अतुल सुलाखे

शास्त्रचर्चा करताना दोन पक्ष असतात. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. आपलेच मत खरे हे सांगण्यापूर्वी पूर्व पक्षाची मांडणी आदरपूर्वक करण्याची प्रथा होती. सत्याचा अंश तुझ्याकडेही आहे आणि माझ्याकडेही. तुझ्याकडील सत्यांशाचा मी आदरपूर्वक स्वीकार करतो. मी माझा विचार तुला सांगेन. कितीही वेळा सांगण्याची माझी तयारी आहे. एकदा विचार पटला नाही तर सातच्या पटीत कितीही काळ सांगेन. विचार पटवून देताना हिंसेचा प्रसंग आला तर मी आनंदाने हिंसा सहन करेन, मात्र हिंसा करणार नाही.

महावीर, शंकराचार्य, ख्रिस्त आणि गौतम बुद्ध यांची ही शिकवण आहे. शेवटी आलेली शिकवण बुद्ध आणि एका भिक्खूचा संवाद आहे. त्याचा उल्लेख कॉ. शरद पाटील यांच्या ‘अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या पुस्तकात आहे. गांधीजी आणि विनोबांचा सत्याग्रह विचार कुठून आला आहे हे यावरून स्पष्ट होते. भारतावर आक्रमणे झाली तेव्हा वीर लढले हे खरे होतेच तथापि संतांनी आपली शिकवण समाजासमोर ठेवली. त्यामुळे प्रसंगी सत्ता गेली तथापि चैतन्य मात्र टिकून राहिले. इंग्रजांच्या ताब्यात देश गेला तथापि रामकृष्ण, अरविंद, गांधीजी यांनी चैतन्य टिकवून ठेवले.

ही केवळ नावे नसून किमान दोन शतकांचा भारतीय संस्कृतीचा सारांश आहे. हा सारांश जीवमात्रांच्या कल्याणाकडे नेणारा आहे. ही संस्कृती सहज समजावी म्हणून ‘पसायदान ते जय जगत्’ ही संज्ञा वापरली जाते इतकेच. विनोबांना गीतेचे तत्त्वज्ञान मान्य होते. त्यांच्या गीता-चिंतनात म्हणजेच साम्ययोगात (पारलौकिक आणि लौकिक) अंतिम कल्याणाची दिशा आहे. विनोबांच्या सत्याग्रहाच्या विचारातही एक दर्शन आहे. स्वातंत्र्य आणि सर्वोदय यांना जोडणारा सोपान साम्ययोगाचा आहे. या दोहोंमधील साम्ययोग हा महत्तम विशेष आहे. परमसाम्य आणि सर्वोदय यांना जोडणारा भक्कम सेतू  हा साम्ययोगाचा आहे.

भूदानाची आकडेवारी, विनोबांचे धर्म चिंतन पहाताना साम्ययोगाचे स्मरण ठेवले पाहिजे. सत्याग्रहाच्या अनुषंगाने विनोबांनी प्रतिकाराचे चार मार्ग सांगितले आहेत.

१) अशुभाचा प्रतिकार अधिक हिंसेने करणे.

२) अशुभाचा प्रतिकार तेवढय़ाच हिंसेने करणे.

३) अशुभाचा प्रतिकार न करणे

४) अशुभाचा प्रतिकार करण्याऐवजी अशुभाची उपेक्षा करणे.

मैत्री, प्रेम, विधायकता हा कार्यक्रम सुरू ठेवायचा. अशुभ असे काही नाही असे मानून प्रेम, मैत्रीचा वर्षांव केला की अशुभ नष्ट होते. हा मार्ग संतांचा आहे.