अतुल सुलाखे

किंबहुना तुमचें केलें।

धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें।

येथ माझें जी उरलें।

पाईकपण ॥ १८.१७९३॥

            – ज्ञानेश्वरी

स्वातंत्र्य म्हटले की आपला स्वातंत्र्यलढा आठवतो. कुणाला चटकन शिवरायांचे स्मरण होते. कुणी हे मूल्य घेत थेट तत्त्वज्ञानाच्या जंगलात शिरतात. विनोबा मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर व्यक्तीमध्ये कोणता बदल अपेक्षित असतो? कुटुंबाचे नवे रूप आकाराला येते का? विविध सामाजिक संस्थांची कार्यपद्धती कशी आणि किती बदलते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आपण पुढच्या पिढीकडे कसे सोपवतो? असे दिसताना सोपे पण विचार करू लागलो की खडबडून जाग यावी असे प्रश्न विचारतात.

माझी कुणावर सत्ता चालता कामा नये अशी स्थिती आपल्याला आवडेल? हे सूत्र पुढे नेत विनोबा लिहितात,

‘..किती आई-बापांना असे मनापासून वाटते की आपली सत्ता आपल्या मुलांवरही चालू नये, त्यांनी निजबुद्धीने वागावे, आपला सल्ला विचारात घ्यावा, पटला तरच तो मान्य करावा, न पटला तर अवश्य सोडून द्यावा?’

लहानपणी मुलांवर थोडीफार सत्ता चालवावी लागते. तीही दु:खाची गोष्ट आहे, होईल तितक्या लवकर मुलांना सर्व प्रकारे निजावलंबी करावयास पाहिजे, अशी तळमळ किती आई-बापांस वाटते? लहान मुलांवर ही सत्ता चालविल्याचा आभास न होऊ देता त्याला समजावून सांगून, त्याच्या बुद्धीला जागृत करून आणि चालना देऊन, त्याची संमती मिळवल्यासारखे करून वागावयाचे, अशी काळजी किती आई-बाप घेतात? ‘आमची मुले आमची सत्ता मानत नाहीत,’ असे किती आई-बाप गौरवाने आणि संतोषाने सांगतात? शाळेतही किती शिक्षक आपला महिमा मुलांवर लादत नाहीत? ‘मुलांनो, मला भीत जाऊ नका. माझे म्हणणे पटले तरच ऐकत जा. माझ्या वागण्यात दोष दिसले तर त्यांचे अनुकरण करू नका. उलट ते दोष मला नम्रपणे सांगता आले नाहीत, तर जसे सांगता येतील तसे सांगा, पण कधीही दबून राहू नका,’ असे शिक्षण किती शिक्षक मुलांना देतात? प्रेमळ आई-बापांनाही जर मुलांवर सत्ता पाहिजे आणि दयाळू शिक्षकांनाही जर विद्यार्थ्यांवर सत्ता पाहिजे तर स्वतंत्रतेचा उदय कसा होणार?

माझी कुणावरही सत्ता चालू नये, चालली तर ती दु:खाची गोष्ट होईल, असे जेव्हा मानवाला वाटेल, तेव्हाच स्वतंत्रतेचा उदय होईल. विनोबांनी दोन शब्दांची अद्भुत उकल केली आहे. त्यांच्या मते, संस्कृत भाषेत ‘पॉवर’ या शब्दाला प्रतिशब्द नाही. आपण सत्ता शब्द वापरतो, पण त्याचा अर्थ ‘असणे’ एवढाच आहे. विनोबांनी सत्ता, अधिकार या शब्दांना सोडचिठ्ठी देत ‘सेवा’ या मूल्याची स्थापना केली.

दुसरा शब्द आहे ‘कर्ता’. ‘स्वतंत्र: कर्ता।’ हे पाणिनीचे सूत्र विनोबांनी एका ठिकाणी मांडले आहे. ‘कर्ता’ आणि ‘सत्ता’ यांची जोडणी केली तर कृतीचे स्वातंत्र्य असणाऱ्या व्यक्तीचे केवळ सेवारत ‘असणे!’ महत्त्वाचे.

संदर्भ – विनोबांच्या ‘क्रांत-दर्शन’ या लेखसंग्रहातील ‘खरे स्वातंत्र्य’ हा लेख.

jayjagat24@gmail.com