अतुल सुलाखे

साने गुरुजी आणि विनोबा यांचे नाते प्रेम, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान या तिन्ही पातळय़ांवर भक्कमपणे आधारित होते. विनोबांच्या अक्षर साहित्यामध्ये गीता प्रवचने नसतील, तर त्या साहित्याची यादीही सुरू करता येणार नाही आणि गीता प्रवचने वाचताना साने गुरुजींचे विस्मरण होत असेल तर विनोबांचे साहित्य समजणार नाही.

गीतेचा वक्ता, श्रोता आणि लेखक तिघेही कृष्णरूप आहेत असे विनोबांनी म्हटले आहे. गीता प्रवचनांसाठी हीच उपमा वापरायची तर तिथे पांडुरंगाचे नाव घ्यावे लागते. साने गुरुजींचे नाव पांडुरंग असणे हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. एरवी ती कृती फक्त ईश्वरनिर्मित आहे.

साने गुरुजी आणि विनोबांचे नाते आध्यात्मिक आणि राजकीय अशा दोन्ही प्रकारचे होते. यात आपण फारकत करायला गेलो तर वैचारिक गोंधळ उडतो आणि सुटे सुटे निष्कर्ष निघतात. या दोन महापुरुषांच्या विचार विश्वाचे एकत्रित आकलन गीता प्रवचनांपासून सुरू होतो.

‘तुरुंगातून सुटल्यावर ही प्रवचने व तुरुंगात झालेली चर्चा प्रकाशित करावीत, अशी साने गुरुजींची इच्छा होती. विनोबांनी प्रकाशनाला संमतीही दिली. ही हकिकत त्यांनी १९३५च्या पत्रात जमनालालजी बजाज यांना कळवली. कारण विनोबांचे सारे साहित्य आपण प्रकाशित करावे अशी जमनालालजींची इच्छा होती.’

साने गुरुजींनी गीता प्रवचने आपल्या पत्रिकेत छापण्याविषयी विनोबांकडे संमती मागितली. यावर विनोबांनी त्यांना ९ सप्टेंबर १९३८ च्या पत्रात लिहिले, ‘तुम्ही गीता- प्रवचने मागितली. त्याला नकार देण्याचा मला अधिकारच काय? देवदासभाऊंना मी सांगितले, की गीता प्रवचने साने गुरुजींना मिळणे हा त्यांचा हक्कच आहे..’

विनोबांनी जरी साने गुरुजींना त्यांच्या पत्रिकेत गीता-प्रवचने प्रकाशित करण्यास परवानगी दिली असली तरी विनोबांच्या काही सहकारी- कार्यकर्त्यांना ही गोष्ट पसंत पडली नाही. २४ सप्टेंबर १९३८ च्या पत्रात त्यांनी आपले बंधू शिवाजी भावे यांना कळविले, ‘त्यांच्या (साने गुरुजींच्या) पत्रिकेत छापणे काहींना पसंत नाही. कारण त्या पत्रिकेवर काही लोकांचा आक्षेप आहे. माझ्यासमोर हा प्रश्न नाही. गुरुजींसारख्या व्यक्तीला समाधान देणे हा माझा धर्म आहे. त्यांच्या पत्रिकेत अनुन्नत असे काही मला आढळले नाही. त्यांना त्यांची मूळ प्रत पाहिजे. त्यांची मूळ प्रत तर त्यांना द्यावीच, शिवाय तुझी प्रत- खासकरून तू तयार केलेली विषयानुक्रमणिका त्यांना द्यावी.’

साने गुरुजींनी आपल्या ‘काँग्रेस’ साप्ताहिकातून १९३८- ३९ साली गीता प्रवचने क्रमश: छापली. पुढे क्रमश: प्रकाशित झालेल्या गीता प्रवचनाचे साने गुरुजींनी सारांश रूपाने ‘गीता हृदय’ हे पुस्तकही प्रकाशित केले.

विनोबा आणि साने गुरुजी यांच्यामधील स्नेहाची यावरून कल्पना येते. दोन संत हृदये श्रद्धेशिवाय समजणार नाहीत.jayjagat24@gmail.com