scorecardresearch

साम्ययोग: गंगा आणि सागर

भूदान म्हणजे गंगा आणि ग्रामदान म्हणजे सागर -विनोबा भूदान म्हटले की पोचमपल्ली आणि रामचंद्र रेड्डी यांची आठवण होते.

साम्ययोग: गंगा आणि सागर
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अतुल सुलाखे

भूदान म्हणजे गंगा आणि ग्रामदान म्हणजे सागर -विनोबा भूदान म्हटले की पोचमपल्ली आणि रामचंद्र रेड्डी यांची आठवण होते. तसेच ग्रामदान म्हटले की उत्तर प्रदेशातील मंगरोठचे स्मरण होते. ग्रामदानाचा आरंभ मंगरोठपासून झाला असला तरी त्याची सुरुवात पोचमपल्लीमधूनच झाली. तीही दलित बांधवांना जमीन मिळवून देण्यापासून. पोचमपल्लीच्या दलितांनी विनोबांकडे जमिनीची मागणी केली. शेतमजुरीतील काबाडकष्ट, अपुरी मजुरी आणि त्यातून आलेले अपार दारिद्रय़ हे दु:ख ऐकून विनोबा हेलावले. जमीन मिळाली तर ही दलित मंडळी सन्मानाने जगतील. एरवी हिंसेच्या वाटेने जातील हे विनोबांनी ताडले. किती जमीन मिळाली तर तुमचा उपजीविकेचा प्रश्न सुटेल हे विचारताच त्या समूहाने ८० एकर जमिनीची मागणी केली.

विनोबांनी ही समस्या सुटेल, असे त्यांना सांगितले. तथापि काही अटी घालण्यास ते विसरले नाहीत. पहिली अट होती की ही जमीन समूहासाठी असेल. दुसरी अट अर्थातच समूहाने जमीन कसण्याची होती. कोणत्याही स्थितीत व्यक्तिगत भूदान होणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. हा प्रसंग भूदानाचा आरंभ होता. त्याचप्रमाणे त्यात ग्रामदानाची बीजेही होती.

या जमिनीवर समूहाची मालकी असेल. जमीन ही व्यक्तीच्या मालकीची वस्तू नाही. हवा, पाणी, झाड-झाडोरा हे जसे ईश्वरनिर्मित आहेत तसेच जमिनीवर मालकी फक्त देवाची आहे अशी विनोबांची धारणा होती. ‘सबहि भूमि गोपाल की’ ही श्रद्धा होती. विनोबा भूदानापेक्षाही ग्रामदानाला महत्त्व देत असत. जमिनीपेक्षा ग्रामाचे दान करण्याची रीत त्यांना अधिक प्रभावी वाटली. वेदांमध्ये ग्राम ही संकल्पना स्तुत्य मानली आहे. तिचा पुढचा टप्पा म्हणजे सर्वोदयाने खेडय़ांकडे जाण्याची गरज वारंवार सांगितली. ग्रामदान हे त्या कार्यक्रमाचे सगुण रूप होते.

ग्रामदानाच्या अनुषंगाने झालेल्या या यात्रेतच विनोबांना गीताईचे ध्यान स्फुरले. भूदान, ग्रामदान आणि गीताईचे ध्यान ही सर्व साम्ययोगाची अंगे आहेत. भूमी आणि समत्व म्हणजेच ऐहिक आणि आध्यात्मिक साम्ययोग होय. आरंभीच्या काळात भूदान आणि ग्रामदान यांचा सामाजिक आणि आर्थिक आघाडय़ांवर मोठा प्रभाव होता. या दानयज्ञाचा राजकीय क्षेत्रावरही प्रभाव पडला. वासाहतिक काळानंतर जे देश स्वतंत्र झाले तिथे लोकशाही वातावरण फार काळ टिकले नाही.

विनोबांचे योगदान नीटसे उमगत नाही. कारण ते खुद्द विनोबांनीच दुय्यम मानले. नेहरूंना मात्र ते पुरेपूर ठाऊक होते. या देशाचा आणि जगाचा इतिहास पुन्हा लिहिला तर त्यामध्ये विनोबांना फार वरचे स्थान द्यावे लागेल. नेहरूंचे हे मत पुरेसे बोलके आहे. जगाच्या राजकारणात विनोबांच्या वैचारिक उंचीची फार कमी माणसे आहेत, हे नेहरूंनी म्हणावे याला फार महत्त्व आहे. तथापि विनोबांना टेकडीपेक्षा जमीन आणि माती बनण्याची अधिक इच्छा होती. स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीतील भूदान आणि ग्रामदानाचा वाटा अभ्यासताना ही पूर्वपीठिका माहीत असणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 01:01 IST

संबंधित बातम्या