अतुल सुलाखे

म्हणूनि आदरीं शास्त्र कार्याकार्य कळावया

शास्त्राचें वाक्य जाणूनि इथें तूं कर्म आचरीं।।

– गीताई १६ – २४

१३७. लोकसंग्रहाची योग्यता

जे विश्वप्रामाण्याची मुदी।

आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी।

लोकसंग्रहासि त्रिशुद्धी। योग्यु होसी॥ १६.४६८॥

(मुदी- शिक्का, मुद्रा, लोकसंग्रहासि- लोकांच्या सन्मार्गप्रवर्तनाला, विश्वप्रामाण्याची- विश्वाला प्रमाण होण्याचा)

हे शुद्धबुद्धी अर्जुना, लोकांना सन्मार्गाला प्रवृत्त करण्यासाठी तू योग्य आहेस. कारण विश्वाला प्रमाण होण्याची मुद्रा तुझ्या हाती आहे.

– ज्ञानदेवी सप्तशती

ज्ञानेश्वरीचा सोळावा अध्याय केवळ अद्भुत आहे. आरंभी माउलींच्या गुरुभक्तीचा आविष्कार आढळतो आणि अध्यायाच्या समाप्तीला श्रीगुरू निवृत्तीनाथांचे आशीर्वचन एखाद्या कळसावरील ध्वजेप्रमाणे शोभते. या दोहोंच्या दरम्यान, ‘दैवी आणि आसुरी संपत्ती’चे विवेचन येते. साध्या शब्दात सांगायचे तर काय करावे काय करू नये आणि त्यासाठी प्रमाण कुणाला मानावे हे या अध्यायात सांगितले आहे.

यातील ‘तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते’ हे स्थळ महत्त्वाचे पण काहीसे वादग्रस्त आहे. ‘शास्त्र प्रमाण’ असे म्हटले की एक गट पोथ्या पुराणांना कवटाळतो तर दुसरा त्यांना लाथाळतो. हा वाद जुना असला तरी तो वारंवार उफाळून येतो. खुद्द गीतेने ‘शास्त्र’ शब्दाचा वापर करून पुढच्या कित्येक पिढय़ांच्या पराक्रमाला वाव दिला आहे. कारण शास्त्र ही सदैव विकसित होणारी गोष्ट आहे. माउलींनी या गीता वचनाचा आणखी विकास केला. वेद प्रमाण म्हणत असताना वेदांना ‘कृपण’ म्हणताना ते कचरले नाहीत. आपल्या प्रतिपादनाला वेदांचा आधार आहे हे सांगताना, तसे वेदांनी सांगितले नसते तरी मी असेच म्हणणार होतो, हेही त्यांनीच नोंदवलेले दिसते. शंकराचार्यही असेच बुद्धिप्रामाण्यवादी आणि आत्मनिष्ठ होते. थोडक्यात आज आधुनिक वाटणारी भूमिका आपल्याकडे आठव्या शतकापासून दिसते. एकदा हे वास्तव मान्य केले की ‘शास्त्र प्रामाण्या’चा वेगळा अर्थ समोर येतो.

लोकसंग्रहाशिवाय कोणतेही सत्कार्य अशक्य आहे. या ओवीतील सुबुद्धी, त्रिशुद्ध, योग्य आणि लोकसंग्रह हे शब्द चिंतनीय आहेत. मनन, आचरण झाले की लोक एकत्र करणे म्हणजे लोकसंग्रह नव्हे हे उमजते. समाजशास्त्रातील हे प्रयोग या भूमीमध्ये कित्येक युगे चालले आणि पुढेही चालतील. तथापि त्या सर्वाचा संदेश कधी पसायदान, कधी ‘.. अवघा नारायण’, तर कधी ‘जय जगत्’ असाच दिसतो. आपले सुप्रसिद्ध श्रीविष्णुसहस्रनाम आहे विष्णूनामाचे स्मरण तथापि आरंभ ‘विश्वं विष्णु:’ने होतो.

लोकांना सन्मार्ग दाखवण्यासाठी कोण योग्य आणि कोण अयोग्य हे कसे ठरवायचे याचे संदर्भ काळानुरूप बदलतात. नव्या कसोटय़ा स्वीकारताना तारतम्य बाळगावे लागते. गीता प्रवचनांमध्ये या अध्यायाचे विवेचन करताना विनोबांनी वासाहतिक कालखंडाकडे आणि भारतीय समाजाच्या दोषांकडे एकाच वेळी लक्ष वेधले आहे. तेही वेद प्रामाण्य मानून. विनोबांचे जवळपास दोन दशके वर्तमान परिस्थितीवर चिंतन सुरू होते. गीता प्रवचने- गीताई- प्रथम सत्याग्रही, आत्मज्ञान आणि विज्ञानाचा मेळ घालणारा तत्त्वज्ञ असा हा प्रवास आहे. विनोबांची लौकिक प्रश्नांची जाण किती नेमकी होती हे या अध्यायामुळे प्रकर्षांने जाणवते.

jayjagat24@gmail.com