सॅली रूनी या आयर्लंडमधल्या लेखिका. त्यांच्या पुस्तकांवर बंदी आली आहे इंग्लंडमध्ये आणि कारण ठरलं आहे पॅलेस्टाइन. जगाच्या कोणत्याही कोपर्यात, कोणत्याही क्षेत्रात काहीही बिघडलं की त्याची झळ संपूर्ण जगभर प्रत्येक क्षेत्राला आणि प्रत्येकाला या ना त्या प्रकारे बसतेच, त्याचं हे उदाहरण!
तर झालं असं- या रूनी यांनी गतवर्षी म्हटलं होतं, की मी माझ्या पुस्तकांच्या रॉयल्टीतून ‘पॅलेस्टाइन ॲक्शन’ या चळवळीला आर्थिक साहाय्य देणे सुरूच ठेवणार आहे. आता हे ‘पॅलेस्टाइन ॲक्शन’ काय प्रकरण आहे, तर ही चळवळ सुरू झाली ब्रिटनमध्ये- जुलै २०२०च्या सुमारास. इस्रायली सैन्याला साधनसामुग्री पुरवणार्या संरक्षण कंत्राटदारांना लक्ष्य करणं हे या चळवळीचं उद्दीष्ट आहे. चळवळीवर ब्रिटिश सरकारने दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत बंदी घातली आहे. चळवळीचं सदस्यत्व घेणं, समर्थन करणं किंवा तिच्याशी संबंधित प्रतिकं बाळगणं हा फौजदारी गुन्हा आहे. या बंदीला आव्हान देणारी याचिका ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तर, अशा या चळवळीला रूनी यांनी जाहीर पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांच्या साहित्यावर ही बंदी लादली गेली.
या बंदीवर रूनी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली प्रतिक्रिया अशी की, ‘‘ब्रिटिश सरकारने जुलै २०२५ मध्ये ‘पॅलेस्टाईन ॲक्शन’ही दहशतवादी संघटना असल्याचं जाहीर केलं. त्या पुढच्या महिन्यात, मी एका लेखात या चळवळीचा पाठिंबा देणं सुरूच ठेवण्याचा माझा मानस व्यक्त केला होता. कारण आयर्लंडमध्ये या गटावर कोणतेही प्रतिबंध नाहीत. मात्र आता ब्रिटनमध्ये माझं साहित्य प्रकाशित करण्याबाबतचे करार पूर्ण करणं हा गंभीर फौजदारी गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे माझी पुस्तकं प्रकाशित करणार्या ‘फेबर प्रकाशना’ने माझ्याशी रितसर चर्चा करून, माझ्या पूर्ण संमतीने आता ब्रिटनमध्ये माझं साहित्य उपलब्ध करून न देण्याचा निर्णय घेतला आहे.
मी माझ्या तत्त्वांशी आणि वाचकांशी प्रामाणिक राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याचे जे काही परिणाम होतील ते भोगण्यास मी तयार आहे.’’ त्यांच्या पुस्तकांच्या ई-बुक आवृत्त्या विविध संकेतस्थळं आणि ॲप्सवरून आधीच काढून टाकण्यात आल्या आहेत. पुस्तकांच्या दुकानांमध्ये मात्र छापील प्रती आजही शिल्लक आहेत. अशा शिल्लक प्रती विकण्यावर बंदी नसल्याचं, ‘फेबर’ने स्पष्ट केलं आहे. रूनी या त्यांच्या ‘नॉर्मल पीपल’ या आजच्या काळातील नातेसंबंधांवर भाष्य करणार्या कादंबरीमुळे ओळखल्या जातात.
जगभरात आजवर त्यांच्या पुस्तकांच्या ६० लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. ब्रिटनमध्येही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र आजच्या डिजिटल युगात साहित्य, चित्रपटांवरील बंदी वारंवार फोल ठरताना दिसते. बंदी घातल्यावर संबंधित पुस्तकांचा अन्य अनधिकृत माध्यमांतून अधिक जोमाने प्रसार झाल्याची उदाहरणं आहेत. अशा स्थितीत रूनी यांच्या साहित्यावरील बंदी कितपत प्रभावी ठरेल, हा प्रश्नच आहे.
