माया पंडित
समीना दलवाई या एक विख्यात स्त्रीवादी लेखिका आहेत. त्यांच्या ‘बॅन्स एन्ड बारगर्ल्स : परफॉर्मिंग कास्ट इन मुंबईज डान्स बार्स’, ‘बाबरी मस्जिद’ , ‘भटकभवानी’ या पुस्तकांमधून त्यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांचा व धर्मांध राजकारणाचा पुरोगामी नजरेतून वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच पुस्तकांच्या पावलावर पाऊल टाकून आता त्यांचे ‘लव्ह जिहाद : अ फेमिनिस्ट री-टेलिंग’ हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. आज समाजात फोफावलेल्या उजव्या विचारसरणीच्या पितृसत्ताक सांस्कृतिक राजकारणाने जो धिंगाणा घातला आहे त्याचाच पंचनामा हे पुस्तक करते. हिंदू धर्मांधतेने फैलावलेल्या एका जाणीवभ्रमाचा निरास करणारे व परिवर्तनाची वेगळी दिशा दाखवणारे हे लेखन आहे. काही असत्ये समाजात उजव्या शक्तींनी इतक्या ताकदीने, इतका दीर्घकाळ फैलावलेली आहेत की त्यांचा मुकाबला करण्यासाठी विचार नि व्यवहार या दोन्ही पातळ्यांवर पाय ठाम रोवून उभे रहावे लागते आणि इतिहास, वर्तमान व भूतकाळही आपल्या समजेच्या कवेत घ्यावा लागतो. ‘लव्ह जिहाद’ हा (शब्दप्रयोग) त्यातलाच एक जाणीवभ्रम! त्यात ‘लव्ह’चा अर्थ वासना, लैंगिक सुख इतकाच असतो (ते सुख विशेषत: ्त्रिरयांसाठी तर वाईटच! असे मनू सांगतो!) आणि जिहादचा अर्थ धर्माच्या नावावर केलेली अन्य धर्मीयांची कत्तल असा सांगितला जातो! खरे तर शारीरसुखाच्या पलीकडे प्रेमाचे विविध अर्थ आहेत: सुख, उबदार नाती, सुरक्षिततेची भावना, जवळीक, ममता, स्व-ओळख वगैरे. तर कुराणात जिहादचा अर्थ परधर्मीयांना मारणे असा नसून स्वत:चे अंत:करण शुद्ध करणे, करुणामय करणे, दुष्ट प्रवृत्तींचा त्याग करणे, आपला पैसा, अन्न, इत्यादी त्यापासून वंचित असलेल्या गरिबांबरोबर वाटून घेणे असा आहे. परंतु ‘लव्ह जिहाद’च्या प्रसृत केलेल्या अर्थांमध्ये मात्र या विपरीतार्थांचीच बेमालूम जोडणी केलेली दिसते.
हिंदू बायका या गरीब बिचार्या, भोळ्याभाबड्या असतात; मुस्लीम पुरुष हे वाईट, हिंस्र, बदफैली, क्रूर, अप्रामाणिक, अनैतिक, ताकदवान असतात; ते भोळ्या हिंदू बायकांना फसवून त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी त्यांच्यावर भरपूर बाळंतपणे लादतात व त्यांचा कंटाळा आला की ते त्यांना सोडूनही देतात. या अपसमजात सर्व हिंदू हा एक एकजीव- ‘मोनोलिथिक’, समुदाय तर सर्व मुस्लीम हा दुसरा मोनोलिथिक समुदाय आहे! सर्व हिंदू विरुद्ध सर्व मुस्लीम असा विषारी अर्थ त्यातून प्रसृत होतो.
