scorecardresearch

साम्ययोग : परम साम्याचे रूप

भूदान यज्ञ हा प्रजासूय यज्ञ होता. या यज्ञाने सत्य प्रेम आणि करुणेच्या जोरावर अवाढव्य भूमी संपादित केली.

साम्ययोग : परम साम्याचे रूप
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अतुल सुलाखे

अभिधेयं परम साम्यम् ।  – विनोबा

भूदान यज्ञ हा प्रजासूय यज्ञ होता. या यज्ञाने सत्य प्रेम आणि करुणेच्या जोरावर अवाढव्य भूमी संपादित केली. खरे तर या तत्त्वांच्या जोरावर विनोबांनी एक गुंठा जमीन मिळवली असती तरी तिची इतिहासाला नोंद घ्यावी लागली असती कारण भारतीय संदर्भात जमिनीचा साधा तुकडा अगदी कायद्याचा आधार घेऊन मिळवताना असंख्य धोके पत्करावे लागतात. अशा स्थितीत भूदान केवळ हृदय परिवर्तनाच्या जोरावर झाले. एका नगरीचे राज्यपद देण्याचा मुद्दा समोर आला रामायण घडले. पाच गावे पांडवांना द्यावीत अशी सुबुद्धी दुर्योधनाला झाली नाही आणि महाभारत घडले. आधुनिक काळातही हिंसाचाराच्या आधारे देशातील गरिबांचे प्रश्न तडीस नेण्यावरच जोर देण्यात आला. भूदान यज्ञ सुरू झाला आणि भारताच्या इतिहासात एक चमत्कार घडला असे म्हटले जाऊ लागले.

विनोबा मात्र भूदान संकल्पनेवर समाधानी नव्हते. समाजात एक घट्ट नाते जन्माला येत होते. बंधुतेचे वातावरण तयार होऊ लागले होते. विनोबांना त्याही पलीकडे काही हवे होते. दानापेक्षा त्यांना विसर्जन हवे होते. संपत्ती, स्वामित्व आणि अखेरीस ‘स्व’ या पायऱ्यांवरून संपूर्ण विसर्जन कसे जन्माला येईल या शोधात त्यांना ग्रामदानाची कल्पना स्फुरली. दानाला विसर्जनाचा स्पर्श झाला. ग्रामदानाने भूदानाला काव्य रूप दिले. ग्रामदानाच्या अनुषंगाने विचारकांनी केलेले चिंतन त्याची साक्ष देते.

ग्रामदानात व्यक्तिगत मालकी नाहीशी होते तशीच ती वाढतेही. यामुळे माझी जमीनच नाही अशी स्थिती निर्माण होते तर सर्व जमीन माझीच आहे अशी भावना वाढीस लागते. आद्य शंकराचार्याची समुद्र आणि तरंगाची कल्पना, माउलींचे विश्वात्मभाव जपणारे पसायदान, रामकृष्ण परमहंसांची अंश आणि अंशी आणि शेवटी महात्मा गांधींची विश्वस्त वृत्ती या सर्व छटा ग्रामदानात येतात. विनोबांनी आपल्या जीवनाचा आद्य सिद्धांत स्मृतिरूपात सांगितला आहे.

ब्रह्म सत्य आहे. हे जग स्फूर्तिदायी आहे आणि जीवन म्हणजे सत्याचा निरंतर शोध आहे. ग्रामदानाची संकल्पना सामाजिक साम्याचा परिपूर्ण आविष्कार आहे. विनोबा भूदानात गीताई पहात होते त्याला हा संदर्भ आहे. सेवा आणि चिंतन यांचे दोन वेगळे तुकडे होत नाहीत. सेवा हेच चिंतन आणि चिंतन हीच सेवा. गीता प्रवचनांमध्ये हाच विचार मिठाईचे उदाहरण देऊन सांगितला आहे. जीवन हेच शिक्षण याही रूपात तो दिसतो. समाजाची सेवा आणि आत्मविकास यात भेद नाही.

आत्मज्ञानात ही भावना ‘अभिधेयं परम साम्यम्’ अशी प्रकट होते तर भौतिक विकासात ती ‘सबहि भूमी गोपाल की’ अशी उमटते. गीताईत प्रस्थान त्रयीचा भर सामाजिक साम्यावर आहे तर भूदान स्वामित्व विसर्जन अंतिम मानते. परम साम्य म्हणजेच साम्ययोगाचे हे रूप आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या