भजन क्र. ७६

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाधी हरिची समसुखेविण।

न साधेल जाण द्वैतबुद्धी ॥

बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें ।

एक्या केशीराजें सकळ सिद्धी ॥

ऋद्धी सिद्धी निधी अवघीचि उपाधी ।

जंव तया परमानंदी मन नाहीं ॥

ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान ।

हरिचे चिंतन सर्वकाळ ॥

– ज्ञानदेवांची भजने ( चिंतनिकेसह)

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या सुमारास म्हणजे १९४६-४७ मधे विनोबांच्या हातून एक अद्भुत चिंतनिका तयार झाली- ‘ज्ञानदेवांची भजने (चिंतनिकेसह) आणि चांगदेव चाळिशी’. या ग्रंथाचे महत्त्व सांगायचे तर तो गीत-प्रवचनांच्या तोडीचा आहे. गीता प्रवचने साने गुरुजींनी शब्दबद्ध केली तर ही चिंतनिका स्व. दामोदरदासजी मुंदडा यांनी शब्दांकित केली. या दोन्ही सत्पुरुषांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत.

या चिंतनिकेत हरिपाठातील काही अभंग आहेत. माउलींचे समग्र ग्रंथ सामान्यजन वाचण्याची शक्यता फार कमी असते. हरिपाठ मात्र वारकरी बांधवांना पाठ असतो. त्यामुळे ‘हरिपाठ ही श्रद्धा रक्षण करणारी वस्तु आहे,’ असे विनोबा म्हणत. त्या दृष्टीनेही ही चिंतनिका पाहायला हवी.

ज्ञानदेवांच्या भजनांमधे विनोबांनी वरील अभंगावर चिंतन मांडले आहे. ते नेहमीप्रमाणे साम्ययोगाला धरून आहे. विनोबा सांगतात, ‘सर्वत्र सुख-साम्य योजल्याशिवाय हरीची समाधी लाभणार नाही. भेदभावाचे निर्दालन करून सुख-साम्य संपादण्यातच बुद्धीचे वैभव आहे. पण दुर्दैवाने अवांतर ऋद्धी, सिद्धी, निधी मिळवण्यात मनुष्याला बुद्धीचे वैभव वाटते. पण जोवर सुख- साम्यरूप- परमानंदाकडे मन जात नाही तोपर्यंत या उपाधीच होत. ज्ञानदेवाला तर त्याच एका ध्येयाचे, त्या हरिमय समाधीचे, चिंतन करण्यात, त्यासाठी तळमळण्यात रम्य समाधान लाभले आहे.’

ही चिंतनिका विनोबांना अक्षरश: स्फुरली. ती कुठे विस्तृत आहे. कधी संक्षिप्त आहे तर कधी स्वतंत्र आहे. तिचे अवलोकन केल्यावर विनोबांनाही नवे काहीतरी ध्यानात येई इतके तिचे महत्त्व आहे. गीता प्रवचने जशी जनतेची झाली तशी ही चिंतनिका नित्यनूतन आहे.

माउलींची समसुखे विनोबांनी साम्ययोगाच्या रूपात पाहिले. समाधी साधायची तथापि पूर्वअट म्हणून लौकिक समत्वही साधायचे असे विनोबांचे दर्शन आहे. भूदान यात्रा बिहारमध्ये होती तेव्हा विनोबांनी या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीला काही चिंतनपर मजकूर जोडले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, या चिंतनिकेला कधी शिळेपणा येणार नाही. याचा अर्थ भूदान यात्रेमध्ये विनोबांना माउलींचा ‘सहवास’ लाभला होता. अर्थात हेही त्यांनीच सांगितले आहे. भूदान यात्रेत सर्व संत माझ्यापुढे चालत आहेत, असे मला दिसले. त्यामुळेच भूदानाचे अपयश हा परमेश्वराचा पराभव आहे, इतक्या नि:शंकपणे ते म्हणू शकले.

हरिपाठातील या अभंगात ‘बुद्धी’ हा शब्दही आहे. केशीराजाला प्राप्त करताना माउली आणि बुद्धीचा आधार घेतात. ही बुद्धी नेमकी काय प्रकारची असते हे जाणून घेणे फार आवश्यक आहे. बुद्धी न वापरता साम्ययोगच काय पण कशाचेही ज्ञान होत नाही. निर्बुद्ध रटाळपणाला विनोबांच्या विचारसृष्टीमध्ये स्थान नाही.

अतुल सुलाखे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyayog india independence vinoba wonderful thinker ysh
First published on: 17-08-2022 at 00:02 IST