प्रत्यक्षात ्त्रिरया, दलित बहुजन, आदिवासी आणि मुस्लीम यांच्या जीवनाची स्थिती काय आहे? दलवाई त्यांच्या पुस्तकात या प्रश्नांची प्रदीर्घ चर्चा करतात. समता, स्वातंत्र्य व शांतीपूर्ण सहजीवन ही समाजस्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे. स्त्रिया, दलित बहुजन, मुस्लीम आणि आदिवासी या एरवी ‘ताडनके अधिकारी’ असणार्या घटकांच्या हाती ती गुरुकिल्ली आली तर अशा ‘राजकीय’ गैरसमजांचा अंधार नष्ट होईल आणि मानुष जगण्याचे सौंदर्य सार्यांच्या वाट्याला येईल, या आशेने लिहिलेले हे पुस्तक आहे. त्याचा अंतर्भाव उत्तम अकादमिक व कृतिप्रवण लेखन म्हणून विद्यार्थ्यांना वाचनास अनिवार्य साहित्यात करावा, इतके ते चांगले आहे. अभ्यासविषय, त्यातली सखोल माहिती आणि ती सादर करण्याची पद्धत यातून सर्वसामान्य माणसांसाठी क्लिष्ट विषयांवरही किती समरसून व हृद्य लिहिता येते याचा हा वस्तुपाठ आहे.
पुस्तक तीन प्रमुख प्रकरणांमध्ये ‘मांडले’ आहे. त्याव्यतिरिक्त एक प्रदीर्घ प्रस्तावना आणि शेवटी त्यांच्या अभ्यासावरून निघणारे निष्कर्ष येतात. हे पुस्तक ज्या तीन समाजघटकांना खासकरून विचारात घेते त्यानुसार ‘बीइंग अ हिंदू’, ‘बीइंग मुस्लीम’ व ‘बीइंग दलित बहुजन’ या तीन समाजघटकांबद्दल मांडणी आहे. हिंदू पितृसत्ताकतेने व उच्चवर्णीयांनी ्त्रिरया, मुस्लीम व दलित बहुजन यांच्याविरुद्ध कित्येक शतकांपासून रचलेले शोषणाचे षड्यंत्र यांचा सारा इतिहास व भूगोल या प्रकरणांमधून येतो. उजव्या विचारसरणीच्या प्रभुत्वसत्तांना त्यांचे वर्चस्व टिकवून धरायचे असेल तर ते या शोषणाचा पाया भक्कम असेल तरच टिकवता येईल हे मूल्यात्मक समीकरण त्यामागे आहे. लव्ह जिहादमधून हिंदू ्त्रिरयांवर होणार्या अत्याचारांबद्दल गळा काढणारे पितृसत्ताक हिंदू पुरुष त्यांच्या समुदायांमध्ये ्त्रिरयांना सोसाव्या लागणार्या यातनांबद्दल चकार शब्द काढत नाहीत. ्त्रिरयांची होणारी सार्वकालिक आबाळ, कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक अत्याचार, बालविवाहासारख्या कुप्रथा, मुलगाच हवा या हट्टापायी लादलेली बाळंतपणे, अकाली मृत्यू, न्यायालये, पोलीस यंत्रणा, सत्तावंतांच्या गुंडगिरीखाली दडपली जाणारी अत्याचारांची प्रकरणे इत्यादींतून बहुसंख्य हिंदू स्त्रीजीवनाचे वास्तव दलवाई उभे करतात.
दुसर्या प्रकरणात दलवाई मुस्लिमांबद्दलची वस्तुस्थिती स्पष्ट करतात. अमानुष हल्ले, खून, दंगली, धमक्या व विखार यांना तोंड देणार्या, सातत्याने ‘पाकिस्तानात जा’चे नारे ऐकून घेणार्या मुस्लीम समाजाचा हा विश्लेषक आहे. त्याबरोबर मुस्लीम महिला ‘मूकबिचार्या कुणी हाका’ अशा गरीब मेंढ्या आहेत अशा थोरथोर हिंदू नेत्यांनी ढाळलेल्या नक्राश्रूंना त्या मुस्लीम महिलांच्या विविध लढ्यांची उदाहरणे देऊन सणसणीत उत्तर देतात.
आर्थिक व सामाजिकदृष्ट्या आणि राजकीय शिडीच्या सर्वांत खालच्या पायरीवर आता मुस्लीम आहेत. भारतातील ११ राज्यांमध्ये धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामागे मुस्लिमांबद्दल वाटत असलेली साशंकता, भय, अविश्वास वगैरेंपेक्षाही राजकीय सत्तासमीकरणाची गणितेही आहेत. न्या. सच्चर समितीने मुस्लिमांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. कुंडू समितीचा अहवालही तेच सांगतो. राजकीय विचार केला तर मुस्लिमांच्या १४ टक्के लोकसंख्येच्या प्रमाणात खरे तर ७४ खासदार हवेत पण प्रत्यक्षात २५च खासदार आहेत.
