देशात राजस्थान आणि छत्तीसगड या दोनच राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत उरला आहे. त्यापैकी राजस्थानात पक्षांतर्गत गटबाजी कमालीची टोकाला गेली आहे. सचिन पायलट यांचे बंड फसल्याने अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पडता पडता मागे वाचले होते. भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या दिशेनेच सारी पावले पडावीत अशीच पक्षातील सद्य:स्थिती. मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेस पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यावरही काही फरक पडलेला नाही असेच चित्र राजस्थानमधील सचिन पायलट यांच्या ताज्या पवित्र्यावरून स्पष्ट होते. गेहलोत यांच्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत नाही याचे शल्य सचिन पायलट यांना नक्कीच असणार. कारण गेल्या महिन्यात अगदी हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद गेहलोत व त्यांच्या समर्थकांच्या बंडामुळे गेले. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर आले होते. कोणत्याही विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यातील सरकारी समारंभाला मोदी उपस्थित राहिल्यावर प्रेक्षकांमधून ‘मोदी, मोदी’ असा जयघोष करीत विरोधी मुख्यमंत्र्याला नामोहरम केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींच्या राजस्थान दौऱ्यात मात्र तसा अनुभव आला नाही. याउलट पंतप्रधान मोदी यांनी गेहलोत यांच्याबद्दल दोन शब्द चांगलेच उच्चारले. विरोधकांना नामोहरम करण्याच्या मोदी यांच्या नेहमीच्या आवेशाला ते साजेशे नव्हते. सचिन पायलट यांनी नेमके यावरच बोट ठेवले. ‘मोदी यांनी अशाच प्रकारे राज्यसभेत तत्कालीन विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले होते. पुढे काय झाले हे सारे जाणताच’ अशी मार्मिक टिप्पणी करीत गेहलोत यांच्याबद्दल ते चांगले बोलले हे पक्षाने हलक्यात घेऊ नये, असा इशारा पायलट यांनी दिला. गेल्या महिन्यात पक्षाने बोलाविलेल्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरविणाऱ्या आमदारांच्या विरोधात कारवाईची मागणीही त्यांनी केली. पायलट यांनी थेट मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावरच हल्ला चढविला आहे. आता हे पायलट स्वत: बोलले की त्यांचा बोलविता धनी अन्य कोण आहे याचा शोध आता काँग्रेसच्या वर्तुळात घेतला जाईल. कारण काँग्रेस अध्यक्षपदाकरिता गेहलोत यांचे नाव निश्चित झाले होते. पण राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी आपल्यालाच कायम ठेवावे किंवा आपण सांगू त्यालाच मुख्यमंत्री करावे ही गेहलोत यांची अट होती.

काहीही करून सचिन पायलट मुख्यमंत्री होता कामा नयेत, असाच त्यांचा सारा रोख होता. पायलट यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते. गेहलोत यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वीच नव्या नेत्याच्या निवडीकरिता विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक बोलाविण्याचा निर्णय ज्यांनी कोणी घेतला तो पूर्णपणे चुकला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर ९२ आमदारांनी बहिष्कार तर घातलाच पण विधानसभा अध्यक्षांचे निवासस्थान गाठून थेट आमदारकीच्या राजीनाम्याचे अस्त्र उगारले. हे सरळ सरळ सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला गेहलोत यांनी दिलेले आव्हानच होते. काँग्रेस अध्यक्षपद नको ही गेहलोत यांची इच्छा पूर्ण झाली पण त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहील का याबद्दलचे चित्र अस्पष्ट दिसते. सोनिया आणि राहुल यांना आव्हान देणाऱ्या गेहलोत यांचे मोदी यांनी कौतुक करावे हे काँग्रेसच्या राजकारणात कधीच रुचणारे नाहीच. मोदी यांनी गेहलोत यांचे केलेले कौतुक गांभीर्याने घ्या, या पायलट यांचा बोलविता धनी कोण, यावरच गेहलोत यांचे भवितव्य अवलंबून असेल.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilot ashok gehlot controversy ashok gehlot vs sachin pilot sachin pilot attacks ashok gehlot zws
First published on: 04-11-2022 at 03:41 IST