अतुल सुलाखे

फळ लाभो न लाभो तूं नि:संग सम होउनी

योग-युक्त करीं कर्मे योग-सार समत्व चि।

– गीताई – २-४८

भजती मज जे जैसे भजें तैसा चि त्यांस मी

माझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनि हि ।

– गीताई – ४-११

साने गुरुजी आणि विनोबा यांचे नाते मुख्यत: गीता प्रवचनांच्या अनुषंगाने पाहिले जाते. गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहाच्या निमित्तानेही त्यांची उजळणी होते. तथापि हे दोन नेते अध्यात्मावर आधारित सामाजिक परिवर्तनाचे दोन प्रवाह होते, यावर फार जोर नसतो.

रामकृष्ण परमहंस आणि गांधीजी यांचा आदर्श समोर ठेवून या दोन्ही नेत्यांनी अध्यात्म आणि परिवर्तन यांची सांगड घातली. विनोबांनी आपला विचार साम्ययोगाच्या तत्त्वज्ञानाद्वारे नेमकेपणाने मांडला. गुरुजींचा विचार आई आणि समाजवाद अशा अंगाने पाहिला जातो. मात्र तुकोबांच्या नंतरची संतमाला गुरुजींनी पुढे सुरू ठेवली अशी मांडणी करत पुन्हा विनोबांनीच गुरुजींच्यामधील भक्ती आणि संस्कृतीचा मेळ समोर ठेवला.

दोघेही समग्र समतेच्या शोधात होते. त्याच्याआड जे आले ते सर्व या जोडीने नि:संदिग्धपणे दूर सारले. विनोबांनी साम्यवाद आणि साम्ययोग अशी तुलना करताना या दोन्ही तत्त्वज्ञानातील मानवाच्या कल्याणाची तळमळ समान असल्याचे सांगितले. तथापि साम्यवादाचा मार्ग आईसारखा प्रेमळ असला तरी कोणत्याही बदलाची अपेक्षा चटकन करतो. दुसरा मार्ग गुरूप्रमाणे आहे. त्याचेही या विश्वावर प्रेम आहे तथापि तो कासवाप्रमाणे सूक्ष्म दृष्टीचा आहे, अशी मांडणी त्यांनी केली.

तथापि परंपरेने सर्वोच्च गुरू म्हणून आईची निवड केली आहे परिणामी दोन्ही मार्गाना गुरू आणि आई अथवा भक्त आणि योगी अशाच उपमा देणे योग्य होईल. खुद्द विनोबा आणि साने गुरुजी शेवटी ‘मातृ-हृदयी’च होते. दोहोंची ध्येय गाठण्याची रीत थोडी वेगळी होती इतकेच.

आधुनिक भारताच्या इतिहासात अशी व्यापक एकता सातत्याने दिसते. न्या. रानडे यांचा नवभागवत धर्म, बंगालमधील आधुनिकतेच्या अंगाने जाणारा स्वामी विवेकानंद प्रणीत नववेदांत, ब्राह्मो समाज आदि उदाहरणे सहजपणे दिसतात. रामकृष्ण परमहंसांनी आपली साधना भूतमात्रांच्या सेवेसाठी कशी कामी येईल हे पाहिले. या सर्व विचारकांचा अभिमान परंपरेतून उगवतो आणि विश्वाच्या कल्याणापर्यंत जातो. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी घालून दिलेला कित्ता गांधीजींच्या रामराज्यात आणि विनोबांच्या साम्ययोगात पुरेपूर उतरल्याचे दिसते. गांधीजी आणि विनोबांवर ज्या लोकमान्यांचा प्रभाव होता त्यांनी कृष्णाची शिकवण समाजा समोर ठेवली. विवेकानंदांनी कृष्णाप्रमाणे शिवाच्या तत्त्वज्ञानाचाही डिंडिम मिरवला. ऋषी, मुनी, ब्राह्मण, भिक्षू, श्रमण, यती, साध्वी, श्रमणी, संत, भक्त, अशी परंपरेची पालखी मिरवली आणि ती मानवसेवेला, आधुनिक राजकीय विचारसरणीला, नेऊन भिडवली. योगी आणि भक्त यांचे रूप काळाप्रमाणे प्रकट होते हाच याचा अर्थ. ही भूमिका स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणात किती टिकून राहिली? साने गुरुजींच्या ‘घामाच्या फुलां’चे काय झाले?