scorecardresearch

साम्ययोग : रामाचे चरण..

ही उत्तर प्रदेशातील गोष्ट आहे. एका गावात रामचरण नावाचे एक अंध गृहस्थ रात्रीच्या वेळी विनोबांचे दर्शन घ्यायला आले.

साम्ययोग : रामाचे चरण..
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अतुल सुलाखे

ही उत्तर प्रदेशातील गोष्ट आहे. एका गावात रामचरण नावाचे एक अंध गृहस्थ रात्रीच्या वेळी विनोबांचे दर्शन घ्यायला आले. त्यांना या कार्यासाठी अर्धा गुंठा जमीन द्यायची होती. त्यांची क्षमता तेवढीच होती. मात्र ते आले तेव्हा विनोबा विश्रांती घेत होते. दान घ्यावे यासाठी त्यांनी खूप विनवण्या केल्या. निदान अर्धा गुंठा जमीन घ्या, त्यामध्ये खतासाठी खड्डा खोदता येईल, असे त्यांचे म्हणणे होते.

शेवटी, ‘संत बाबाला दान देण्याकरिता म्हणून मी मुद्दाम इतक्या दुरून आलो आहे. त्यांना उठवू नका. त्रास होईल. माझे दानपत्र तेवढे त्यांना द्या!’ असे म्हणत दानपत्र देऊन ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी विनोबांना ही गोष्ट समजली. ते सद्गदित झाले. अश्रुभरल्या नेत्रांनी ते एवढेच म्हणाले, ‘अरे! साक्षात् परमेश्वर माझ्या भेटीला आला होता आणि तुम्ही मला उठवले नाहीत आणि मीही निजून राहिलो! त्याने मला प्रभू रामाच्या चरणांचे दर्शन घडवले. तो आंधळा नव्हता. देवच होता. त्याला कुणी सांगितले दान द्यायला? कुणी दिली प्रेरणा? त्याला डोळय़ांविना दर्शन कसे झाले? हे देवाचे काम आहे. तोच आपल्याकडून करवून घेत आहे. आपण निमित्तमात्र आहोत.’

भूदान यज्ञ एका राम नवमीला सुरू झाला आणि या यज्ञात साक्षात् श्रीरामानेच आहुती दिली. अशा असंख्य प्रसंगांनी भूदान यात्रा भूषणास्पद ठरली. स्वातंत्र्योत्तर भारताची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडण करण्याचे कार्य या यात्रेमुळे झाले. भूदान म्हणजे जमीन घ्यायची आणि द्यायची इतका सरधोपट प्रकार नव्हता. अर्थात त्याही पातळीवर भूदान यात्रेने लक्षणीय कार्य केले. त्याचा पाठपुरावा करणे ही सर्वाची समान जबाबदारी होती. ती बहुसंख्य देशवासीयांनी पेलली. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही मूल्य रुजवण्यात, देशाला स्थैर्य देण्यात आणि जगाला शांततेच्या मार्गावर नेण्यात ज्या अनेक व्यक्तींचा वाटा होता त्यात विनोबांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो.

भूदान यज्ञाच्या निमित्ताने विनोबांच्या दोन वचनांचे स्मरण होते. ‘नित्य यज्ञाशिवाय राष्ट्र उभे राहात नाही,’ हे पहिले वचन. विनोबांची यज्ञ संकल्पना फारच अनोखी होती. आठ तास उत्पादक श्रम करणे ही त्यांची यज्ञाची कल्पना होती. एवढेच कार्य केले तरी देशासमोरचे अनेक प्रश्न सुटतील ही त्यांची भूमिका होती. भूतमात्रांची सेवा आणि शरीर परिश्रमातून मोक्षप्राप्ती हे दोन मोठे संस्कार वासाहतिक काळात या देशावर झाले. रामकृष्ण परमहंस आणि महात्मा गांधी यांचे त्यातील योगदान लक्षणीय होते.

विनोबांनी केलेले कार्य हे देशसेवकाचे कार्य होते. नम्रता, सेवा आणि शरीरपरिश्रम हा त्यांच्या कार्याचा गाभा होता. आपण केलेले कार्य ते परमेश्वराला अर्पण करून मोकळे होत. मग ती साहित्य सेवा असो, की जमिनीचे फेरवितरण. आपण सेवेसाठी आहोत ही त्यांची धारणा जराही ढळली नाही. त्या अनुषंगाने, ‘उंच टेकडी होण्यात मला मौज वाटत नाही. माझी माती इतस्तत: पसरावी असे मला वाटते’ हे त्यांचे उद्गार बोलके आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणजे भूदान. ‘भूदानाचा पराभव म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा पराभव असेल,’ या नम्र धारणेमुळेच त्यांना ‘रामचरणां’चे बळ मिळाले.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या