भाजपने मुस्लीम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद केल्या, अनेक ठिकाणी सवर्ण शिक्षक, संस्थाचालक यांचा मुस्लीम विद्यार्थ्यांना विरोधच असतो. शाळेत इतिहासाच्या तासाला ‘तुम्ही’ व ‘आम्ही’ अशी विभागणी होते. पण त्याविरुद्ध शिक्षक भूमिका घेत नाहीत. ‘मुस्लिमांना फक्त उर्दू येते म्हणून ते उलटे लिहितात’ हा समजही सार्वत्रिक असतो. आपल्या सामाजिक आयुष्याच्या पातळीवर हा मुस्लिमांबद्दलचा भेदभाव खूप जाणवतो. मुस्लिमांना घरे भाड्याने द्यायची नाहीत, विकायची नाहीत. हिंदूबहुल वस्त्यांत राहणारे मुस्लीम स्वत:ची घरे विकतात. हिंदू सोसायट्या खाप पंचायतींसारख्या वागतात. ‘मुस्लीम हे मुख्य समाजाचा भाग झाले पाहिजेत, पण ते माझ्या भोवतालच्या समाजाचा भाग नकोत,’ अशी ही मानसिकता आहे. १९९२चे बाबरी मशीद पाडल्यानंतरचे दंगे आणि उसळलेल्या दंगलींचे व जाळपोळीचे भयंकर ‘देखता डोळा’ वर्णन दलवाई करतात. कमालीच्या असुरक्षिततेच्या वातावरणात लाखो माणसांनी राहावे याला मानुष जगणे कोण म्हणेल, असा त्यांचा रास्त प्रश्न अहे. दंग्यांमध्ये मुस्लीम मुली, मुले, स्त्रीपुरुष यांची जी क्रूर हिंसा झाली, त्यांच्यावरील अत्याचारांची थेट आकडेवारीच दलवाई देतात. दंगे होत नाहीत कारण शेअर मार्केटवर परिणाम होतो हे त्याचे कारण आहे.
मोहसिन खानसारख्या अनेकांचे बळी ते निव्वळ मुस्लीम आहेत म्हणून घेतले गेले. आपली कायदा व न्याय व्यवस्था गुन्हेगारांना, खुन्यांना साहाय्य करते, सोडवते. याची अनेकानेक उदाहरणे दलवाई देतात. मुंबई बॉम्बस्फोटातल्या मुस्लीम आरोपींना १९ वर्षे खितपत पडून राहावे लागले. अब्दुल वाहिद शेख नऊ वर्षांनी तुरुंगातून सुटला, मग त्याने पीएचडी केली व नंतर ‘इनोसन्स नेटवर्क’ नावाची संघटना स्थापन केली. संस्थेच्या माध्यमातून अनेकांना त्याने साहाय्य केले.
निवृत्त पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांनी अनेक बॉम्बस्फोटांच्या अभ्यासावर लिहिलेल्या पुस्तकातून अशी किती तरी काळी सत्ये समोर येतात. मुस्लिमांचे झुंडबळी घेतले जाणे, त्यांना बेकायदा तुरुंगात डांबणे, मानसिक व शारीरिक छळ याची कित्येक उदाहरणे देऊन दलवाई मुस्लिमांवरचा अन्याय सोदाहरण स्पष्ट करतात. ‘तुम्हाला तुमचे अन्न खाता येत नसेल, कपडे घालता येत नसतील, हव्या त्या देवाची भक्ती करता येत नसेल तर तुम्ही मुळात नागरिक तरी असता काय?’ असा प्रश्नही उपस्थित होतो.
