अतुल सुलाखे  

आपल्या सहकाऱ्यांमधे वैचारिक साथीदार असणे ही बाब फारशी मोठी नसते. सर्वोदयी परिवारात विनोबांच्या तत्त्वज्ञानावर निष्ठा असणारे अनेकजण होते. तथापि आचार्य जावडेकरांसारख्या प्रबोधकाने विनोबांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करावा ही विशेष गोष्ट होती.

जावडेकरांनी केवळ गांधीजींना वैचारिक आदर्श मानले असते तरी चालले असते. तथापि त्यांनी आपल्याच पिढीच्या विनोबांच्या बाबतीतही त्यांनी आदरभाव दाखवला. भूदानाविषयी त्यांना आपुलकी होतीच परंतु विनोबांच्या आध्यात्मिक चिंतनाचीही त्यांना भारतीय समाजाच्या उभारणीत गरज वाटत होती.

जावडेकरांच्या मते, गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढलेला स्वातंत्र्य संग्राम हा प्राय: राजकीय स्वातंत्र्यासाठी होता. या संग्रामातील बहुतेक प्रमुख नेते लोकशाहीचा आदर्श म्हणून इंग्लंड किंवा अमेरिकेकडे पाहात असत. त्यामुळे इथल्या राजकीय चिंतनाला मर्यादा आली.

ही मर्यादा विनोबांच्या चिंतन आणि कृतीमुळे दूर झाली. भारतात आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मूलगामी परिवर्तनाचा प्रयोग भूदान आंदोलनाने झाला. हे आंदोलन प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी असून आपल्या कारखानदारीला धोका नाही अशी त्या वेळच्या भांडवलदारांना आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या काही काँग्रेसी नेत्यांना आशा होती. मात्र जगन्नाथपुरीला झालेल्या सर्वोदय संमेलनात विनोबांनी या भांडवलदारांचे दिवस संपत आल्याचे स्पष्टपणे सांगितले. विनोबांच्या या भूमिकेमुळे जयप्रकाश नारायण यांनी भूदानाला स्वत:चे जीवन दान केले.

जावडेकर यांच्या मते, भारतीय भांडवलदार सर्व पातळय़ांवर निराधार झाले. भारतात आता समाजवादी क्रांती आणि समाजवादी समाजरचना या अटळ गोष्टी आहेत याची जाणीव या भांडवलशहांना झाली. भांडवलदार आणि त्यांच्या नेत्यांनी ही क्रांती ‘अहिंसक’ असल्याने ती सावकाशीने व्हावी असा सूर लावला. पुरी येथे झालेल्या सर्वोदय संमेलनात विनोबांनी आणखी सडेतोड व स्पष्ट भूमिका घेतली.

‘‘अहिंसेची क्रांती म्हणजे सावकाशीची क्रांती नव्हे, अहिंसक क्रांती त्वरितच घडली पाहिजे. सावकाशी करणे हा हिंसावाद किंवा ही हिंसावृत्ती आहे आणि या वृत्तीने वागल्यास हिंसक क्रांती ओढवून घ्याल’’ विनोबांचा इशारा नेमका होता.

विनोबांनी मानवी अंत:करणातील आत्मप्रेरणेला व धर्मभावनेला अंतर्बा व सर्वागीण सामाजिक क्रांतीचे स्वरूप दिले. गांधीवादाचे शुद्ध स्वरूप त्यांनी जगापुढे मांडले. हे कार्य इतके सर्वस्पर्शी व सर्वव्यापक होते की ते केवळ राजकीय किंवा पक्षीय दृष्टीने विचार करणाऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. जावडेकरांचे हे चिंतन अत्यंत मूलगामी आहे.

साम्यवाद आणि साम्ययोग या दोहोंची तुलना विस्ताराने समोर आली आहे. तथापि टिळक-आगरकर-मार्क्‍स या त्रिसूत्रीच्या आधारे सर्वोदयाकडे पाहण्याचा आचार्य जावडेकर यांचा दृष्टिकोन वेगळा आणि विशेष होता.

गांधीजींचेच नव्हे तर विनोबांचे कार्यही भारताच्या भविष्यासाठी त्यांनी महत्त्वाचे मानले.

विनोबांची आध्यात्मिक भूमिका, गांधी विचारांचा त्यांनी केलेला विकास, भूदानाचे महत्त्व यावर सर्वोदयाशी जवळीक असणाऱ्या समाजवाद्याने असे भाष्य करावे हे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल. जावडेकरांची भूमिका तेव्हा महत्त्वाची होतीच पण आज जास्तच मोलाची आहे.

jayjagat24@gmail.com