‘मी अमेरिकेत राहतो. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार देणार्या पहिल्या घटनादुरुस्तीचा अभिमान बाळगणारा हा देश, मात्र तेथील प्रशासनाकडून आज अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ले केले जात आहेत. अशा परिस्थितीची मी कधी कल्पनाही केली नव्हती,’ असे मत भारतीय वंशाचे अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांनी नुकतेच व्यक्त केले. ‘लिबरेटम’ या संस्थेकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘सांस्कृतिक पुरस्कार’ स्वीकारण्यापूर्वी ‘रॉयटर्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले. ‘या देशात पत्रकार, विनोदवीर, लेखक, कलाकार आणि विचारवंतांवर हल्ले केले जात आहेत, यावरून सध्याच्या सत्ताधार्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल काय मत आहे, हे स्पष्टच दिसते. ग्रंथालयांतून अनेक पुस्तके वगळली जात आहेत आणि या निर्णयाला आव्हानही दिले जात आहे. अनेक प्रकरणांमध्ये हे प्रयत्न यशस्वी ठरत आहेत. पण एकंदर जगाच्या अनेक भागांत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी चिंता व्यक्त केली.
आपल्या मूळ देशातील- भारतातील परिस्थितीविषयीही त्यांनी या वेळी भाष्य केले.
‘मी मूळचा भारतीय आहे आणि तिथेही अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण कंबर कसून लढ्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे. आपण जिंकलो आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात तो तात्कालिक विजय असतो. खरे तर आपण जिंकलेलो नसतो, असा हा काळ आहे. अशा शब्दांत त्यांनी भारतातील स्थितीचे वर्णन केले. रश्दी यांनी वर्णिलेल्या परिस्थितीसाठी चपखल दाखला ठराव्यात अशा बातम्या अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधून येऊ लागल्या आहेत. तिथे वाचनालयांत काही विशिष्ट पुस्तके ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे, देशात चित्रपटांवर बंदीच्या प्रकरणांची संख्याही वाढत आहेच. विनोदवीरांच्या अभिव्यक्तीवरही गंडांतर आल्याची उदाहरणे समोर येत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता हे साहित्य क्षेत्रासाठी मोठे आव्हान ठरत असल्याची चर्चा आहे. मात्र हे दावे रश्दींनी मुलाखतीत पूर्णपणे खोडून काढले. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता सर्जनशील कामांसाठी अजिबात उपयुक्त नाही. साहित्य क्षेत्राला तिचा धोका शून्यापेक्षाही कमी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ प्रचंड प्रमाणात माहिती गोळा करून त्यावर प्रक्रिया करून त्या माहितीला काही विशिष्ट रूप वा विविध रूपे देऊ शकते. मात्र साहित्यात नावीन्य आणणे कृत्रिम बुद्धिमत्तेला शक्य नाही. आणि कलेत नेमके नावीन्यच अपेक्षित असते. जे आजवर कोणीही मांडलेले नाही असे काही समाजापुढे मांडणे गरजेचे असते आणि ते एआयला अजिबात शक्य होणार नाही, त्यामुळे या विषयात मला स्वारस्य नाही,’ अशा शब्दांत सलमान रश्दींनी एआयची संभावना केली. कला आणि कथाकथनाच्या भूमिकेवर भाष्य करताना रश्दी म्हणाले की, ‘सर्जनशील कलाकृतींनी केवळ मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन विचार करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे.’ मुलाखतीत त्यांनी सध्या सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकातील स्पर्धांविषयी उत्सुकता व्यक्त केली.
जागतिक साहित्याला आकार देणार्या एका महत्त्वाच्या व्यक्तीची दरवर्षी या पुरस्कारासाठी निवड केली जाते. यापूर्वी नोबेल विजेते व्ही. एस. नायपॉल, वास्तुविशारद झाहा हदीद आणि चित्रपट निर्माते फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
