पी. चिदम्बरम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महासाथीसारखी परिस्थिती असो किंवा नसो, शेतकरी आणि शेतमजुरांना जगण्यासाठी त्यांच्या शेतात कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. पण रोजगाराच्या बाजारात सगळय़ात अकुशल तेच ठरतात. आर्थिक विकास होतो आहे, असे सरसकटपणे म्हणताना आपण हा वर्ग लक्षात घेतच नाही.

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने (NSO) गेल्या बुधवारी २०२२-२३ च्या पहिल्या तिमाही (एप्रिल-जून) साठी सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबतचा आपला अंदाज मांडला होता. त्यातली प्रमुख आकडेवारी होती विकास दराची. त्याबाबत त्यांचा अंदाज १३.५ टक्के होता. सकल वर्धित मूल्या ( ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड – GVA) च्या दृष्टीने ही संख्या १२.७ टक्के आहे. रेटिंग एजन्सी, बँका आणि आरबीआयचे अंदाज १३ ते १६.२ टक्क्य़ांपर्यंत आहेत हे लक्षात घेता, त्या मर्यादेत येणारी कोणतीही संख्या, मला वाटते, स्वत:च स्वत:ची वाहवा करून घेण्यासारखी आहे. तथापि, आकडेवारीच्या पलीकडे एक मोठे जग आहे. हा लेख वास्तव जगात राहणाऱ्या लाखो लोकांच्या आयुष्याच्या संदर्भात राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या (NSO) आकडेवारीचा अर्थ काय असतो आणि या आकडेवारीमुळे कोण सुखावेल आणि कोण नाही, याविषयी आहे.

महत्त्वाची आकडेवारी

मी २०१९-२० आणि २०२१-२२ साठी संबंधित आकडे असलेला तक्ता तयार केला आहे आणि २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीसाठी आकडे जोडले आहेत. (कृपया सोबत दिलेला तक्ता पहावा.) २०२०-२१ या करोनाच्या महासाथीच्या वर्षांत दीर्घकाळ टाळेबंदी होती. मी त्या वर्षांच्या आकडेवारीचा तक्त्यामध्ये समावेश केलेला नाही. मी सांगू शकतो की, २०१९-२० हे नेहमीसारखे सामान्य वर्ष होते. २०२१-२२ या वर्षांकडे परिस्थिती पूर्वपदावर येण्याचे वर्ष म्हणून पाहिले गेले. २०२२-२३ या वर्षांमध्ये परिस्थितीचा गाडा पूर्णपणे पूर्वपदावर येणे अपेक्षित होते. म्हणून, २०१९-२०, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांमधल्या आकडेवारीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

शिवाय, एखाद्या क्षेत्राच्या कामगिरीचा ज्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो, त्यांच्या दृष्टिकोनातून या आकडेवारीकडे पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ, ‘शेती, वनीकरण आणि मत्स्यव्यवसाय’ हे क्षेत्र देशातील बहुतांश कुटुंबांच्या जीवनावर परिणाम करते. ‘खाणकाम तसेच उत्खनन’ आणि ‘बांधकाम’ ही क्षेत्रे महत्त्वाची आहेत. कारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये कमी कौशल्ये आणि कमी शिक्षण असलेल्या कामगारांची संख्या जास्त आहे. वित्त, स्थावर जंगम (रिअल इस्टेट) आणि व्यावसायिक सेवा महत्त्वाच्या आहेत. कारण त्यात शिक्षित, विशिष्ट कौशल्य असलेले आणि पांढरपेशी लोक काम करतात.

सुरुवात २०१९-२० पासून करू. विकसित होत असलेल्या देशाची आर्थिक वाढ मागील वर्षांच्या आणि सुरुवात केली त्या वर्षांपेक्षा अधिक वेगाने झाली पाहिजे. सकल वर्धित मूल्याच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, २०२०-२१ च्या महासाथीच्या काळातील वाईट परिस्थितीमधून अर्थव्यवस्था २०२१-२२ मध्ये सावरली, परंतु कृषी क्षेत्र वगळता वेगवेगळय़ा क्षेत्रांमधील वाढ २०१९-२० मध्ये म्हणजे करोनाच्या आधी होती त्या उत्पादनाच्या पातळीवर पोहोचली नाही.

यातून शिकण्यासारखा एक महत्त्वाचा धडा आहे. तो म्हणजे महासाथीसारखी परिस्थिती असो किंवा नसो, शेतकरी आणि शेतमजुरांना जगण्यासाठी त्यांच्या शेतात कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्याकडे घरून काम करण्याची चैन असत नाही! (‘वित्त वगैरे’ क्षेत्रामधील किरकोळ वाढ नगण्य होती.)