भारत ही सांस्कृतींच्या मेळाची जागा आहे. खेड्यात, तथाकथित खालच्या जातींमध्ये हे उघड दिसते. माऊंट मेरीला जाणारे, हाजी अलीला जाणारे किती तरी हिंदू आहेत. दसरा, दिवाळी, गणपती या उत्सवांत सहभागी होणार्या बिगर हिंदूंची संख्या कमी नाही. मुंबईत रमझानच्या महिन्यात मुस्लीम विक्रेत्यांना मदत करणारे साधेसुधे हिंदू विक्रेते हे या समाजाच्या खालच्या स्तरावरील एकतेचे, मैत्रभावाचे प्रतीक आहेत. दलवाईंचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुरोगामी विचार करणारे लोक जसे हिंदूंमध्ये आहेत तसे ते मुस्लिमांमध्येही आहेत आणि जसे हिंदू गुरू, पुजारी व धर्माचे ठेकेदार हिंदू धर्माच्या संदर्भातल्या पुरोगामी विचारांचा व ते मांडणार्या कार्यकर्त्यांचा निषेध करतात तसेच मुस्लीम धर्मगुरू मुस्लिमांमधील पुरोगामी विचारांचा व कार्यकर्त्यांचा विरोध करतात (आणि तसाच विरोध ख्रिश्चन धर्माचे ठेकेदार त्या धर्मातल्या परिवर्तनवादी विचारांचा व व्यक्तींचा करतात.) प्रस्थापितांच्या हातातील बाहुले म्हणून वागायला नकार देणार्यांच्या वाट्याला हा विरोध कायमच येत राहिला आहे! ‘धर्मासाठी मेलास तर स्वर्गात तुला अल्ला खूप सुंदर पोरी देईल’ असे सांगणार्या मौलवीला, ‘अल्लाने काय सुंदर पोरींचे दुकान खोलले आहे काय?’ असे विचारणारा तरुण हा काही अपवादात्मक नाही. भारतात एकता प्रस्थापित होणार असेल तर ती या ‘खालच्या स्तरां’तील म्हणून हिणवल्या गेलेल्या दलित, बहुजन जाती, ्त्रिरया व मुस्लीम यांच्या एकत्वातूनच प्रस्थापित होईल असा मांडणीचा रोख आहे.
तिसर्या प्रकरणात उच्चवर्णीय हिंदू समाजाने दलित व बहुजनांना कोणत्या प्रकारचे जगणे दिले आहे याचा ताळमेळ मांडला आहे. त्यांना मिळणारे सामाजिक अधिकार, त्यांचे शिक्षण, त्यांच्या वाट्याला येणारे श्रम कोणत्या प्रकारचे व त्याचा मोबदला यांचेही विश्लेषण येते. मैला कामगारांची प्रथा जिथे चालू ठेवली जाते तिथे चंद्रावर यान पाठवण्याने काय होणार? प्रगती व विकासाचा बडेजाव, आधुनिकतेचा खोटा आवेश आणि टोकाचे धर्मवेड यांचे कोणत्या प्रकारचे योगदान दलितांच्या प्रगतीला लाभणार? आज दलितांचे भगवेकरण मोठ्या प्रमाणात होते आहे त्याबद्दलही दलवाई चिंतेचा सूर व्यक्त करतात, कारण त्यातून धर्मांध राजकारणाचा फैलाव होतो. दलित स्त्रियांचे लैंगिक शोषण करणारी पितृसत्ताक उच्चवर्णीय मानसिकता अजूनही बदललेली नाही. त्यांच्यावरच्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढूनही प्रस्थापित माध्यमांमध्ये त्याबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत. निर्भया, शक्ती मिल्ससारख्या खटल्यांबरोबरच ज्यांना न्याय मिळाला नाही असे हजारो खटले आहेत. त्यातले बहुसंख्य दलित, मुस्लीम, बहुजन आदिवासींचे आहेत ही वस्तुस्थिती आहे. आंबेडकरांनी स्त्री हे जातीचे प्रवेशद्वार आहे मानले होते. जितकी स्त्रीवरील बंधने कडक तितकी जात सुरक्षित आणि त्याचा परिणाम स्त्रीदास्यात झाला होता. आता नवनव्या रूपाने हीच बंधने पुढे केली जाताहेत, दलितांऐवजी आता मुस्लीम हे प्यादे या स्त्रीविरोधी राजकारणाच्या पटावर आले आहे. जगभर बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांची भीती वाटते. गोरे ऊर्फ इमिग्रन्ट्स, इस्रायली ज्यूविरुद्ध पॅलेस्टिनी अरब; ही यादी अशीच वाढवता येईल. पण याला आपण अपवाद का ठरू नये?
