अतुल सुलाखे

साध्य-साधन विवेक हा गांधीजींच्या नंतरच्या राजकारणाचा फार मोठा विशेष होता. तत्त्व आणि विचार यावर राजकारण आधारित असणाऱ्या विनोबांनी सत्याग्रहाच्या मार्गाचे अत्यंत नेमकेपणाने शोधन केल्याचे दिसते. विरोधक विनोबांच्या प्रयोगाची चेष्टा करत होते. विनोबांची मांडणी फसवी आणि ‘जैसे थे’चा आग्रह धरणारी आहे अशी विरोधकांची भूमिका होती. तथापि विनोबांनी केलेला सत्याग्रह मार्गाचा विकास खरोखरच तकलादू होता?

विनोबा म्हणतात, सत्याग्रह शब्दात सत्य महत्त्वाचे आहे, परंतु आग्रह हा दूषित आहे. या आग्रह शब्दाचा तेलुगू आणि संस्कृत भाषेत फारसा चांगला अर्थ नाही. तेलुगूमध्ये आग्रह म्हणजे क्रोध. पाणिनीने आपल्या महाभाष्यात एक वचन दिले आहे. ‘एक: शब्द: सम्यक् ज्ञात: सुष्ठु प्रयुक्त: स्वर्गे लोके कामधुक् भवति।’ एका शब्दाचाही सम्यक उपयोग केला तर तो स्वर्गात कामधेनु सिद्ध होतो. तथापि शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला तर काय परिणाम होतात हे गांधीजींच्या नंतरच्या सर्व सत्याग्रहांकडे पाहता समजते. सत्यापेक्षा आग्रहावर जोर दिल्याचा हा दुष्परिणाम आहे.

सत्याग्रह म्हणजे सत्य ग्रहण करणे. सत्य ग्रहण करणे शिकाल तर सत्य हाती येईल. सत्य ग्रहण करण्यासाठी मुक्त मनही पाहिजे. आज या गोष्टीची फार गरज आहे. आज मुक्त मन नाही. ते विभाजित झाले आहे. राष्ट्र, भाषा, पंथोपपंथात, राजकारणात ते विभाजित झाले आहे. असे मन मुक्त चिंतन करू शकत नाही. जीवन चर्चेत सत्यावर निष्ठा ठेवणे म्हणजे सत्याग्रह. ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीकडे सत्य नाहीच, असे मानणार नाही, उलट सर्वाच्या जवळ सत्य असू शकते असे मानेल. दोन्हीकडच्या सत्यांचा मेळ घालणारी ही भूमिका आहे. कठोपनिषदात सत्याग्रह शब्दासाठी ‘सत्यधृति’ असा शब्द आहे. म्हणजे सत्यावर ठाम असणारा.

इथे सत्याग्रहीपेक्षा ‘सत्यग्राही’ ही संकल्पना विनोबा महत्त्वाची मानतात. त्यांच्यावर जैन तत्त्वज्ञानाचा जो प्रभाव होता त्याचा हा परिणाम. उपनिषदे, जैन तत्त्वज्ञानाप्रमाणे आसामच्या संत माधवदेवांच्या साहित्यातही विनोबांना हा शब्द आढळला. ओरिसाच्या भक्ती साहित्यात विनोबांना भावग्राही हा शब्द सापडला. त्यावरून त्यांना सत्यग्राही शब्द सुचला.

इतक्या व्यापक पृष्ठभूमीवर विनोबांनी सत्याग्रह शब्दाचा शोध घेतला आहे. विनोबांचा भर विचारांवर होता. तसा तो गांधीजींचाही होता. गांधी विनोबांचे विचार विश्व तत्त्वनिष्ठ होते. अशी मांडणी कुणाला पटणारही नाही. अशा स्थितीत सत्याग्रहाविषयीची ही मांडणी संपूर्णपणे नाकारली तरी हरकत नाही. तथापि हे तत्त्वज्ञान म्हणजे केवळ शाब्दिक बुडबुडे आहेत अशी भूमिका घेणे म्हणजे गांधी विनोबांचे तत्त्वज्ञान गाभ्यातून नाकारल्यासारखे होते. विनोबांचे कट्टर विरोधक आणि त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणारे या दोहोंचे अशा ठिकाणी मतैक्य व्हावे हे खेदजनक आहे. गांधी विनोबांचे सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान आणि त्यांच्या विरोधातील मंडळींचे तत्त्वज्ञान यांची तुलना करता अनेक बाबी स्पष्ट होतात. विनोबांचे सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान आणखी खोलात पाहिले तर प्रश्नांच्या सोडवणुकीचा एक रचनात्मक मार्ग समोर येतो.