अतुल सुलाखे

समाजवादाशी बांधिलकी असणाऱ्या अनेक व्यक्ती विनोबांशी जवळीक राखणाऱ्या होत्या. काही जणांचा प्रवास काँग्रेस आणि नंतर समाजवाद असा झाला तर काही जण सुरुवातीपासूनच समाजवादी होते. विनोबांवर प्रखर टीका करणारेही याच विचारसरणीशी बांधिलकी मानणारे होते.

विनोबांना नेता मानणाऱ्या गटात साने गुरुजींचे नाव अटळपणे येते. साने गुरुजींनी आयुष्य संपवले त्यावर विनोबांच्या काही प्रतिक्रिया यासाठी पुरेशा बोलक्या आहेत. साने गुरुजींकडे मातेची उत्कटता होती, मात्र योग्याची समत्वबुद्धी नव्हती. तुकोबांच्या नंतरचा संत म्हणून साने गुरुजींचे नाव घ्यावे लागेल, असेही विनोबा म्हणत. साने गुरुजींना जवळ ठेवून घेतले असते तर बरे झाले असते याचीही विनोबांना खंत असावी. अर्थात गीता प्रवचनांचे शब्दांकन गुरुजींनी केले आणि ‘सच्चिदानंदबाबा’ हे विशेषण विनोबांकडून मिळवले. पुढे भूदान आंदोलनाच्या काळात विनोबांना कार्यकर्त्यांची फौज मिळाली त्यात जयप्रकाश नारायण अग्रणी होते.

आणीबाणी व जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण सामाजिक क्रांती यामुळे समाजवादी परिवारातील विनोबांच्या टीकाकारांची संख्या वाढली. विनोबांनी केला तो गांधी-विचारांचा विकास केला की ऱ्हास असा सवाल करत विनोबांनी ऱ्हास केला असा निर्णय देणारे पुन्हा याच गटातील अभ्यासक होते. त्याच सुमारास, गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार विनोबा तर राजकीय वारसदार नेहरू अशीही मांडणी समोर येत होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक परिवर्तन आणि आध्यात्मिक उन्नती, गांधी आणि विनोबांचे राजकीय नाते, विनोबांच्या स्थितप्रज्ञतेची भारतीय परिवर्तनासाठी असणारी अत्यावश्यकता अशा नानाविध मुद्दय़ांना कवेत घेत विनोबांच्या कार्याची महती आचार्य जावडेकर यांनी दिली. गांधीजींचे राजकीय वारसदार म्हणून विनोबांचेच नाव घ्यावे लागेल हा नेमका निष्कर्ष हे जावडेकरांचे विशेष म्हणावे लागेल. या दृष्टीने जावडेकरांचे पुढील विश्लेषण महत्त्वाचे आहे-

‘नवसमाजवादी समाजरचना’ अथवा ‘सर्वोदयवाद’ ही केवळ राजकीय ध्येये नाहीत. सर्वागीण समाजरचनेची आणि अंतर्बाह्य जीवननिष्ठेची ती ध्येये आहेत. आजची समाजरचना विघातक झाली आहे. या समाजरचनेत आमूलाग्र क्रांती घडवून आणल्यावाचून समाजधारणा होणार नाही.

या स्फोटक परिस्थितीची जाणीव केवळ आदर्शनिष्ठ साधुसंतांना किंवा वेदान्त्यांबरोबरच वास्तववादी व व्यवहारदक्ष मुत्सद्दय़ांनाही झाली आहे. यामुळे सामाजिक क्रांती व आर्थिक क्रांती हा युगधर्म झाला आहे. या  क्रांतीचे स्वरूप समाजवादी रचना स्थापन करणे या स्वरूपाचे असले तरी ते मानवाची धर्मभावना व मोक्षवृत्ती यांना अनुरूप असेच आहे व त्यांना अनुरूप अशा साधनांनीच ते खऱ्या अर्थाने घडू शकेल. आचार्य जावडेकर यांची ही भूमिका विनोबांच्या साम्ययोगाची आठवण करून देणारी आहे. दोघेही अिहसक क्रांतीचे पुरस्कर्ते होते. अध्ययनशील आणि गतिमान होते. युगधर्म काय आहे याचे उभयतांना भान होते. आज गांधीजी, विनोबा, साने गुरुजी, आचार्य जावडेकर, जयप्रकाश नारायण या व्यक्ती विचाररूपानेच शिल्लक आहेत. प्रत्येकाच्या विचारविश्वाची खासियत आहे. ते विचारविश्व या युगाचा धर्म शोधायला नक्की उपकारक ठरेल.