांनी ‘रॉय’ हे नाव निवडले ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा आदर म्हणून (हे रॉय पुढे स्टालिनविरोधक ट्रॉटस्की यांचे वैचारिक सहप्रवासी म्हणून ओळखले जात)! रॉय-झोरेस यांच्या वडिलांना स्टालिनकाळात ‘गुलाग’ छळछावणीत जावे लागले, तिथेच आयुष्य संपले. तरीही न डगमगता रॉय यांनी त्या काळच्या गुप्त नियतकालिकांमध्ये लिखाण सुरू ठेवले. स्टालिनकाळात तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी, मग अध्यापक असलेले रॉय पुढे विद्यापीठीय प्राध्यापक झाले; ख्रुश्चेव्ह सत्तेत आले तेव्हा रॉय यांचे ‘लेट हिस्ट्री जज’ हे स्टालिनशाहीचा उगम आणि दुष्परिणाम सांगणारे पुस्तक तयार होते. ‘स्टालिन गेल्यावरही स्टालिनशाहीच्या खुणा दिसू शकतात- पुढले सत्ताधीश त्याहीपुढे जाऊ शकतात- हे धोके कसे ओळखावेत’ अशाही मुद्द्यांना हात घालणारे ते पुस्तक अखेर १९७१ मध्ये अमेरिकेत प्रकाशित झाले. त्याआधीच- १९६९ मध्ये- सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीने त्यांना बेदखल केले. हे सदस्यत्व परत मिळण्यासाठी १९८९ चा गोर्बाचोव्ह काळ यावा लागला. गोर्बाचोव्ह यांचे ते सल्लागार, सहकारीही झाले. येल्तसिन राजवट संपून पुतिन यांचा उदय होताना त्यांनी पुतिन यांचे कौतुक केले, तेच त्यांच्या दीर्घ वृद्धापकाळाचे पहिले लक्षण ठरले.