सुजाउद्दौला मराठ्यांच्या बाजूला येण्याऐवजी अब्दालीला जाऊन मिळणार, ही बातमी समजल्यावर ‘‘सदाशिवरावभाऊने असा बेत केला की, सरदारांसह आपण आग्र्याला जाऊन, यमुना उतरून नजीबखान व अबदाली यांच्या मध्ये उतरावे व दोघांचेही निरनिराळ्या दिशांनी पारपत्य करावे. त्या वेळी अबदाली होता अनुप शहरी, नजीबखान व सुजाउद्दौला बिठूरास होते व गोविंदपंत त्या दोघांच्या मध्ये इटाव्याजवळ होता.
अबदालीजवळ तीस हजार फौज, नजीबखान व सुजाउद्दौला यांच्याजवळ वीस हजार फौज व गोविंदपंताजवळ सरासरी आठ हजार फौज होती. आग्र्याजवळ यमुना उतरून पश्चिमेकडून गोविंदपंताला मिळता घेऊन प्रथम नजीबखान, जहानखान व सुजाउद्दौला यांचे पारपत्य करावे व नंतर अबदालीची खोड मोडावी, असा भाऊचा बेत होता…’’ – सदाशिवरावभाऊंची ती योजना स्पष्ट करताना लगेच गोविंदपंताला पाठवलेला महत्त्वाचा निरोपही राजवाडे नोंदवतात. तो निरोप होता- ‘आपल्या प्रांतातील सर्व नावा यमुनेच्या दक्षिणतीरी सुरक्षित आणून जमवून ठेवाव्यात.’
‘गंभीर नदी उतरून सदाशिवभाऊ सरदारांना त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने जाऊन ६ जुलैला मिळाला. सुजा अबदालीला निश्चित जाऊन मिळणार, अशी बातमी तेथे कळल्यावर त्याने सुजाकडे पाठवलेल्या रामाजी अनंत व नारो शंकर यांना अध्र्याच रस्त्यातून परत बोलावले व यमुना उतरून अंतर्वेदीत शिरण्याचा बेत तडीस नेण्याचा प्रयत्न केला. अबदालीवर चालून जाण्याचा हा पहिला बूट होता.
अबदालीचे काही सैन्य पूर्वेस अनुप शहराकडे होते व काही सैन्य नजीबखान व जहानखान यांच्याबरोबर सुजाउद्दौल्याकडे बिठूरास गेेले होते; तेव्हा अबदाली व नजीबखान प्रत्येकी भाऊपेक्षा बलाने कमी होता, हे स्पष्ट होते. या वेळी अकस्मात मध्ये उतरून अबदालीचे पारपत्य करण्याचा हा जो भाऊने बूट काढला होता, तो सर्वोत्कृष्ट होता, यात संशय नाही.’’
राजवाड्यांनी असा शेरा मारला आणि ‘‘सदाशिवरावाने तीन हजार जाट व मानाजी पायगुडे वगैरे सरकारी पथके यमुनेच्या पलीकडे पाठवून सकुराबादेस मराठ्यांचे ठाणे बसवले’’, वगैरे आनुषंगिक तपशील दिला, पण- ‘‘तेवढ्यात कळले की, सुजाउद्दौला व नजीबखान अबदालीकडे अनुप शहराला जात आहेत. खरे म्हणजे त्या परिस्थितीत गोविंदपंताने त्या दोघांना मध्येच वाटेत अडवून ठेवायला हवे होते;
परंतु गोविंदपंताच्या त्यावेळच्या सर्व हालचाली हयगयीच्या, चुकारपणाच्या व दिरंगाईच्या होत्या’’, असा शेरा त्यांना नोंदवावा लागला. ‘‘गोविंदपंताने सुजाउद्दौल्याला सुरक्षितपणे जाऊन दिले, इतकेच नव्हे, तर यमुनेच्या दक्षिणतीराला नावा जमवून ठेवावयाच्या, त्याही वेळेवर जमवल्या नाहीत. (त्यामुळे) १२ जुलैला सरदार, जाट व सदाशिवभाऊ आग्र्याला आले, तेव्हा यमुना उतरून पलीकडे जाता येणे अशक्य आहे, अशी त्यांची खात्री झाली. सुजाउद्दौला व नजीबखान जे निसटून गेले, ते थेट अबदालीला शिकंदर्यास जाऊन भेटले.
गोविंदपंतांच्या हयगयीमुळे व गैदीपणामुळे (कामातल्या ढिलाईमुळे) सदाशिवरावभाऊच्या हातची ही पहिली शिकार गेली. भाऊच्या मनात स्वदेश पाठीशी घालून अबदालीला यमुनेत रेटून बुडवावयाचे होते, परंतु या वेळी ते काही साधले नाही.’’ राजवाड्यांनी इतर बाबींसंबंधानेही गोविंदपंताचे वर्तन कसे तोट्याचे होते, हेही स्पष्ट केले. त्यांनी लिहिले, ‘‘पंचवीस लाख रुपयांचा भरणा स्वारी हिंदुस्थानात आली म्हणजे ताबडतोब करण्याबद्दल गोविंदपंताला सदाशिवभाऊने पडदुराहून (निघताना) लिहिले होते, परंतु तेही काम त्याने अद्याप बजावले नाही.
‘गारा पडून देशाची धुळधाण झाली’; ‘यवनांच्या येण्यामुळे रयत लावणीसंचणी करीत नाही’, ‘बुंदेलखंडातील व अंतर्वेदीतील संस्थानिक बंडे करून पैसा देत नाहीत’, वगैरे सबबी सांगून सदाशिवरावाला वाटेस लावण्याचा त्याचा इरादा होता. त्याच्या या सबबींत काहीच तथ्य नव्हते… सदाशिवरावभाऊने त्याला चुचकारून, दरडावून, स्तुती करून, रागे भरून, टोचून, खोचून नाना प्रकारे लिहिले; परंतु कामे न करण्याचे आपले व्रत त्याने काही सोडले नाही.
पेशव्यांचे साहाय्य युक्तीने, प्रयुक्तीने, बहाण्याने व शिताफीने न करण्याचा उद्योग मात्र त्याने साधेल तितका केला’’…गोविंदपंताचे हे वर्तन सदाशिवरावभाऊच्या ध्यानात आले नाही, असे नाही; परंतु यवनांच्या द्वेषाने, शिपाईिगरीच्या नैसर्गिक तडफेने, लोकांच्या लज्जेने व धन्यावरील स्वामिभक्तीने प्रोत्साहित होऊन गोविंदपंत आपली बाजू सांभाळील, असा भाऊचा तर्क होता…
