scorecardresearch

साम्ययोग : साम्यविजय

विनोबांच्या कृतीमधे एक सुसंगती दिसते, कारण तिच्या पाठीशी प्रयोगशीलता होती.

साम्ययोग : साम्यविजय
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अतुल सुलाखे

विनोबांच्या कृतीमधे एक सुसंगती दिसते, कारण तिच्या पाठीशी प्रयोगशीलता होती. काम डाळ शिजवण्याचे असो की ग्रामदानाचे, प्रयोग करत राहाण्याची त्यांची निष्ठा अभंग होती. ग्रामदानात या त्यांच्या वृत्तीचा प्रत्यय येत असे. मंगरोठमधील पुरुष ग्रामदानाबाबत शंकित होते, पण महिला मात्र ग्रामदानावर ठाम होत्या. यातून बोध घेऊन मंगरोठवासीयांची पुन्हा एकदा सभा झाली. यातूनच भूमीवितरणाची फेरव्यवस्था तयार करण्यात आली. ती अशी होती –

१.  जमिनीची मालकी गावाची आणि वहिवाट कास्तकाराची राहील.

२.  सामुदायिक आणि व्यक्तिगत अशा दोन्ही पद्धतीने जमीन कसण्याचे स्वातंत्र्य असेल.

३.  जमिनीचे पुनर्वाटप तातडीने शक्य होणार नाही म्हणून एकूण जमिनीचा पाचवा हिस्सा मालकाकडे असेल.

४.  ७ ते ८ बिघे (६.५ एकर) अथवा त्याहून कमी जमीन असेल तर ती संबंधित शेतकऱ्याकडेच राहील.

५.  भूमिहीनाला प्रथम साडेसहा एकर जमीन कसण्यासाठी मिळेल आणि ती वाढत जाऊन १५ एकर होईल. ही फेरवाटपाची रीत होती.

६.  दर पाच वर्षांनी जमिनीचे फेरवाटप होईल.

७.  शेतसारा सामूहिक पद्धतीने भरला जाईल.

ग्रामसभेचा निर्णय विनोबांना समजला तेव्हा ते अतिशय आनंदित झाले. त्याच वेळी त्यांनी गावकऱ्यांना अनुभवाच्या चार गोष्टीही सांगितल्या. पुढे टाकलेले पाऊल मागे घ्यायचे नाही. हळूहळू पण पुढेच जायचे आहे. तुमच्या गावाचे नाव देशभर झाले आहे. जगाची दृष्टी तुमच्याकडे आहे. ईश्वराने तुम्हाला सद्बुद्धी दिली आहे. तोच बळही देईल.

नवीन व्यवस्थेमध्ये जमिनीचे वितरण ठरल्याप्रमाणे झाले. ३५ कुटुंबांच्या वाटय़ाला आलेली २०६ एकर जमीन सामुदायिक पद्धतीने कसण्याचा निर्णय घेतला. तर ६७ लोकांनी वैयक्तिक पर्यायाचा स्वीकार केला. चार कुटुंबांनी जमीन घेण्यास नकार दिला. गावात नव्याने आलेल्या एका कुटुंबाने जमीन स्वीकारली नाही. व्यक्तिगत शेतीचा पर्याय ज्यांनी स्वीकारला त्यांच्या वाटय़ाला ३ ते २० एकर जमीन आली. सामुदायिक शेतीसाठी ५० एकर जमीन ठेवली होती.

शेतीतून आलेल्या उत्पन्नातून गावात सार्वजनिक कामे झाली. व्यसनमुक्ती सहजच साधली. शौचालये उभी राहिली. सरकारी दुकान सुरू झाले. वस्त्र स्वावलंबन झाले. मूलोद्योग शाळा आकाराला आल्या. गाव बदलले. हा बदल इंग्लंडच्या ‘स्टेट्समन’ने हेरला आणि कर्तबगारी दुप्पट झाली.भारत हा काही देश नव्हे. तो लोकसंख्येचा केवळ ढिगारा आहे- हे विन्स्टन चर्चिल यांचे उद्गाार भारताने साभार परत केले आणि तेही ‘स्टेट्समन’च्या माध्यमातून यावेत हे फारच काव्यगत म्हणायचे.

स्वातंत्र्य मिळाल्यावर अवघ्या पाच वर्षांच्या आत. भूदान आणि ग्रामदानाच्या वाटचालीपर्यंत देश आला, कारण लोकांची तशी मानसिक जडणघडण झाली होती. महाकाव्ये, संत, त्यांची शिकवण यांनी पुन्हा निर्णायक भूमिका बजावली. या खेपेला काव्याचा निर्माता एक ‘सेवक’ होता. अथक सेवेतून त्याने एक महाकाव्य रचले. त्या कृतिशील महाकाव्याला ‘साम्यविजय’ म्हणता येईल.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या