अजूनही धोक्याबाहेर नाही

म्हणून, २०२२-२३ मध्ये आपल्याला जी वाढ अपेक्षित आहे ती २०२१-२२ ची वाढ नसून २०१९-२० ची आहे. तक्त्याच्या शेवटच्या दोन ओळी यातला फरक अधोरेखित करतात. मागील वर्षांच्या (२०२१-२२) पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीमधील वाढ प्रभावी असताना, २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ती चिंताजनक आहे. ‘कृषी वगैरे’ची वाढ नेहमीसारखी राहिल्याचे दिसते. वित्त, स्थावर जंगम या क्षेत्रांची वाढ उत्साहवर्धक आहे, परंतु तक्त्यातील इतर तीन क्षेत्रे मात्र अर्थव्यवस्था अजूनही तळय़ात मळय़ात असल्याचे दाखवतात.

मी त्या तक्त्यात ‘उत्पादन’ या क्षेत्राचा समावेश केला नाही. कारण मला त्याच्याशी संबंधित आकडे या आकडय़ांच्या जंगलात हरवू द्यायचे नव्हते. तीन वर्षांच्या प्रत्येकी पहिल्या तिमाहीत ‘उत्पादन’ क्षेत्राने पुढीलप्रमाणे मूल्यवर्धन केले : ५६५, ५२६, ५७७, २४९ आणि ६०५,१०४ कोटी रुपये. वाढीच्या बाबतीत, २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत २०१९-२० च्या तुलनेत सात टक्के आणि २०२१-२२ च्या तुलनेत ४.८ टक्के वाढ नोंदवली गेली. अपुरी नवीन गुंतवणूक किंवा कमी मागणी किंवा दोन्हीमुळे उत्पादनवाढ अजूनही संथ आहे. सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योगांच्या क्षेत्रात अजूनही मंदीच आहे, असे मला वाटते.

सावकाश सुरुवात

भविष्यात, विशेषत: रोजगाराच्या क्षेत्रावर काय परिणाम होतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकरी आणि शेतमजुरांची परिस्थिती तशीच राहील आणि बिगरशेती क्षेत्रातील रोजगारामध्ये थोडाफार फरक पडेल. पुन्हा नव्याने सुरुवात होत नाही तोपर्यंत अकुशल आणि कमी-कुशल कामगारांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण जास्त असेल. फक्त ‘खाणकाम इ.’ आणि ‘बांधकाम’ या क्षेत्रांची परिस्थिती २०१९-२० च्या तुलनेत काही प्रमाणात बरी असेल. उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने उचललेली पावले अपुरी आहेत हे तर स्पष्ट आहे. सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योगांच्या क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. कुशल, पांढरपेशी नोकऱ्यांमधील संधी वाढत आहेत; परंतु सेवा क्षेत्राचा एक मोठा भाग (व्यापार, हॉटेल्स इत्यादी) अद्याप पुनरुज्जीवित होऊ शकला नाही, त्यामुळे नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. (टीप : ऑगस्टमध्ये बेरोजगारीचा दर ८.३ टक्के झाला.)

रिझव्‍‌र्ह बँकेने २०२२-२३ साठी तिमाहीनुसार १६.२, ६.२, ४.१ आणि ४.० टक्के असा वाढीचा अंदाज वर्तवला होता. लक्षात घ्या की, हा उतरता आलेख आहे. पहिल्या तिमाहीची सुरुवात १३.५ टक्क्यांनी झाली. ती रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजापेक्षा कमी होती. ही संथ सुरुवात उरलेल्या तीन तिमाहींबद्दल काय सांगते?

पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून)

स्थिर किमतींवर (कोटीमध्ये रु.) सकल मूल्यवर्धन

    कृषी-   खाण   बांधकाम व्यवसाय, हॉटेल,     आर्थिक, रिअल इस्टेट

    वनीकरण    आणि उत्खनन      वाहतूक    आणि, संज्ञापन व्यावसायिक

    मासेमारी              

२०१९-२०    ४४८,७०३    ८२,६९६ २५९,७२८     ६६२,३०५        ७९६,८५१

२०२१-२२    ४७२,२५८    ८०,२४३ २२५,१६६     ४४५,४५४        ८०५,८४७

२०२२-२३    ४९३, ३२५   ८५,४२३ २६२,९१८     ५५९,७२३        ८८०,३१३

२०२२-२३ नंतर (टक्केवारीत)

२०१९-२०    ९.९     ३.३     १.२ -१५.५     १०.५

२०२१-२२    ४.५     ६.५     १६.८    २५.७        ९.२

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samorchya bakavarun p chidambaram development rates situation farm labourers employment ysh
First published on: 04-09-2022 at 00:02 IST