Samyayog untouchable non violence Vinoba Sattvicism Ramayana ysh 95 | Loksatta

साम्ययोग : सहदेवाचा धर्म

महाकाव्यांच्या संदर्भात आपण बरेचदा एकसाची समजूत करून घेतो. म्हणजे बंधुप्रेम म्हटले की रामायण आठवते आणि बंधुवैर म्हटले की महाभारत.

साम्ययोग : सहदेवाचा धर्म
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अतुल सुलाखे

मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो असतो तर कोण जाणे माझी अहिंसा डळमळीत झाली असती.

– विनोबा

महाकाव्यांच्या संदर्भात आपण बरेचदा एकसाची समजूत करून घेतो. म्हणजे बंधुप्रेम म्हटले की रामायण आठवते आणि बंधुवैर म्हटले की महाभारत. सात्त्विकता म्हणजे रामायण आणि कुरघोडी व संघर्ष म्हणजे महाभारत. महाभारत म्हणजे जमिनीसाठीचा संघर्ष आणि रामायण म्हणजे शुद्ध नैतिकता. ही यादी कितीही वाढवता येते. मुद्दा एवढाच की या दोन्ही महाकाव्यांच्या कथानकात कमालीचे साम्य आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण रामायण, महाभारतात सामावले आहे.

दोन्ही महाकाव्यांमध्ये जमिनीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रामायणात तो नैतिकतेला प्राधान्य देऊन सोडवला आहे. अर्थात या नैतिकतेच्या आड संघर्ष आहे. महाभारताची रचना बरोबर उलट दिसते. तिथे जमिनीचा प्रश्न संघर्षांच्या मार्गाने सोडवण्यात आला असला तरी अंतिमत: नैतिकता महत्त्वाची ठरते. परिशुद्ध भक्ती आणि नीती पाहायची असेल, तर भागवत हातात घ्यावे लागते.

रामायणात नीती आहे तर भागवतात भक्तांमध्ये अभेद मानला आहे. भीष्म आणि बिभीषण या दोन्ही नावांचा अर्थ ‘भीषण’ असा असला तरी भागवत धर्माच्या दृष्टीने हे दोन्ही ‘भागवत’ आहेत. हा अभेद विनोबांनी महाभारतातदेखील पाहिला. यक्ष, धर्मराजाला ‘तुला कोणता भाऊ जिवंत करून हवा,’ हा प्रश्न विचारतो तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता धर्मराज, सहदेवाचे नाव घेतो. कुंती आणि माद्री या दोघींची संतती जिवंत असली पाहिजे अशी भूमिका घेण्याऐवजी विनोबा धर्मराजाच्या उत्तरात अंत्योदयाचे तत्त्व पाहतात. प्रथमस्थानी असणाऱ्याने अंतिम स्थानी असणाऱ्याच्या उत्कर्षांसाठी प्रयत्न करावा, असा विचार मांडतात. 

हे तत्त्व त्यांना पूर्वजांकडून संस्काराच्या रूपाने मिळाले. गांधीजींच्या सहवासात ते विकसित झाले आणि त्यांच्यानंतर विनोबांनी दलितांच्या समस्येचा स्वतंत्रपणे विचार करत, भूदान यज्ञ हाती घेतला. आरंभी ते आपल्या सहकाऱ्यांसह नालवाडीमध्ये, दलित वस्तीत विशेषत: मेहतरांच्या प्रश्नांवर काम करत. त्यांचे हे कार्य स्थानिक दलित मंडळींनाही झेपले नाही. पुढे आश्रमात मैला सफाईचे कार्य विनोबांचे मधले बंधू बाळकोबा भावे यांनी सुरू केले. आधुनिक भारतातील पहिला ब्राह्मण मेहेतर असेही बाळकोबांचे वर्णन केले जाते.

जात्यंताच्या प्रश्नावर भावे घराण्याच्या तीन पिढय़ांनी महत्त्वाचे कार्य केले. हे कार्य निव्वळ प्रतीकात्मक न होता मूलगामी बदलाचे कार्य ठरले ते भूदान यज्ञामुळे. भारतात जमिनीचा प्रश्न हाती घेणे म्हणजे जातीचा प्रश्न हाती घेणे, असा अर्थ होतो. भूदानाची सुरुवात दलित वर्गाच्या भूमिसमस्येपासून झाली. तेलंगणात विनोबांनी जमीन मागितली ती तिथल्या दलितांची उपजीविका सुरळीत चालावी म्हणून. पुढे संपूर्ण भूदान यज्ञात विनोबा याची दक्षता घेत असत.

विनोबांच्या साम्ययोगात, दलित, शेतमजूर, छोटे शेतकरी, स्त्रिया, एके काळचे गुन्हेगार, आदींना प्रधान स्थान आहे. या वर्गाची सेवा करण्यात विनोबांनी धन्यता मानली. आधुनिक सहदेवाच्या समग्र हितासाठी हा नव-धर्मराज अतीव श्रमला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विनोबांवर प्रसंगी टीका केली असली तरी त्यांच्या दलित वर्गाबाबत असणाऱ्या तळमळीबाबत कौतुक करायला ते विसरले नाहीत.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST
Next Story
लोकमानस : महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न