‘मध्य प्रदेशचे लाडके मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे सनातन धर्माचा अपमानच. केवळ अपमान नाही तर धर्मावरील हल्लाच. यामागे राष्ट्रद्रोही काँग्रेस व जॉर्ज सोरोस आहेत’ हे वक्तव्य करून देशभर चर्चेत आलेले राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष संजय नागाईच भलतेच खुशीत होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे कार्यालय तसेच घरातील गर्दी तसूभरही कमी होत नव्हती. कार्यकर्ते, साधुसंत भेटून त्यांचे अभिनंदन करत होते. ‘या महामंडळावर कशाला समाधान मानता? तुम्हाला तर यादवांनी मंत्री करायला हवे. थांबा आम्हीच पुढाकार घेऊन बोलतो,’ असे एका संताने त्यांना स्पष्टच सांगून टाकले.
वक्तव्याच्या दुसर्याच दिवशी त्यांना उत्तर प्रदेशातून एका वरिष्ठ मंत्र्यांचा फोन आला. ‘अयोध्येतल्या दान चोरीमुळे आम्ही खूपच अडचणीत आलो होतो. विरोधकांचा प्रतिवाद कसा करावा हेच समजत नव्हते. तुम्ही मार्ग दाखवून दिला. चोरीवरून आरोप करणे हा धर्माचा अपमान आहे असा सूर आम्ही लावताच विरोधक बावचळले. त त प प करू लागले. या धर्माचे काय करायचे हे विरोधकांना अजून उमगलेच नाही. तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा, आम्ही लगेच पाठवून देऊ.’ मग आसाममधून फोन खणाणला. ‘तुम्ही तातडीने कामाख्यादेवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला यावे. सरकार तुम्हाला राज्य अतिथीचा दर्जा देण्यास तयार आहे. मुख्य म्हणजे आमच्या साहेबांची तशी इच्छा आहे. धर्माच्या आडून आणखी कोणकोणत्या कृत्याचा बचाव करता येईल यावर त्यांना चर्चा करायची आहे. तेव्हा तारीख व वेळ लवकर कळवा. विशेष विमान पाठवण्याची आमची तयारी आहे.’ फोन ठेवताच संजयभाईंनी लगेच दौरा ठरवण्याचे आदेश साहाय्यकाला दिले. रात्री राज्याचे पाच मंत्री त्यांना भेटण्यासाठी आले. ‘धर्माच्या नावावर मिळालेली सत्ता दीर्घकाळ टिकवून ठेवायची असेल तर थोडाफार भ्रष्टाचार करावाच लागतो. मात्र तो करताना पकडले गेलो तर काय असा गहन प्रश्न आमच्यासमोर होता. त्याचे उत्तर शोधण्यातच दिवस वाया जात होते. तुमच्या एका वाक्याने आम्हाला उत्तर सापडले. आता आम्ही कशाचीच काळजी करणार नाही. आमच्या गैरकृत्याचा गवगवा झालाच तर बचावासाठी तुम्ही याच पद्धतीने समोर यावे अशी आमची इच्छा आहे. बाकी तुमची सर्वतोपरी काळजी घेण्याचे वचन आम्ही देतो.’ हे ऐकून संजयभाईंना अपार आनंद झाला.
सकाळी ते साखरझोपेत असतानाच महाराष्ट्रातून फोन आला. पलीकडून एक मंत्री बोलत होते. ‘उज्जैनप्रमाणेच नाशिकचा विकास करायचे आम्ही ठरवले आहे. त्यात आडकाठी आणण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने सुरू आहेत. प्रामुख्याने जमीन व झाडांच्या मुद्द्यावरून. त्यांना तुमच्यासारखे आक्रमक उत्तर देणारे इथे कुणीच नाही. मी दोन साधूंना तुमच्याकडे पाठवतो. त्यांना जरा प्रशिक्षण द्या. बाकी तुमचे जे काही असेल ते मी बघून घेईन. देशात प्रतिवादाची चांगली सुरुवात केल्याबद्दल तुमचे अभिनंदन!’ फोन ठेवल्यावर आनंदाने हुरळून गेलेल्या संजयभाईंनी स्वत:च स्वत:ला चिमटा काढला. तेवढ्यात त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलावल्याचा निरोप आला.
तातडीने तिथे पोहोचल्यावर मोहनभाईंनी दीर्घ आलिंगन देऊन त्यांचे आभार मानले व तुमचे भविष्य उज्ज्वल आहे असा आशीर्वाद दिला. तिथून बाहेर पडताच त्यांना दिल्लीच्या पक्ष मुख्यालयातून फोन आला. ‘सरकारे व पक्षाचा बचाव करण्यासाठी ‘आधुनिक यादव कृष्णनीती’चा वापर करणारे तुम्ही एकमेव असल्याने पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून तुमची नेमणूक करण्यात येत आहे’ हे ऐकून संजयभाई थेट विमानतळाकडे रवाना झाले.
