Samyayog Atul Sulakhe world servant Gandhiji Vinoba to contemplation Ramnaam ek chintan book ysh 95 | Loksatta

साम्ययोग : विश्वसेवक..

रामनामावर बापूंच्या चिंतनाला विनोबांनी प्रस्तावना लिहिली. ती, ‘रामनाम- एक चिंतन’ या नावाने प्रसिद्ध आहे.

साम्ययोग : विश्वसेवक..
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अतुल सुलाखे

गांधीजींचे रामनामाशी अत्यंत खोल नाते होते. विनोबांच्या बाबतीतही हीच स्थिती होती. रामनामावर बापूंच्या चिंतनाला विनोबांनी प्रस्तावना लिहिली. ती, ‘रामनाम- एक चिंतन’ या नावाने प्रसिद्ध आहे. या पुस्तिकेत विनोबांनी रामाच्या व्यक्तित्वाचा नेमका वेध घेतला आहे. रामाला ते ‘विश्वनंदन’ मानतात. राम प्रथम ‘विश्वनंदन’ आहे आणि नंतर तो ‘दशरथनंदन’ झाला.

विनोबांच्या बाबतीतही हे रूपक वापरता येते. विनोबा प्रथम विश्वसेवक होते आणि नंतर ते देशसेवक झाले. त्यांनी नेहमीच अखिल विश्वाचा विचार केला. अध्ययन आणि कार्य या दोन्ही क्षेत्रांत ते ‘सेवक’ या नात्याने वावरले. स्वत:वर असणारी जबाबदारी ते पूर्णपणे जाणत होते. पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशमधील त्यांची १६ दिवसांची पदयात्रा याची साक्ष होती.

५ सप्टेंबर १९६२ रोजी त्यांनी बांगलादेशात प्रवेश केला. त्यांच्या या पदयात्रेवर पाकिस्तानातील (पश्चिम) वृत्तपत्रांनी जोरदार टीका केली. तिला उत्तर देताना पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री महंमद अली यांनी विनोबांच्या पदयात्रेचा हेतू नेमकेपणाने सांगितला. ते म्हणाले, ‘विनोबांना पूर्व पाकिस्तानातून जाण्याची परवानगी केवळ मानवतेच्या दृष्टीनेच देण्यात आली असून, पाकिस्तान सरकारच्या या कृतीचे फक्त भारतातच नव्हे, तर साऱ्या जगात अभिनंदन करण्यात आले आहे. विनोबाजी आपल्या पदयात्रेद्वारे शुभेच्छेचाच प्रचार करतील आणि त्यामुळे उभय देशांत मैत्री स्थापन होण्यास मदत होईल. आम्ही भारताशी मैत्रीपूर्ण संबंध राखू इच्छितो.’

विनोबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोनारहाट या गावातून पूर्व पाकिस्तानात प्रवेश केला. त्या वेळी पाकिस्तानातील जनतेने त्यांचे मनापासून स्वागत केले. आरंभी ही जनता ‘पाकिस्तान जिंदाबाद’ या घोषाने विनोबांचे स्वागत करत असे. विनोबांनी त्यांना सांगितले की ‘जय जगत्’ या घोषात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘जय हिंदू’ या दोहोंचा समावेश होतो. पुढे लोकांनी, त्यांचे ‘जय जगत्’ म्हणत स्वागत केले.

पूर्व पाकिस्तान हा दाट लोकवस्तीचा भाग. एक वर्ग मैल क्षेत्रात ९०० लोकवस्ती होती. अशा क्षेत्रात भूदान मागणे हे मोठेच धाडस होते. तरीही इथून ११० एकरांचे भूदान झाले. अब्दुल खलिफ या गृहस्थांकडे चार एकर जमीन होती. त्यातील एक एकर जमीन त्यांनी दान म्हणून दिली. विनोबा त्यांना म्हणाले, ‘तुम्हाला अल्लाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून मी त्याच्यापाशी प्रार्थना करेन.’

दोन आठवडय़ांच्या पदयात्रेत विनोबांना लोकांचे अपार प्रेम मिळाले. जमीनवाला बाबा, फकीर, साधुबाबा ही बिरुदे मिळाली. लोक त्यांना आपले दु:ख सांगत आणि चमत्काराची अपेक्षा करत. अल्लावर श्रद्धा ठेवा, एवढाच विनोबांचा प्रतिसाद असे. या यात्रेत विनोबांना एक हिंदू महिला भेटली. तिने या भागात एक शिवमंदिर उभारले होते. विनोबा त्या मंदिरात आवर्जून गेले. नंतर त्यांनी सांगितले की ‘या देशात मी त्या वृद्धेच्या म्हणण्यानुसार दर्शनाला न जातो तर त्या मंदिराच्या प्रतिष्ठेला ठेच लागली असती आणि त्या वृद्धेच्या मनावरही आघात झाला असता.’

कोणाच़ा न करी द्वेष दया मैत्री वसे मनीं

मी माझे न म्हणे सोशी सुख- दु:खें क्षमा- बळें

    -गीताई – अ. १२/ श्लोक १३

गीतेतील भक्त लक्षणाचे हे प्रत्यक्ष दर्शन होते.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST
Next Story
चतु:सूत्र : शोध सुयोग्य पर्यायाचा..