साम्ययोग : परंपरा आणि बुद्धिस्वातंत्र्य

परंपरा आणि बौद्धिक स्वातंत्र्य यांचे हाडवैर असते अशी आपली समजूत असते. तशात परंपरा धर्माशी निगडित असेल तर या स्वातंत्र्याचा आणखी संकोच होतो.

साम्ययोग : परंपरा आणि बुद्धिस्वातंत्र्य
( प्रतिनिधिक छायाचित्र )

अतुल सुलाखे

असें गूढाहुनी गूढ बोलिलों ज्ञान मी तुज़

ध्यानीं घेऊनि तें सारें स्वेच्छेनें योग्य तें करीं

गीताई अ. १८ – ६३

परंपरा आणि बौद्धिक स्वातंत्र्य यांचे हाडवैर असते अशी आपली समजूत असते. तशात परंपरा धर्माशी निगडित असेल तर या स्वातंत्र्याचा आणखी संकोच होतो. ही समजूत अगदीच चुकीची नाही. विनोबांच्या बाबतीत मात्र ही गोष्ट खरी नाही. त्यांनी, वैदिक भक्ती-परंपरा बौद्धिक स्वातंत्र्याचे पूर्णपणे समर्थन करते, असे म्हटले आहे.

गीताईमधील वर दिलेल्या श्लोकाचे विवरण करताना आपल्याकडील धर्म परंपरा बौद्धिक स्वातंत्र्याला कशी अनुकूल आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे. विनोबा सांगतात,

बुद्धिस्वातंत्र्य हे वैदिक भक्तिमार्गाचे वैशिष्टय़ आहे. आप्तवाक्य श्रद्धेने ऐकावे आणि बुद्धीने पारखून घ्यावे अशी मुमुक्षूला तो मोकळीक आणि जबाबदारी देत असतो. आप्तवाक्य म्हणजे गुरूचे, श्रुतींचे आणि श्रद्धास्पद अनुभवी व्यक्तीचे वाक्य. आप्त म्हणजे नातलग नाही. सत्याला धरून उत्तम सांगतो तो वक्ता हा आप्तचा अर्थ आहे.

एखादी गोष्ट बुद्धीने पारखून घ्यायची हे सोपे काम नाही. ती अत्यंत जबाबदारीने करायची गोष्ट आहे. परमात्म दर्शन सूक्ष्म आणि कुशाग्र बुद्धीला होते, असे कठोपनिषदात सांगितले आहे. इतकेच नव्हे तर नित्यपाठासाठी असणाऱ्या गायत्री मंत्रात ‘परमेश्वर आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो,’ असे म्हटले आहे. बौद्धिक स्वातंत्र्याला मान्यता देणारा मंत्र म्हणून पंडित नेहरूंना गायत्री मंत्र आवडत असे. विनोबांनी या बौद्धिक स्वातंत्र्याची आणखी फोड केली आहे. हा मंत्र ‘माझ्या’ नव्हे तर ‘आमच्या’ बुद्धीला प्रेरणा देवो, असे म्हटले आहे. हे त्यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे.

परंपरेत वेदांत, ‘ब्रह्मसूत्र’ आणि ‘गीता’ यांचा एकत्रित उल्लेख प्रस्थानत्रयी असा होतो. विनोबा ब्रह्मसूत्राला स्वतंत्र ग्रंथ मानत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रस्थानत्रयी वेद उपनिषदे आणि गीता अशी आहे. उपनिषदे आणि गीता यामधे जी घोटाळय़ाची स्थाने आहेत त्यांची व्यवस्था लावण्याचे कार्य ब्रह्मसूत्र करते. त्यामुळे तो स्वतंत्र ग्रंथ नाही, असे विनोबा म्हणतात.

खुद्द प्रस्थानत्रयीची निवड करण्याएवढे स्वातंत्र्य विनोबांनी घेतले. शिवाय वैदिक परंपराही अबाधित राखली. परंपरानिष्ठ बौद्धिक स्वातंत्र्याचे हे उत्तम उदाहरण आहे. दुसरीकडे त्यांचे मधले भाऊ बाळकोबा भावे ‘ब्रह्मसूत्र’ हा एकच ग्रंथ प्रमाण मानत. हे स्वातंत्र्याचे दुसरे उदाहरण. बाळकोबा ‘ब्रह्मसूत्रा’चे मोठे भाष्यकार होते.

अशा बौद्धिक स्वातंत्र्याची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. आद्य शंकराचार्य आणि ज्ञानदेव ही आणखी दोन नावे आहेत. श्रुती, अग्नी थंड असतो असे म्हणत असतील तर ऐकू नका अशा आशयाचे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. माउलींनी तर वेदांना ‘कृपण’ म्हटले आहे.

बौद्धिक स्वातंत्र्याला इतके महत्त्व देणारी ही परंपरा विनोबांनी गीताई, भूदान आणि अंतिमत: साम्ययोगाच्या रूपाने खूप पुढे नेली. त्यामुळे ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ आणि ‘ब्र काढायचा नाही’ या मानसिकतेला विनोबांच्या विचार विश्वात स्थान नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत सर्वोदयाने परिभाषित केलेली स्वातंत्र्याची कल्पना भविष्यात आपल्या फार उपयोगी पडणारी आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लोकमानस : ‘अबलीकरण’ की गुन्हेगारीचे उदात्तीकरण?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी