अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्ञानांत बैसली वृत्ती संग सोडूनि मोकळा

यज्ञार्थ करितो कर्म जाय सर्व जिरूनि तें

-गीताई ४-२३

आधुनिक परिभाषेत भूदान आंदोलन म्हटले जात असले तरी विनोबांच्या लेखी तो यज्ञ होता. या यज्ञाची दीक्षा देण्याचे कार्य त्यांनी स्वीकारले होते. भूदानाला त्यांनी ‘प्रजासूय यज्ञ’ असेही म्हटले होते. परंपरेत राजसूय, सत्ताधीशाला राज्यकर्ता करणारा यज्ञ आहे. तो किमान दोन वर्षे चालतो. आहे त्या राज्याला मान्यता आणि त्याचा विस्तार हे राजसूयाचे मुख्य हेतू आहेत. विनोबांनी ‘राजा’ऐवजी प्रजेची स्थापना केली आणि राजसूयचा प्रजासूय यज्ञ झाला.

स्वातंत्र्यानंतर सर्वोदयाचे ध्येय गाठले तरच त्या स्वातंत्र्याला काही अर्थ आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी हा भूदान यज्ञ. यज्ञाची ही परिभाषा त्यांनी गीतेमधून घेतली होती. ‘गीताई शब्दार्थ कोशा’मध्ये यज्ञावर अत्यंत सखोल आणि कालसुसंगत नोंद आहे. गीताई चिंतनिकेमध्ये तिचे आणखी विवेचन आढळते. त्यातील तात्त्विक भाग बाजूला ठेवून यज्ञाचा आज सुसंगत होईल अर्थ पाहिला तर विनोबांमधील दार्शनिक जाणवतो.

यज्ञ म्हणजे जीवनसाधना. सृष्टीची निष्ठापूर्वक सेवा आणि तिचे माध्यम म्हणजे उत्पादक शरीर परिश्रम. थोडक्यात यज्ञ म्हणजे निढळाच्या घामाने जगणे. यज्ञ आणि तप यांची व्याख्या करताना त्यांनी ‘समाजसेवा’ आणि ‘वृत्तिशोधन’ अशा दोन संकल्पना मांडल्याचे दिसते. थोडक्यात भूदान यज्ञ म्हणजे भारतीय जनतेची चित्तशुद्धी करून तिला उत्पादक परिश्रमांकडे वळवण्याचा फार मोठा प्रयोग होता.

यज्ञाप्रमाणेच यज्ञाशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पनांचीही विनोबांनी फेरमांडणी केली. उदाहरणार्थ यज्ञोपवीत आणि सोमरस पान. ‘उपवीत’ म्हणजे विणणे अथवा विणलेले. विनोबांच्या यज्ञ संकल्पनेत चरखा चालवता येणे त्यामुळे अपरिहार्य ठरले. सोमरस पान या शब्दाचा जो विलासी अर्थ घेतला जातो त्यापेक्षा विनोबांचा अर्थ कितीतरी वेगळा आहे.

यज्ञकर्म करणारे सात्त्विक आहार घेणार यावर विनोबा ठाम आहेत. त्यामुळे सोम ही उत्तेजक वनस्पती नसून सात्त्विक आहार आहे असे त्यांनी सांगितले. सोमपान म्हणजे आहारशुद्धी. आश्रमीय व्रतातील ‘अस्वाद’ व्रताचे पालन. शरीरश्रम, आहार शुद्धी, समाजसेवा, दानविचार आणि आत्मशोधन अशा अनेकविध संकल्पनांचा शोध घेत विनोबांनी सुमारे चौदा वर्षे देशभर भ्रमंती केली.

राजसूय यज्ञात राजाला मान्यता मिळते आणि राजा व प्रजा हा भेद उत्पन्न होतो. याची परिणती म्हणजे लौकिक साम्याचीही स्थापना होत नाही. ‘प्रजासूय’-  समूहाला प्रतिष्ठा देतो. आत्मज्ञानाची जोड असल्याने प्रजा उन्मत्त बनत नाही. त्यामुळे साम्ययोगाचे लौकिक पातळीवरील रूप म्हणूनही भूदान यज्ञाकडे पाहावे लागते.

विनोबांनी यज्ञीय परंपरेला नवा अर्थ दिला. गीता जो यज्ञ सांगते तिचा आजच्या संदर्भातील अर्थ विनोबा सांगणार हे अटळ होते. गीतेवर हृदयाचे आणि मेंदूचे नाते असणाऱ्या माणसाने असे करणे सुसंगत होते. तथापि, पारंपरिक संकल्पना आणि व्यवहार नाकारणाऱ्या या प्रजासूय यज्ञावर वेळोवेळी आणि प्रखर टीकाही झाली. ती लक्षात घ्यावी लागते. jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyog acharya vinoba bhave reformulate important concepts related to yajna zws
First published on: 08-08-2022 at 01:03 IST