पुस्तकातील मांडणीला स्त्रीवादाची धारदार विश्लेषक चौकट आहे. सीमॉन द बुव्हा व अलेक्झांड्रा कोलंटायपासून ते भारतातील रखमाबाई, रशीदा खातून, सावित्रीबाई फुलेंपर्यंत अनेकानेक क्रांतिकारी स्त्रीवाद्यांच्या विचारांचे, कृतींचे पडघम त्यातून ऐकू येतात. व्यक्तिगत कौटुंबिक अनुभव, सामाजिक निरीक्षणे, स्त्रीचळवळीचा प्रत्यक्ष अनुभव आणि स्त्रीसंघटनांच्या विद्रोही पितृसत्ताक राजकारणाविरुद्ध बंडखोरी ही सारी मूल्यात्मक गृहीतके यामागे आहेत. विविध प्रकारची आकडेवारी आहे व ती यातील तर्कशुद्ध विधानांना पुष्टी देणारी आहे. विविध खटले मांडले आहेत. ‘व्हॉट इज पर्सनल इज ऑल्सो पोलिटिकल’ हे तत्त्व इथे लागू पडते. शैली बोजड नाही. नर्मविनोद, मजेदार कथा व प्रसंग यांची गुंफण असलेली शैली वाचकाला भावते. त्यांच्या स्वत:च्या रंगीबेरंगी कुटुंबात आदिवासी, दलित, मुस्लीम, चिनी अशा विविध लोकांचा समावेश आहे, लहान मुले एकूण साताठ भाषा बोलतात याचे त्यांनी केलेले वर्णन अत्यंत रोचक आहे. कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक व भाषिक एकात्मतेचे इतके सुंदर प्रतीक कुठे आढळावे?
जगभरच्या भांडवलशाही व्यवस्थेचे, जागतिकीकरण व खासगीकरणाचे समाजातील पितृसत्ताक सत्ताव्यवहाराशी आणि धर्मांध विचारव्यवहारांशी असलेले घनिष्ठ व जैव नाते ही दलवाईंच्या पुस्तकाची संदर्भचौकट आहे. अनेकदा डॉ. आंबेडकरांच्या ‘स्टेट अँड मायनॉरिटीज’ व अन्य पुस्तकांमध्ये मांडलेल्या विचारांचे प्रतिध्वनी त्यात ऐकू येतात. तर स्त्रीवादी चळवळीतील अनेकानेक अभ्यासकांनी केलेल्या कैक अभ्यासांचे, संशोधनांचे निष्कर्ष त्या सुगम भाषेत व बिनतोड तर्कशास्त्र वापरून आपल्या निरीक्षणांना बळकटी देण्यासाठीदेखील वापरतात. पितृसत्ताकता, भांडवलशाही, खासगीकरण, जागतिकीकरण आणि त्यांच्या हातात हात घालून वावरणारी धर्मांधता यांनी भारतातील बहुसंख्य ्त्रिरया, दलित, बहुजन मुस्लीम यांचे जगणे दुष्कर केले आहे. त्यातून सुटायचे असेल तर या व्यवस्थांनी आपल्या गळ्याभोवती अडकवलेले त्यांच्या संधिसाधू राजकारणाचे फास सोडवले पाहिजेत. विरोधी आवाज दडपण्याच्या व त्याचे गुन्हेगारीकरण होण्याच्या या दिवसात प्रेमच आपल्याला जाती धर्मांचे अडथळे ओलांडून मानुष जगण्याचे मार्ग दाखवेल असा दुर्दम्य आशावाद समीना दलवाई मांडतात.
माया पंडित
निवृत्त प्राध्यापक, इंग्लिश अँड फॉरिन लँग्वेजेस
युनिव्हर्सिटी, हैदराबाद
mayapandit@gmail. com
