भारतीय हिंदी चित्रसंगीत ऐकणार्‍या गानप्रेमींचेही बरेच गैरसमज असतात. जसे ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाचे विजय बेनेडिक्ट यांनी गायलेले शीर्षकगीत हमखास बप्पी लाहिरी यांच्या तोंडी मारले जाते; तसेच रेहमानच्या ‘दिल है छोटासा’ या गाण्यानंतर आणि मिन्मिनी यांच्या आवाजानंतर दक्षिण भारतीय संगीताची लाट आल्याचे नव्वदोत्तरी हिंदी संगीताचे अभ्यासक ऊर बडवत सांगत असतात. एस. पी. बालसुब्रमण्यम आणि एस. जानकी यांच्यासह आधीच झालेल्या गानप्रयोगांचा सामूहिक विसर पडलेला असतो. ज्या काही आवाजांनी आपली खरी ओळख दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंत गाजवली त्यात एस. जानकी यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. दर्दींनी त्यांची गाजलेली काही हिंदी गाणी मंगेशकर भगिनींच्या नावे नोंदवली असू शकतील. त्यांच्या चित्रगीतांमधील एकल, युगल आणि अल्बममधील गाण्यांची एकूण संख्या ४८ हजारांहून अधिक आहे (जगासाठी आदरणीय लता मंगेशकर यांच्या नावावरही ३० हजार गाणी आहेत.) कन्नड गीतांची संख्या अधिक असली, तरी एकूण २० भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. आयुर्वेदिक शल्यविशारदाच्या पोटी तेव्हाच्या मद्रास या ब्रिटिश प्रांतात १९३८ साली जन्मलेल्या एस. जानकी यांचे शास्त्रीय गायनाचे औपचारिक शिक्षण झाले नाही. मात्र त्यांनी संगीताचे धडे नवव्या वर्षी नादस्वरम या दक्षिण भारतीय वाद्याच्या विद्वानाकडे सुरू केले. ज्यांना जानकी अम्मा यांच्या आवाजातील तीव्रोत्तम पट्टी लक्षात येते, त्यांना ती कुठून आली, याचा शोध लागू शकेल. या वाद्याच्या तारस्वराची ती जादू आहे. १९५७ साली हिंदी चित्रगीतांमध्ये रफी, किशोर, मुकेश यांच्यासह लता-आशा यांच्या गाण्यांचे युग प्रस्थापित झाले होते, त्याच वर्षी तेलुगू मातृभाषा असलेल्या जानकी अम्मा आपल्या भाषेसह कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये गाऊ लागल्या. पुढल्या सहा दशकांत त्यांनी आपल्या आवाजाची नजाकत जराही कमी होऊ दिली नाही. हिंदी चित्रसृष्टीला त्यांचा आवाज कळाला फारच उशिराने. तो देखील बप्पी लाहिरींमुळे. ‘यार बिना चैन कहाँ रे’ हे ‘साहेब’ चित्रपटातील गाणे (१९८५) त्यांनी बप्पी लाहिरींबरोबर गायले. नंतर ‘सुन रुबीया तुमसे प्यार हो गया’, ‘गोरी का साजन’ ही अमिताभ बच्चन यांच्या उतारकाळातील सिनेमांतील अजूनही लक्षात राहिलेली गाणी त्यांनी गायलीत. बप्पी लाहिरी यांच्यासह त्यांचे शेवटचे काम ‘अव्वल नंबर’ नामक देव आनंद यांच्या टुकार सिनेमातील श्रवणीय गीत. पण हिंदीतल्या गायनापेक्षा दक्षिण भारतीय भाषांतील चित्रगीतांचे काम डोंगराएवढे. सार्‍याच दक्षिण दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. इलैया राजा यांच्या चालींमध्ये दोनशेहून अधिक युगल गीते त्यांनी गायलीत. ए. आर. रेहमानच्या हिंदीतील सुवर्णकाळात त्यांनी एकच ‘मास्टरस्ट्रोक’ गाणे दिले.

‘हमसे है मुकाबला’तील ‘गोपाला गोपाला’! या गाण्यातल्या मादकतेमुळे, गानरसिक आशा भोसले यांनीच हे गाणे गायले असल्याचे वाटून फसतात. त्यांनी एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्यासह गायलेल्या ‘नुगुवू नयना मधुरा मौना’ या इलैया या राजा यांच्या गाण्याला पुढे ‘आयडिया’ या मोबाइल सेवा यंत्रणेने जगभर आपल्या प्रसारधूनद्वारे गाजवले. यूट्यूबवर ते गाणे पाहणे हा अनेकांसाठी एक सांस्कृतिक धक्काच ठरला. जानकी अम्मांची अशी किती तरी गाणी आहेत, जी केवळ हिंदी चित्रसंगीताच्या प्रेमात अडकून पडलेल्यांना उमजू शकत नाहीत.

एस. जानकी यांचे नुकतेच निधन झाले, त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गायन महत्तेची छोटीशी दखल.