scorecardresearch

साम्ययोग : सश्रद्ध बुद्धीचे अधिष्ठान

भूदान यात्रेतील एक प्रसंग आहे. विनोबांना भेटायला अनेक लोक येत असत. सर्व वयोगटाचे आणि समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्तींचा यामधे समावेश असे.

साम्ययोग : सश्रद्ध बुद्धीचे अधिष्ठान
( प्रतिनिधिक छायाचित्र )

अतुल सुलाखे

भूदान यात्रेतील एक प्रसंग आहे. विनोबांना भेटायला अनेक लोक येत असत. सर्व वयोगटाचे आणि समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्तींचा यामधे समावेश असे. एकदा विनोबांना भेटायला काही तरुण मंडळी आली. त्यांना भूदान आंदोलनाबाबत काही प्रश्न होते. खरेतर आक्षेपच. ते त्यांनी विनोबांसमोर सडेतोडपणे मांडले. विनोबांनी शांतपणे ते आक्षेप ऐकून घेतले आणि म्हणाले की ‘आक्षेप घेणारे लोक विशेषत: तरुण मला आवडतात. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे.’

प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर घासून घेतली पाहिजे हा विनोबांच्या विचार सृष्टीचा अत्यंत लोभसवाणा पैलू आहे. तरुणांनी विशेषत: विद्यार्थी वर्गाने स्वतंत्र बुद्धीने अध्ययन करावे ही त्यांची अपेक्षा असे. व्यक्तीपेक्षा विचारांना महत्त्व देणे, बुद्धीची कसोटी लावणे, निरंतर अध्ययनातून प्रयोग करणे आणि व्यापक पातळीवर कृती करणे हे विनोबांचे फार मोठे विचार विशेष होते. ज्या गांधीजींना त्यांनी सर्वस्व मानले त्यांचीही मनाला पटली तेवढीच कामे त्यांनी पुढे नेली.

विनोबा एखाद्या विषयाची मांडणी करताना पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष हे सूत्र अवलंबत. आपल्याला न पटणाऱ्या विचारसरणीतील चांगला अंश ग्रहण करावा आणि बाकीचा भाग सोडून द्यावा असा त्यांचा विचार दिसतो. उदाहरणार्थ विविध राजकीय विचारसरणी. त्यातही नाझी, फॅसिझम आणि साम्यवाद. या त्रिकुटांची त्यांनी केलेली डोळस चिकित्सा मुळातून वाचायला हवी.

आपल्याकडे या विचारधारांबद्दल आकस आहे आणि तो काही प्रमाणात स्वाभाविकही आहे. तथापि निव्वळ कडवट टीका करून काही साधत नाही. नाझी विचारांचे सार म्हणजे पूर्व परंपरेचा अभिमान. आपण विवेक बुद्धी जागी ठेवून असा अभिमान बाळगला पाहिजे.

उरलेल्या दोन विचारसरणी म्हणजे फॅसिझम आणि कम्युनिझम. अनुक्रमे राष्ट्रप्रेम आणि समाजहिताची तळमळ. हे सारं आपण अवगत केले की या विचारधारसरणी आपोआप निष्प्रभ होतात.

बुद्धिवादाची देखील त्यांनी कसून तपासणी केल्याचे दिसते. बुद्धीविषयी आदर आहे की अहंबुद्धिवादाचे आकर्षण आहे, या प्रश्नावर बुद्धिवादाचे प्रामाणिक समर्थक थबकतील हे नक्की. आणखी एका मनोवस्थेची त्यांनी तपासणी केली आहे. मनस्वी असणे आणि मनाप्रमाणे व्यवहार करणे. विनोबा ही मनोवृत्ती म्हणजे सर्वोच्च गुलामी आहे असे मानत. मनस्वी म्हणणाऱ्यांनी या मताचा विचार केला पाहिजे.

विनोबांची विचारांची निष्ठा हा तसाच मोठा गुण आहे. तुमचा विचार मला पटवून द्या आणि मला तुमच्या बाजूला घ्या. इतक्या सहजपणे ते संवाद साधत. बुद्धीप्रमाणेच त्यांनी श्रद्धाही महत्त्वाची मानली होती. तिला प्रेम आणि करुणेचे अधिष्ठान दिले. सामान्य लोकांशी संवाद साधायचा तर त्यांची भाषा अवगत हवी. आपली विद्वत्ता बाजूला ठेवून जनतेशी त्यांच्या भाषेत संवाद साधायचा तर बुद्धीचा खरा कस लागतो. ही गोष्ट समजली नाही तर विनोबांचे विचार आणि त्यांच्या वाङ्मयाविषयी साचेबद्ध टीका होते. गीताई आणि भूदान ही विनोबांची अजोड कामे होती.  सत्य, प्रेम, करुणेचा मार्ग बुद्धीचा वापर करत चोखाळणे हे विनोबांच्या विचारांचे वैभव होते. ही विचार पद्धती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली याचा आढावा घेतला तर आपल्या परंपरेची नव्याने ओळख होते.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या