सलमान रश्दी यांनी ऑगस्ट २०२२ मधल्या हल्ल्यात एक डोळा गमावला, त्याआधीच त्यांच्या नव्या कादंबरीची घोषणा झालेली होती. ती कादंबरी- ‘व्हिक्टरी सिटी’ आता ७ फेब्रुवारीपासून मिळू लागेल. भारतातल्या ऑनलाइन विक्रेत्यांनी तिचं भारतीय मुखपृष्ठ दाखवलं आहे खरं, पण किंमत अद्याप सांगितलेली नाही. हल्ल्यामुळे रश्दींबद्दल उसळलेली सहानुभूतीयुक्त आदराची लाट बऱ्यापैकी ओसरू लागल्याचं दिसत असताना नव्या पुस्तकामुळे पुन्हा रश्दी बातमीत येणार. इस्लामद्रोही वगैरे शिक्का मारला गेलेल्या रश्दींची ‘व्हिक्टरी सिटी’ दक्षिण भारतात घडते, नायिकेशी पार्वती बोलते, नायिकेच्या प्रियकराचं नाव शिवा असतं.. हे वरवरचे तपशील आणखी एखाद्या फतव्याकडे नेणारे ठरतात की काय, याचीही उत्सुकता काही जणांना असेल. यामधली नायिका ‘अखेर शब्दच विजयी होतात’ असं शेवटी म्हणत असल्याची बातमी ‘न्यू यॉर्क टाइम्स’नं २५ जानेवारीला दिलीय.
पण त्याहीआधी ‘न्यू यॉर्कर’नं या कादंबरीचा जो (बहुधा सुरुवातीचाच) भाग ५ डिसेंबर २०२२ रोजीपासून आंतरजालावर खुला केला आहे, तो वाचल्यास त्या कादंबरीची नायिका- तिचं नाव पंपा कंपना – ही नायिका नसून सूत्रधार/ साक्षीदार/ निवेदक आहे, हे लक्षात येतं. या पंपाची आईदेखील इतर स्त्रियांसह स्वेच्छेनं आगीच्या अधीन झाली होती. ती सामूहिक आत्महत्या, पंपा नदीकाठचं छोटेखानी राज्य लयाला गेल्यानंतर तिथल्या महिलांना आवश्यक वाटली. रश्दी लिहितात की पंपाचे वडील तर ती लहानगी असतानाच वारले असल्यानं आई काही नव्यानं विधवा झालेली आणि मरण हाच मार्ग वगैरे वाटवून घेण्यातली नव्हती, पण चारचौघी करताहेत तसंच आपणही करावं म्हणून गेली मुलीला एकटी सोडून. पार्वती पंपाशी बोलू लागली ती त्यानंतर. घरचा कुंभारकामाचा व्यवसाय वयाच्या मानानं चांगलाच करणारी नऊ वर्षांची पंपा, आता विद्यासागर नावाच्या ब्रह्मचाऱ्याची आश्रित झाली. त्यानं काही वर्षांनी तिचं कौमार्य किंवा स्वत:चं ब्रह्मचर्य नष्ट केलं. पण दोघे गुराखी तरुण या विद्यासागरची कीर्ती ऐकून त्याच्या गुहेत आले आणि त्याचा उपदेश मागू लागले, तेव्हा विद्यासागरऐवजी पंपाच म्हणाली- स्वत:चं साम्राज्य वसवाल तुम्ही! विद्यासागरसाठी दक्षिणा म्हणून या दोघांनी आणलेलं हरतऱ्हेच्या भाजीपाल्याच्या बियांचं पोतंही पंपाच म्हणाली- ‘स्वत:चकडे ठेवा. तुमच्या साम्राज्यात पेरायला.’
दोघे भाऊ डोंगरावर गेले तर राहिलं की उभं अख्खं नगर! मग हे भाऊ, आता राजा कोण होणार यावर एकमेकांशी बोलू लागले, विल्यम आणि हॅरीसारखं त्यांच्यात काही झालं नाही, मोठा हुक्क संगम हाच राजा होणार असं ठरलं, धाकटा बुक्क संगम आहे त्यात समाधान मानून राजाभाऊसह राहिला. या नगरात कोण कुठला असेल, ‘कटेला’ असेल की कसा, हे देवांनाच ठरवू द्या म्हणत दोघे पुन्हा पंपाचं बोलणं आठवू लागले- तिला तर शांतता हवीय, मग मोठं सैन्य उभारा असं का बरं म्हणाली ती?
कादंबरी ‘जादूई वास्तववादा’नं ओतप्रोत भरलेली, चौदाव्या ते सोळाव्या शतकात घडणारी. पण ती आजच्या जगाबद्दल बोलणार आहे, हे लक्षात आल्यावर उत्कंठा वाढते. ती आजच्या नवव्या दिवसापासून पूर्ण होऊ लागेल! तोवर थांबू या.